Sign In

कथा

मी कथालेखन (अ)नियमितपणे करतो. माझ्या कथा पुस्तकरूपात प्रकाशित झालेल्या आहेत, शिवाय 'कुल्फी', 'अंक निनाद', 'भावार्थ' यांसारख्या दिवाळी अंकांमधूनही प्रकाशित झालेल्या आहेत. काही प्रकाशित आणि काही अप्रकाशित कथा इथे पोस्ट करायच्या, असा मनसुबा आहे.
All
Jibberish Katha
Absurd
Realistic
Fantasy
मनोरंजन
इराण्याच्या हॉटेलमधे मी एकटाच चहा पीत आणि बनमस्का खात विमनस्क अवस्थेत बसलो होतो. विमनस्क अवस्थेत अशासाठी की मला कथा सुचत नव्हती. कथेचे एलिमेंट्स सुचलेले, पण त्यांची मोट म्हणावी तशी बांधता येत नव्हती. काय करावं? ही कथा लिहूच नये का? नकोच. गेली उडत. एव्हाना हा विचार माझ्या डोक्यात एकशेतिसाव्यांदा येऊन गेला होता. तिचा नाद सोडून द्यायला मी तयार होतो, पण ती माझा नाद सोडायला तयार नव्हती. नाईलाजाने मला राबणं भाग होतं. उजव्या बाजूला असणाऱ्या काचेतून बाहेर नजर टाकत मी चहाचा एक घोट घेतला आणि परत कथेच्या एलिमेंट्सची मोट बांधायला घेतली. कप खाली ठेवता ठेवता माझं लक्ष रस्त्यावरच्या एका तरुणाकडे गेलं. त्याच्या हातात एक रायफल होती आणि चेहऱ्यावर वखवखलेलं थ्रिल दिसत होतं. या दोन गोष्टी घेऊन तो इराण्याच्या शेजारी असलेल्या एका उच्चभ्रू कॅफेमध्ये मोठ्या उत्साहाने शिरला. तो आत गेल्याचं मला दिसलं कारण त्या कॅफेच्या भिंती म्हणजे पारदर्शक काचा होत्या. आत शिरल्याशिरल्या त्याने एक जिब्रीश डरकाळी फोडली आणि अद्वातद्वा गोळीबार करायला सुरुवात केली. मी माझा नाद न सोडणाऱ्या कथेशी जबरदस्तीने ब्रेकप केलं आणि त्या तरुणावर लक्ष केंद्रित केलं. मला नवीन कथा मिळाली होती. तिकडे तो तरुण तोंडाने उभ्याआडव्या भौतिक-अधिभौतिक शिव्या देत, मधूनच डरकाळ्यांचं व्हेरिएशन देत राक्षसासारखा चारी दिशांना गोळीबार करत होता. त्याचा विध्वंस चालू असताना कॅफेमधले लोक अंगभर बुलेटप्रूफ चिलखत घालून शांतपणे आपापली पेयं पीत बसले होते, हसत-खिदळत होते. वेटर लोक बुलेटप्रुफ कपातून कॉफ्या सर्व्ह करत होते. त्याच्याकडे कोणी म्हणता कोणी लक्ष देत नव्हतं. साधारण पाच मिनिटे त्याने ते राग-द्वेष-उत्साह-राक्षसीपणा यांचं मिश्रण असलेलं गरळ ओकलं आणि पाचव्या मिनिटाच्या बत्तिसाव्या सेकंदाला तो शेजारच्या बुलेटप्रूफ खुर्चीत धपकन- सॉरी- ढाणकन् बसला. (ढाणकन् अशासाठी की त्याचं बुलेटप्रुफ चिलखती बूड आणि ती खुर्ची यांचा मोठा टणात्कार झाला, जो इराण्याच्या हॉटेलात मला ऐकू आला) तर बसताक्षणी त्याला जी अतोनात जडशीळ अशी मरगळ आली ती त्याला काहीकेल्या आवरता येईना. सगळ्या मानवजातीच्या आयुष्यातली निरर्थकता एकत्र येऊन त्याच्याभोवती फेर धरून नाचू लागली आणि ‘ढगाला लागली कळ- डी-डी-डीजे भुरट्या’ असं गाणं किंचाळू लागली. त्याला ही असंगती क्षणभर मजेशीर वाटली पण पुढच्याच क्षणाला ती विरली आणि पुन्हा जडशीळ मरगळ प्रकर्षाने जाणवली. मग तर तो तडक उठला, बुलेटप्रुफ चिलखत घाईघाईने काऊंटरवर काढून ठेवलं, रायफल परत केली आणि डोक्यातल्या छत्तीस हजार निरर्थक विचारांना गुळाच्या ढेपेवर बसलेल्या माशांसारखं हाकलून लावायचा प्रयत्न करीत तिथून बाहेर पडला... ~ तो बाहेर पडून कुठे गेला हे लिहायला मी घाईघाईने इराण्याचे पैसे चुकते करून रस्त्यावर आलो, तर मला दिसलं की त्या उच्चभ्रू कॅफेचा एक पाळीव भेसूर कुत्रा आणि एक गिधाडासारखा दिसणारा पक्षी माझीच वाट बघत तिथे उभे होते. त्यांच्या धमकीवजा आग्रहामुळे मला त्याच्याबद्दल सांगण्यापूर्वी जरा कॅफेचं प्रमोशन करणं भाग आहे. तर या उच्चभ्रू कॅफेमधून माणसं कोठा साफ झाल्यासारखी तृप्त होऊन बाहेर पडत. तो कॅफे बांधलाच होता त्या विशिष्ट उद्देशाने की इथे चिडलेल्या-पिचलेल्या-आयुष्याला उबलेल्या किंवा नुसतंच थ्रिल हवं असलेल्या माणसांनी यावं, वाट्टेल ते बरळत खऱ्याखुऱ्या रायफली घेऊन बेछूट गोळीबार करावा, ठराविक सामानाची तोडफोड करावी आणि शांत होऊन निवांतपैकी कॉफीबीफी जे काय हवं ते पिऊन हलकं होऊन बाहेर पडावं. या कॅफेच्या भिंती, खुर्च्या-टेबलं वगैरे सगळंच बुलेटप्रुफ होतं हे वेगळं सांगायला नकोच. जसा एखाद्या बाईकर्स ग्रुपचा किंवा महिला मंडळाचा पार्ट्या करण्यासाठी, एकत्र जमण्यासाठी एक ठरलेला कॅफे असतो तसा हा उच्चभ्रू कॅफे प्रतिष्ठित अतिरेक्यांचा वर्षानुवर्षे ठरलेला कॅफे होता. धार्मिक द्वेषाचे उमाळे आले की ते इथे येऊन विध्वंस करीत आणि अभिमानाने परत आपल्या काडेपेट्यांमध्ये जात. इथे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून सजग गिधाडपक्षी आणि सजग भेसूर कुत्रे सतत सगळ्यांवर नजर ठेऊन असत. या पक्ष्यांची चोच आणि कुत्र्यांचं तोंड म्हणजे बंदुकीची नळी होती. त्यांनी अनुक्रमे चिवचिवलेल्या आणि भुंकलेल्या गोळ्या बुलेटप्रुफ चिलखतदेखील भेदून जात असत. तर असा हा नितांतसुंदर बुलेटप्रूफ कॅफे— ज्यांचा असा दावा आहे की आमच्या कॅफेतून प्रत्येकजण आनंदी होऊनच बाहेर पडतो— त्या कॅफेमधून तो तरुण आज अजूनच उद्विग्न होऊन बाहेर पडला होता. खरंतर त्याचा प्रॉब्लेमही जरा जगावेगळाच झाला होता आणि त्यावर नक्की काय करावं हे त्याला कळत नव्हतं. गेली अनेक वर्षे तो हपापल्यागत गटागटा मनोरंजन ढोसत होता. घर नामक प्रदेशातल्या बेड नामक रंगीबेरंगी दलदलीत लॅपटॉप, चार्जर, फोन आणि वेफर्सचं पुडकं घेऊन तो जो रुतत असे तो महिनोन्महिने उठत नसे. यामुळे झालं असं की रात्रंदिवस मसालेदार खाल्ल्यावर जिभेला जसं सगळंच मचूळ लागू लागतं तसं त्याला स्क्रीनवरचं भवताल नीरस वाटू लागलं. एकाचवेळी लॅपटॉपवर एका बाजूला जगभरात नावाजलेली कॉमेडी फिल्म, दुसऱ्या बाजूला जगभरात नावाजलेली हॉरर सिरीज, तिसऱ्या बाजूला धांगडधिंगा म्युझिक लावून पुढ्यात मोबाईलवर गेम खेळत बसण्यानेही रंजन होईना. मग मेंदूच्या जिभेला वेगळ्या चवी देण्यासाठी त्याने वास्तवातल्या भवतालात येऊन वेगळे मार्ग अवलंबले. ‘अनावश्यक गोष्टी मिळण्याचे एकमेव ठिकाण’ नामक अजस्र दुकानातून कसल्याकसल्या गोष्टी मागवून पाहिल्या, दारू, गांजा, चरस यासारखी आवाक्यातली व्यसने करून पाहिली, सोशल मिडियावर कॉन्ट्रोव्हर्शिअल कमेंट्स करून ते थ्रिलही घेऊन पाहिलं; पण व्हायचं असं की या सगळ्या उपद्व्यापामुळे निव्वळ दोन-अडीच क्षणांचं थ्रिल मिळायचं आणि पुढचे अनेक तास नीरस जडशीळ अशी मरगळ साचून राहायची. तिच्यापासून काहीकेल्या दूर पळता यायचं नाही. म्हणून तो चोवीस तास प्रचंड थकलेल्या अवस्थेत दिसे आणि त्याच अवस्थेत कसंबसं लॅपटॉपवर अडीच क्षणांचं थ्रिल शोधीत राही. पण तेही हल्ली त्याला मिळेनासं झालं होतं. म्हणजे काय, की ‘अरंजना’ पासून सुटका करून घ्यायला ‘रंजना’कडे जायचं तर रंजनच एक मोठं अरंजन होऊन बसलेलं! –असं एक वाक्य मला सुचलं होतं पण ते मी इथे लिहीत नाही. की लिहू? जाऊदे, नंतर बघता येईल. ~ तर बुलेटप्रूफ कॅफेसारखी रामबाण मात्रासुद्धा आपल्याला लागू होत नाहीय या विचाराने निराश होऊन त्याला एकाएकी प्रचंड वैताग आला आणि तिथून बाहेर पडल्यावर हे अनंतकाळ चघळावं लागणारं 'आयुष्य' नामक भलंमोठं च्युईंगम थुंकून द्यावंसं वाटू लागलं. ते कुठे आणि कसं थुंकावं याचा विचार करत तो रस्त्याने चालत असताना पलीकडच्या फुटपाथवर फक्त जांभळी पँट घालून विचित्र केशभूषा केलेल्या अतिशय सडपातळ व्यक्तीकडे त्याची नजर गेली. त्या व्यक्तीच्या पायावर नाईकी, छातीवर आदिदास, कमरेवर प्राडा आणि पाठीवर ऍपलचा टॅटू होता. या सगळ्या भांडवलामुळे आलेल्या दुर्दम्य आत्मविश्वासाने तो भाज्यांच्या पिशव्या घेऊन हाशहुश करीत घराकडे परतणाऱ्या बायकांना पटवण्याचा प्रयत्न करत होता. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू तरळलं. मग एकदम त्या व्यक्तीच्या उघड्या अंगावरचे ब्रँड्स पाहून त्याचीही कामभावना उद्दीपित झाली आणि धावत जाऊन त्याला कडकडून मिठी मारावी असं त्याला वाटू लागलं. पण ताबडतोब तो भानावर आला आणि आपल्या भावनांना आवर घालीत पुढे गेला. पुढे एका मैदानावर गिटार ट्यून करण्याचा अत्यंत नीरस कॉन्सर्ट चालू होता. स्टेजवर एक तुळतुळीत टक्कल असलेला मनुष्य गेले तीन तास फक्त गिटार ट्यून करत होता आणि साधारण दहा हजाराचा क्राऊड समोर उभा राहून तो अभूतपूर्व सोहळा पाहत होता. हे काय प्रकरण आहे बुआ असं मनाशी म्हणत तोही तिथे थांबला, पण स्टेजवरच्या टक्कल पडलेल्या गिटारवादकाची कृती बघण्याचा तिसऱ्याच सेकंदाला त्याला कंटाळा आला आणि त्याची नजर स्टेजच्या मागे असलेल्या एका उंचच्या उंच सुडौल टॉवरकडे गेली. त्याचे डोळे एकदम रंगीबेरंगी झाले आणि त्याने त्याक्षणीच ठरवलं की या टॉवरच्या गच्चीवरूनच आयुष्याचं बेचव च्युईंगम थुंकून द्यायचं. त्याने लागलीच रस्त्यावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला हात केला आणि टॅक्सी थांबवली. "दादा त्या टॉवरपाशी घ्या." तो टॉवरकडे बोट दाखवत म्हणाला. टॅक्सीवाल्याने नकारार्थी मान हलवली. "क्यू? चलो ना ओ, अर्जंट आहे." तो म्हणाला. “ख्व्याक् थू," म्हणत टॅक्सीवाल्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. आता तो टॅक्सीवाला निघणारच होता तेवढ्यात त्याने चपळाईने त्या गिटारवादकाकडून गिटार घेतली आणि टॅक्सीवाल्याला उद्देशून अत्यंत मोटिव्हेशनल, इन्स्पिरेशनल असं एक गाणं गायलं. त्यासरशी टॅक्सीवाला टॅक्सीतून बाहेर आला आणि तुटपुंजा चंगळवाद भोगणाऱ्या अगणित माणसांच्या गर्दीत सामील होऊन भरमसाठ चंगळवाद भोगायची महत्वाकांक्षा पूर्ण करायला निघून गेला. मग त्याने ती टॅक्सी स्वतःच चालवत त्या टॉवरपाशी आणली, लगबगीने उतरला आणि धावतपळत टॉवरमध्ये शिरला. ...गच्चीवर आल्या आल्या त्याने आधी कठड्यापाशी जाऊन खाली वाकून पाहिलं. उडी मारायच्या इच्छेपासून अजूनतरी आपलं मन परावृत्त झालं नाहीय हे जाणवल्यावर त्याला जरा बरं वाटलं. मग एक दीर्घ श्वास घेऊन त्याने वेळ पाहिली. वेळ पहायच्या आधी दीर्घ श्वास का घेतला त्याने? माहीत नाही. सगळ्याच गोष्टींना कुठे कार्यकारणभाव असतो? तर त्याने वेळ पाहिली. सहा वाजत आले होते. जीव देण्याचं थ्रिल घेण्यापूर्वी एकदा भौतिक जगातलं शेवटचं थ्रिल घ्यावं म्हणून त्याने एक तिरप्या अँगलने सेल्फी काढून स्टेटस अपडेट केला की बुआ '#Dying. Bye bye folks.' तीन मिनिटांत स्टेटसला सहा लाईक्स आणि चार हाहा अशी रिऍक्शन आली. एका मित्राने त्याचा स्टेटस आनंदाने शेअरसुद्धा केला. लोकांना आपल्या स्टेटसचं गांभीर्य उशिरा का होईना, पण कळेल या हेतूने तो अजून दोन मिनिटं वाट बघत थांबला. पण झालं उलटंच. पाचव्या मिनिटाला वेगवेगळ्या पेजेसवरून मीममधून त्याच्या फोटो आणि स्टेटसची भंकस व्हायला सुरुवात झाली. ते पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढली, श्वास फुलला आणि ते क्षणिक थ्रिल पुन्हा एकदा त्याच्या मेंदूभोवती गिरक्या घालू लागलं. पण दुसऱ्याच क्षणाला त्याला 'ते विरून जाणार' या विचाराची इंगळी डसली आणि ते जायच्या आतच त्याने त्या कठड्यावरून अचानक झेप घेतली आणि तुफान वेगाने तो खाली पडू लागला. पोटात आलेला गोळा, हातातून सुटलेला फोन, ग्रॅव्हिटी, जमीन आणि अवकाशाचा डोक्यात झालेला गोंधळ याची टोटल लावत भानावर यायचा प्रयत्न करत असतानाच तो धाडदिशी जमिनीवर आदळला आणि अचानक सर्वत्र अंधार झाला. मागोमाग नीरव शांतता. काही क्षण असेच गेले. जग पुढे चालू राहिलं आपलं आपलं. एवढा आवाज होऊनही हे काय पडलंय बघायला कुणीच आलं नव्हतं. नाही म्हणायला एक कुत्रं त्याच्याजवळ फिरकून गेलं, पण त्यानेही त्याच्या आत्महत्येला लाईक किंवा शेअर वगैरे केलं नाही. मग कितीतरी वेळ तो निपचित पडूनच होता. आभाळात चंद्र वर आला तेव्हा गाढ झोपेतून जाग यावी तसा तो धडधाकट जागा झाला आणि एकदम उठूनच बसला. एकदोन कोरेकरकरीत सेकंद सरल्यानंतर एकदम त्याला सगळं आठवलं. आपण कोण, आपला प्रॉब्लेम काय, आपण उडी का मारली वगैरे सगळंच. त्याने उठून उभं राहायचा प्रयत्न केला, तर काहीच इजा न झालेल्या साध्या माणसासारखा तो उभा राहिला. त्याच्या अंगावर एक ओरखडासुद्धा उमटला नव्हता! ~ खूप आधी एकदा मित्रांशी गहन चर्चा चालू असताना तो एक वाक्य म्हणाला होता, "आपल्यातल्या काही जणांना कदाचित अमरत्व मिळालंही असेल! कुणास ठाऊक? अमर आहोत की नाही हे जाणून घेण्याच्या टेस्ट्स थोडीच आहेत आपल्याकडे? मृत्यूचा क्षण आल्याशिवाय कळतच नाही आपण मरणास पात्र आहोत की नाही ते!" तेच वाक्य त्याला त्याक्षणी नेमकं आठवलं. आपल्याला अमरत्व प्राप्त झालंय हे त्याला त्यावेळी लक्षात आलं आणि त्याचा आनंद होण्याऐवजी या नीरस आणि अनंतकाळासाठी बेचव असणाऱ्या आयुष्यापासून मृत्यूदेखील आपली सुटका करू शकत नाही या विचाराने तो अधिकच व्याकुळ झाला. या व्याकुळतेला कुठलं गाणं गाऊन बाहेर काढावं या विचारात असतानाच त्याचं लक्ष पुढ्यातल्या टॉवरच्या आरशासारख्या काचेकडे गेलं आणि स्वतःचं प्रतिबिंब पाहून तो ताडकन उडालाच जागच्या जागी. एवढ्या उंचावरून खाली पडल्यावर जनरली मानवी शरीराचा चेंदामेंदा होतो आणि ते बघवणार नाही इतकं विद्रुप होतं. पण त्याच्या बाबतीत उलटंच झालं होतं. तो जोरात खाली आदळून अचानक सुंदर सुडौल आणि गोंडस झाला होता! आपल्यासोबत झालेल्या या चित्रविचित्र चमत्कारांना कसं हँडल करायचं हे त्याला कळेना. सुंदर आणि सुडौल बॉडी मिळालीय म्हटल्यावर 'हाती आलेली प्रत्येक गोष्ट येनकेनप्रकारेण उपभोगली पाहिजे' या सद्य जगाच्या मोस्ट सेलिब्रेटेड नियमानुसार काही सरधोपट करिअरिस्टिक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेले, नाही असं नाही. पण ताबडतोब त्याला त्याच्या जगण्याला जडलेल्या 'सारं काही क्षणभंगुर आहे' या रोगाची आठवण झाली आणि पुन्हा निरिच्छेचा उमाळा आला. हा क्षणभंगुर असण्याचा विचार साला त्याची पाठच सोडत नव्हता. एखाद्या वैश्विक नियमासारखा तो सगळ्याच गोष्टींना लागू होत होता आणि त्या गोष्टीतला जीवनरस काढून घेत होता. त्याला हे सगळं पुन्हा एकदा असह्य झालं आणि काय करावं हे न उमजून तो तुरुंगातून पळ काढलेल्या अट्टल गुन्हेगारासारखा त्या रस्त्यावरून धावतच सुटला. धाप लागेपर्यंत पुढ्यात येईल त्या रस्त्यावर धाव धाव धावला आणि दमून जिथे बसला तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी उठला आणि पुन्हा धावू लागला. त्याच्या मागेमागे धावताना माझी मात्र प्रचंड लेवलला फरफट झाली. पण ते जाऊदे. दिवसरात्र धावत धावत डोक्यातल्या विचारांपासून दूर पळण्याच्या प्रयत्नात तो खूप दूर निघून आला आणि एका निर्जन उजाड माळरानावर असलेल्या एका लांबच्या लांब रांगेत येऊन उभा राहिला. ही रांग कसली होती? एटीएमची की तिकिटाची? काय माहीत नाही. त्यालाही ते कोणाला विचारावं वाटलं नाही. पण ती रांग अफाट लांब होती एवढं कळत होतं. अजून पुरतं उजाडलं नव्हतं त्यामुळे डोळे ताणून पुढे पाहिलं की फक्त धुरकट माणसंच दिसत. ती कुठल्या वास्तूपुढे उभीयत ते काही कळायला मार्ग नव्हता, कारण त्या सरळसोट पायवाटेच्या पुढे निव्वळ धुकं होतं. पण त्याला त्या रांगेत उभं राहणं मानवलं होतं म्हणून तो परत मागे फिरला नाही, रांगेसोबत पुढे सरकत राहिला. सकाळ सरुन उन जसं वाढू लागलं तसं ते धुकं सरलं आणि पुढ्यात एक काळपट डोंगर दिसू लागला. त्याने अजून डोळे ताणून पाहिलं तर त्याला लक्षात आलं की हा डोंगर नव्हे, हा एका भव्य पुरातन मंदिराचा भलामोठा कळस आहे. तो चकित झाला आणि भारावल्यागत कळसाकडे टक लावून बघत रांगेतून पुढे पुढे सरकू लागला. तो जसा त्या मंदिराच्या जवळ आला तसे त्याला त्या कळसावर कोरलेले रेमंडचे सनग्लासेस घातलेले असंख्य बेढब चेहरे दिसू लागले. ते जणू आपल्याकडेच बघतायत आणि आपल्याला बघून त्यांच्या दगडी कपाळाला आठी पडलीय असाही त्याला भास झाला. मग बावरून त्याने आपली नजर काढून घेतली आणि मंदिराचा उंबरा दिसेपर्यंत तो मान खाली घालूनच रांगेतून पुढे सरकत राहिला. त्याला रांगेतून मंदिरापर्यंत पोहोचायला बराचवेळ आहे म्हणून तेवढ्यावेळात मी मंदिरातला गाभारा कसा असेल, देव कसा असेल, पुजारी तिथे असेल का या तपशिलांचा विचार करतच होतो तेवढ्यात तो शॉर्टकट मारून एकदम उंबरा ओलांडून मंदिरातच शिरला. त्यामुळे पुढची गोष्ट हातातून निसटेल की काय अशी मला भीती वाटू लागली. पण बघूया, जसं होईल तसं. तर तो आत आला आणि त्याने थेट गाभाऱ्यात जाऊन लोळण घेतली. देव कोणता, गाभारा कसा हे पाहण्यात त्याला स्वारस्य नव्हतं हे किती बरं झालं! त्याने पालथं पडून हात जोडून बडबडायला सुरुवात केली की देवा मला या जगण्यातून सोडव...मी अमर आहे पण मला मोक्ष पाहिजे, चिरकाळ टिकेल असं थ्रिल पाहिजे, फ्री ट्रायलच्या या नश्वर जगात प्रीमियम लेव्हलचं मनोरंजन पाहिजे, मला मार्ग दाखव वगैरे तत्सम आशयाचं काहीतरी तो बोलला असावा. मी त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात किती डेसिबलची शांतता आहे, हे ठरवण्यात गुंतलो होतो. त्याची प्रार्थना उरकल्यावर पुजाऱ्याने त्याला उठवलं आणि त्याच्या हातावर एक चिठी ठेवली. "हे काय?" "हा तुझा प्रसाद. चिठीत लिहिलेल्या पत्त्यावर जा, तिथे तुला 'चिरंतन चिल' मिळेल. जा." शेवटचं 'जा' एखाद्या कुत्र्याला हाकलावं तशा हेकट आवाजात त्या पुजाऱ्याने त्याच्या तोंडावर फेकलं आणि त्याला गाभाऱ्यातून बाहेर काढलं. पण त्याचं त्याला काही सोयरसुतक नव्हतं. या वैराण अवस्थेतून आपली सुटका होणार आहे आणि चिरंतन काळासाठी आपल्याला चिल करायला मिळणार आहे या विचारानेच तो भारावून गेला होता... ~ चिठीवर लिहिलेला पत्ता शोधीत तीस दिवस तीस रात्री पायपीट करत तो एकदाचा त्या एरियात पोचला. शहरापासून खूप दूर एका हायवेशेजारच्या उघड्याबोडक्या डोंगरावर उभ्या केलेल्या त्या पाच-सहा उंच इमारती म्हणजे सगळं काही आलबेल चालू असताना डिस्टोपियन जगाचं पांघरूण अंगावर घेऊन कोपऱ्यात कुठेतरी बसल्यासारख्या भयाण आणि भकास वाटत होत्या. त्यांच्या खिडक्या म्हणजे डोळे काढून निव्वळ उरलेल्या अंधाऱ्या खाचा आहेत असं भर दिवसासुद्धा वाटे. कातरवेळ सरल्यावर तर त्या जागी असलेल्या थोड्याथोडक्या झाडांमधून जे काही उरलंसुरलं चैतन्य असे, तेही निघून जाई आणि सगळं आसमंत स्तब्ध होऊन जाई. अशा एरियात आपल्याला चिरंतन चिल कसं मिळणार ही शंका त्याच्या मनात उपस्थित झाली नसती तरच नवल होतं. पण तो चिरंतन चिलसाठी कुठेही जायला तयार होता आणि त्याला ते कसल्याही परिस्थितीत हवंच होतं, त्यामुळे फार विचार न करता तो त्या अजस्त्र इमारतींच्या रिंगणात शिरला. त्या इमारती बांधल्याच अशा होत्या की मधल्या पॅसेजमध्ये कायम अंधारच असे. तो मधोमध येऊन उभा राहिला आणि त्याने सभोवार नजर फिरवली. त्याच्या चहुबाजूंनी असंख्य काळवंडलेल्या खिडक्या होत्या आणि त्या खिडक्यांमधून हजारो डोळे आपल्याकडेच रोखून बघतायत असा भास त्याला झाला. त्याने वर बघून हात हलवून 'हाय' करायचा अस्फुट प्रयत्न केला तशी सगळ्या खिडक्यांमधली डोकी पटकन आत गेली आणि सगळ्या इमारती निर्मनुष्यच झाल्या जणू. त्याला काय करावं कळेना. त्याने चिठीवरचा फ्लॅट नंबर काय आणि विंग कोणती ते वाचलं आणि तो एका इमारतीच्या अंधाऱ्या बोळातून आत शिरला आणि हलक्या पावलांनी जिना चढू लागला. जिना चढत असताना प्रत्येक बंद फ्लॅटमधून मोठ्याने टीव्हीचे आवाज येत होते. कुठेतरी डोरेमॉन चालू होतं, कुठेतरी गाणी लागली होती, मधूनच सिरीयलचं विव्हळणं ऐकू येत होतं. या सगळ्या आवाजांत एक अंतःस्थ कारुण्य दडलंय हे त्याला का जाणवलं माहीत नाही, पण जाणवलं. अनेक जिने चढून तो एकदाचा त्या विशिष्ट फ्लॅटपाशी आला. या अतिसामान्य वाटणाऱ्या फ्लॅटमध्ये आपल्या प्राक्तनाचं भाकीत कसं काय लिहिलं गेलंय हा राहून राहून त्याला प्रश्न पडत होता, पण त्या प्रश्नापेक्षा पुढे काय वाढून ठेवलंय याचं कुतूहल जास्त होतं. त्याने पुन्हा एकदा चिठी वाचून फ्लॅट नंबरची खात्री करून घेतली आणि बेल वाजवली. जणू त्याच्या बेल वाजवण्याची वाटच पाहत आतली व्यक्ती थांबली होती, इतक्या अधीरतेने दार उघडलं गेलं आणि अंधाऱ्या खोलीतून दोन हात बाहेर आले. त्या हातांनी एक परात तोलून धरली होती आणि परातीत पाणी होतं. पाण्यावर प्लास्टिकच्या चिंध्या, वेफर्सची रिकामी पॅकेट्स, बिस्किटांचे रिकामे पुडे तरंगत होते. ते पाणी त्या हातांनी त्याच्या सर्वांगावर उडवलं आणि परात आत घेतली. "आत या." आतून आवाज आला. मागोमाग उत्साहदर्शक हसू. या परातीच्या प्रकरणाने तो जरा भेदरल्यासारखाच झाला होता, पण तो आत आला. मागोमाग दबक्या पावलांनी मीही आत शिरलो. कोणाच्याही नकळत एका कोपऱ्यात उभा राहिलो. त्याचवेळी ट्युबलाईट लागली आणि तिचा कोरडा पांढरा प्रकाश सर्वत्र पसरला. ते घर म्हणजे सारी मिळून एक खोली होती. त्यातच किचन, त्यातच मोरी, त्यातच पलंग खुर्च्या वगैरे. पांढऱ्या प्रकाशात त्याला पाहून त्या घरातली दोन जाडजूड पांढरीफटक मुलं टाळ्या वाजवत आनंदाने नाचू लागली. त्या घराचा मालक आणि मालकीणदेखील इतकी जाड आणि पांढरेफटक होते की या मंडळींनी हे घर गेल्या कित्येक वर्षात सोडलंच नाहीय, यांना उन कधी लागलंच नाहीय असं वाटावं. वाटायला कशाला हवं? तसंच होतं ते. या दरम्यान त्याने नोटीस केलं की इतर सगळ्या घरांतून जसा टीव्ही होता, तसा यांच्या घरी दिसत नव्हता आणि बाहेर उभं असताना त्याचा आवाजही आला नव्हता. पण त्याने तो विचार झटकला आणि त्यांना आपली समस्या कशी सांगावी या विचारात तो शब्द जुळवत असतानाच घराच्या मालकाने हसत हसत त्याला धरलं आणि एका भिंतीपाशी उभं केलं. "अहो काय करताय तुम्ही?" त्याच्या तोंडून प्रश्न फुटला. तो पुरता गोंधळूनच गेला होता. पण त्याला काय म्हणायचंय याची कोणीही पर्वा करत नव्हतं. जाडजूड मालकीणबाई किचनमध्ये जाऊन घिसडघाईने खाण्याचे पदार्थ ताटात भरत होती. तिचा नवरा आणि दोन मुलंही लगबग करीत खुर्च्या, पलंग यांची हलवाहलव करत होते. त्याला हे काय चाललंय काही कळेना. तो काहीशा उद्विग्नतेने त्यांना त्या चिठीबद्दल आणि त्याच्या समस्येबद्दल सांगायला जाणार होता तेवढ्यात त्याला लक्षात आलं की आपल्या तोंडातून आवाज फुटत नाहीये. इतकंच नव्हे, तर आपण ज्या भिंतीला टेकून उभे आहोत त्या भिंतीत आपल्या शरीराचा जेवढा भाग भिजला होता तो एखाद्या झाडाने आपली पाळंमुळं रुजवावीत तसा रुजत चाललाय आणि आपल्याला हालचालही करता येत नाहीये. हे इतक्या कमी वेळात घडलं की त्याला विचार करायला उसंतही मिळाली नाही. आपलं डोकं ताणलं जाऊन त्याचा आकार बदलतोय, सपाट होतोय हेही त्याला जाणवलं आणि आता तो उरलेसुरले त्राण एकवटून जोरात ओरडणार होता तेवढ्यात त्याच्या उघड्या तोंडातून डोरेमॉनचे डायलॉग्स मोठमोठ्याने निघू लागले. समोर खुर्चीत आणि पलंगावर खायला ढीगभर स्नॅक्स घेऊन फतकल मारून बसलेल्या त्या चार जाड अवाढव्य माणसांच्या बटबटीत डोळ्यांवर आणि तुकतुकीत आनंदी चेहऱ्यावर त्याच्या तोंडातून ट्युबलाईटपेक्षाही अधिक पांढरा असलेला टीव्हीचा उजळ प्रकाश फेकला गेला आणि ते मोठमोठ्याने हसत खिदळत, वेफर्सचे करकर मचमच आवाज करीत एकाचवेळी तृप्त आणि अधाशी डोळ्यांनी टीव्ही पाहू लागले... हे दृश्य बघून मी स्तब्ध झालो होतो. त्याचं तोंड फाकून बेचाळीस इंचाचा आयत झाला होता, तोंडाची स्क्रीन झाली होती आणि छातीवर व्हॉल्युमची बटणे स्पष्ट दिसत होती. ती चार माणसे इतक्या तल्लीनतेने त्याला बघत होती की एवढ्या वेळात त्यांचं माझ्याकडे लक्षही गेलं नव्हतं. तो नजरेनेच मला इशारे करू पाहत होता आणि ‘मला इथून सोडव’ असं सांगत होता. पण त्या टीव्ही पाहण्यात रमलेल्या चार अवाढव्य माणसांचं मनोरंजन ब्रेक करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी घाईघाईने माझी कथा इथेच उरकली आणि लगबगीने त्या घरातून बाहेर पडलो. त्याच्या तोंडून निघणारे डोरेमॉनचे कार्टूनिश डायलॉग्स अजूनही माझ्या कानावर पडत होते आणि ते मला किंकाळ्यांसारखे भासत होते. मी शक्य तितक्या घाईने तिथून बाहेर पडलो, एकदाही मागे वळून न बघता शहराच्या दिशेने चालत राहिलो…! मनोरंजन लेखक : सुजय जाधव फोन: ८०९७५३४१२८ कथेचे सर्व हक्क SWA अंतर्गत सुरक्षित
  1. Jibberish Katha
  2. Absurd
विद्रूप माणसांच्या गर्दीत अडकलेला झॉम्बी
माझ्या चहुबाजूंनी माणसंच माणसं आहेत. निबिड अरण्यातही जास्तीची गिचमिड व्हावी तितक्या दाटीवाटीने माणसं माझ्या आजूबाजूने उभी आहेत. म्हणजे फक्त माझ्याच आजूबाजूने नाही; हा असा घट्ट, दाट समुद्र माझ्या पुढे आणि मागे दूरपर्यंत पसरलाय. कडेने उंच इमारती उभ्या आहेत आणि मधल्या प्रशस्त रस्त्याचा आणि फुटपाथचा इंच न् इंच माणसांनी व्यापलाय. एकाच दिशेने तोंड करून ही माणसं मूकपणे माना खाली घालून अतिशय संथगतीने चालली आहेत. काहींच्या हातात झेंडे, फलक वगैरे आहेत. त्यावर काहीबाही लिहिलंय. ते बघण्यात वा वाचण्यात मला बिलकुल स्वारस्य नाही. माझा चुत्यापा नडला म्हणून मी या प्रवाहात हकनाक अडकलोय. आता इथून बाहेर पडणं मुश्किल होऊन बसलंय. इतक्या माणसांची मला बिलकुल सवय नाही. उलट तिटकाराच आहे मला गर्दीचा, माणसांचा. मी अत्यंत अनईझी झालोय. माझा श्वास गुदमरतोय. पुढे, मागे, चोहीकडे नुसते चेहरे, खांदे, छात्या, टोप्या...नाकं... त्यांचे उष्ण उच्छ्वास... परक्यांचं सजीवपण असं माझ्या इंद्रियांना खेटून असलेलं. इंद्रियांवरून संथगतीने लिबलिबित अळ्यांसारखं सरकत असलेलं. माझ्या डाव्या हाताला चार ढांगांच्या अंतरावरच फुटपाथ आहे, तिथे मला पोचायचंय. तिथून मी कुठलाही चिंचोळा बोळ गाठून या समुद्रातून निसटू शकतो. पण हे चार ढांगांचं अंतर चार मैलांइतकं होऊन बसलंय. एकवेळ जोरदार कोसळणाऱ्या धबधब्यातून वर चढत जाणं सोपं, पण इतक्या घट्ट माणसांच्या गर्दीतून आडवीतिडवी वाट काढत हव्या त्या जागी जायचं म्हणजे प्रचंड अवघड. नाही म्हणायला मी फार पूर्वी बोरिवली लोकलमधली प्राईम टाईमची अतोनात गर्दी पाहिलीय, त्यांच्यातून वाट काढत मी इच्छित स्टेशनवर उतरण्याचं धाडसही केलंय, पण तिथली गोष्ट वेगळी. तिथल्या लोकांची धक्के खाण्याची, बॉड्या पिरगळवून घेण्याची मनस्थिती झालेली असते. इथे तसं नाही. हा गारठ्याने गोठलेल्या तुपाइतका घट्ट जनसमुदाय भेदायचा कसा? त्यातून यांची मनस्थितीही तणावपूर्ण आहे. हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले, लाखोंच्या संख्येने इथे जमलेले तमाम विद्रुप लोक उगाच टाईमपास म्हणून इतका भव्य मोर्चा नाही काढत आहेत. आता, ही घटना तुमच्या जगात घडत असती तर तुम्ही या लोकांना विद्रुप अजिबात म्हटलं नसतं. किंबहुना यातले काही लोक तर तुम्हाला सुंदर, सेक्सी, हॉट वगैरेही वाटले असते. पण ज्या जगात उभा राहून मी ही परिस्थिती तुम्हाला सांगतोय, ते जग वेगळं आहे. या जगातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि आमची एकमेकांना जज करण्याची कारणंही वेगळी आहेत. आमच्या जगात विद्रुप आणि सुंदर कशाला म्हणायचं याच्या व्याख्या पार बदलून गेल्यात. का आणि कशा या प्रश्नांची उत्तरं चांगली लांबलचक आहेत. त्याबद्दल बोलायला एरवी खरंतर मला मजा आली असती पण आत्ता माझी अवस्था वेगळी आहे. माझ्या पोटात भुकेने भलंमोठं खिंडार पडलंय आणि तहानेने घसा सुकून घशात गरम वाळू भरल्यासारखं झालंय. त्यामुळे माझी अगतिकता आणि अस्वस्थता उसळी मारून नवे नवे उच्चांक गाठतायत. मी काल रात्रीपासून उपाशी आहे आणि आता तर दुपार होत आलीय. मी अडीच-तीन तासांपूर्वी छान भरपेट नाश्ता करायचा म्हणूनच रूमच्या बाहेर पडलो होतो. विद्रुप लोकांचा मोर्चा आजच निघणार आहे हे मी सपशेल विसरलो होतो. नाश्ता करायला माझ्या नेहमीच्या ठिकाणी न जाता आज दुसरीकडे जाऊन काहीतरी चमचमीत खायचं म्हणून मी मेन रोडजवळ आलो तर मला हा भलामोठा समुद्र दिसला. तेव्हा खरंतर इतकी दाट गर्दी नव्हती. माणसामाणसामध्ये जरा अंतर होतं. तरी ती गर्दीच म्हणा. मी म्हटलं उगाच या गिचमिडीत कशाला सामील व्हा? मी लगेच चमचमीत खायचा प्लॅन ड्रॉप करून नेहमीच्या ठिकाणी जायचं ठरवलं, आणि तेवढ्यात मला आठवलं की खिशात पैसेच नाहीयेत! आणि आमचा अण्णा तर उधारी बिलकुल ठेवत नाही. शिवाय मलाही उधारी वगैरे प्रकरण बिलकुल पटत नाही. उपकार हवेत कशाला कोणाचे? पैसे घे, माल दे, विषय संपव, असा ठोक व्यवहार असतो आपला. आमच्या जगात फक्त कॅश चालते असं मात्र नाही. ऑनलाईन पेमेंटची सोय आमच्याकडेही आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की माझ्या फोनची बॅटरी डेड झालीय आणि फोन स्विच ऑफ आहे. झालं असं की मी काल संध्याकाळी मित्राच्या रूमवर दारू प्यायला गेलो आणि फुल फकाट होऊन रात्री उशिरा माझ्या रूमवर आलो. तोपर्यंत इलेक्ट्रिसिटीचा टँकर आमच्या गल्लीत येऊन गेला होता. खरंतर मी मित्राकडे असताना त्याच्याही बिल्डिंगखाली तो आला होता. आम्हाला त्याचा आवाजसुद्धा आला वरती. टणटणटणटण असा. पण त्यावेळी आमचं फुल जामस्थ देवस्थान होऊन गेलं होतं. खाली जाऊन टँकरला फोन लावून चार्ज करून घ्यायचं आमच्या डोक्यातच आलं नाही. आम्ही मोठ्याने गाणी म्हणत ग्लास डोक्यावर घेऊन नाचत होतो. आता तुम्हाला हे टँकरचं प्रकरण थोडं विस्कटून सांगितलं पाहिजे. पण मला आत्ता प्रचंड भूक लागलेली असल्यामुळे अगदी शॉर्टमध्ये सांगतो. आमच्याकडे तुमच्यासारखी लाईटची सोय नाही. आमच्या जगात वीजपुरवठा असा टँकरने होतो. तुमच्याकडे जशी सकाळी घंटागाडी फिरते कचरा गोळा करत, तसा ठरलेल्या वेळी आमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा टँकर येतो. तो आला की मग सगळ्यांनी धावतपळत आपले गॅजेट्स घेऊन तिथे जायचं आणि टँकरच्या अगडबंब स्तनाला चार्जरची तोंडं लावायची. जास्तीत जास्त तासभर चार्जिंग करता येतं. ते दुसऱ्या दिवशीपर्यंत पुरवायचं. पॉवर बँक चार्ज करून इलेक्ट्रिसिटीचा साठा करणे हा आमच्याकडे कायद्याने गुन्हा आहे. तरी काही लोक टँकरवाल्याला पैसे चारून, सेटिंग लावून ते करतातच. फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर हेही चार्ज करता येण्याची सोय आहे. पण सगळं फार जपून वापरावं लागतं, नाहीतर अर्धा दिवससुद्धा चार्जिंग पुरत नाही. दिवे मात्र आम्हाला सरकारकडून मिळतात. ते आम्ही घरात लावतो. पण त्यांना चालू-बंद करणं आमच्या हातात नाही. स्ट्रीटलॅम्पसारखे ते योग्य वेळी अज्ञात सरकारी कर्मचारी चालू करतो, पहाटे फटफटू लागलं की बंद करतो. असं आणखी बरंच कायकाय. पण विषय फार नको वाढवायला. माझ्या पोटात अपॉकलिप्स आलंय. आतून रिकामपण धगधगतंय, त्यामुळे मी जास्तच अस्वस्थ होतोय. सांगायचा मुद्दा हा की फोन स्विच ऑफ असल्यामुळे ‘गूगलपे’ने पैसे चुकते करण्याचा मार्गही बंद झाला माझ्यासाठी, म्हणून मी नाईलाजाने एटीएम मधून पैसे काढायचे ठरवले आणि तिथेच मी चुकलो. सगळ्यात जवळचं एटीएम हे मेन रोड क्रॉस करून पलीकडच्या कॉम्प्लेक्समध्ये होतं. मला वाटलं या रस्त्यावरच्या गर्दीतून जरा वाट काढत गेलो तर पटकन पैसे काढून होतील आणि त्याच कॉम्प्लेक्समध्ये हॉटेल आहे तिथेच खाणंही होईल. आय झौ जाम भूक लागलीय! काल दारू इतकी प्यायलो की जेवायचं भानही राहिलं नाही. काल रात्रीपासून पोटात अन्नाचा कण नाही. त्यातून दारूमुळे बॉडी कम्प्लीट डीहायड्रेट आहे ते वेगळंच. आता हे लक्षात आल्यावर तहानदेखील क्रुद्ध होऊन घशात वस् वस् करू लागलीय. तर या रस्त्यावरच्या गर्दीतून वाट काढत एटीएममध्ये जायचं म्हणून गर्दीत घुसलो आणि इथेच अडकलो. हा हा म्हणता गर्दी वाढली, गोठलेल्या तुपासारखी घट्ट झाली आणि मी ना या काठाला पोचलो, ना त्या काठाला. आता अडीच तास होत आलेत आणि मी इथेच अडकून पडलोय. नाही म्हणायला थोडा पुढे सरकलोय. पण या दिशेने सरकून काही फायदा नाही. मला प्रवाह भेदून तिरपं जायची गरज आहे. पण ते सहज शक्य नाही. माझा कोंडमारा होतोय. मला माणसं, शरीरं, उच्छ्वास, घामाचा दर्प, जिवंतपणा या सगळ्याची किळस येऊ लागलीय. भरीत भर म्हणून ऊन डोक्यावर तांडव करू लागलंय. बाहेरून उन्हाच्या झळा आणि पोटातून आगीच्या ज्वाळा. माणसाचं जनावर होणार नाही तर काय? पण मला स्वतःला आवरून धरणं फार गरजेचं आहे. अगतिकतेमुळे झालेली एक चूक माझ्या जिवावर बेतू शकते. मी चुकून एखाद्याला काही बोललो, धक्का जरी दिला तरी एका क्षणात ही शांतपणे चाललेली माणसं पिसाळलेल्या जनावरासारख्या डरकाळ्या फोडतील आणि मला पायाखाली तुडवून तुडवून मारतील. आता ही इतकी शांत दिसणारी मंडळी आतून इतकी अस्वस्थ का आहेत हे सांगायला पाहिजे. फुटपाथ गाठण्याचा सौम्य प्रयत्न चालू ठेवत मी ही माणसं कुठे चाललीयत, यांची समस्या काय आहे, हे काय घडतंय वगैरे सांगायचा माझ्या परीने प्रयत्न करतो. आमच्या जगातही तुमच्यासारखं सोशल मीडिया आहे, त्याचा अतिरेक आहे, आभासी जग आणि खरं जग यातली रेषा पुसण्याचा प्रयत्न वगैरेही आहे. आमच्याकडेही काही काळापूर्वी सगळं तुमच्यासारखं सुरळीत चालू होतं. माणसं सोशल मीडियाचा वापर चुत्यासारखी करत होती. वापर करकरून करकरून मठ्ठ बनत होती. त्यातच सोशल मीडियावर आयुष्य शेअर करताना 'फिल्टर' नावाचं जे प्रकरण उदयाला आलं, त्याने सगळा घोळ केला. सगळ्यांना फिल्टरचा नाद लागला. सगळ्यांना स्टोऱ्या-स्टेटसमध्ये सुंदर दिसायचं होतं, डागरहित दिसायचं होतं. टपोरे डोळे, छान नाक, गोरीपान त्वचा, रेखीव जबडा वगैरे वगैरे. मग जसजसं फिल्टर वापरण्याचं प्रमाण वाढू लागलं तसे Paid Filters निघू लागले. सौंदर्य विकत घ्यायचं. ते वापरणारा/री तर म्हणजे लावण्याचा पुतळाच दिसणार. पण यामुळे झालं असं की वास्तव जगात माणसं स्वतःला accept करायला नकार देऊ लागली. खऱ्या आणि फिल्टरवाल्या चेहऱ्यातली तफावत बघून डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. ही जगभरातली मोठी समस्या होऊन बसली. मग यावर उपाय म्हणून आणखी एक मोठा गेम चेंजिंग अपडेट आला आमच्या जगामध्ये. खऱ्याखुऱ्या रिअल लाईफमध्ये वापरता येतील असे फिल्टर्स बाजारात येणार! वेट नॅपकिनसारखे ते तलम ओलसर पापुद्रे असणार जे अलगद चेहऱ्यावर लावायचे. ते पापुद्रे आपोआप वापरणाऱ्याचा नाक-जबडा-हनुवट ठाकठीक करणार. रंग उजळ करणार. चेहरा अगदी सुंदर करून टाकणार! आमच्या जगात हे नॅपकिन्स तयार करणाऱ्या तीनच कंपन्या होत्या. त्यांचं वर्षभराचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागे. ते भलतंच महाग होतं. या सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वर्षाला एकूण चार पॅकेट्स मिळणार. एक पॅकेट तीन महिने वगैरे पुरतं. त्यामुळे सुंदर होणं हे सोशल मीडियावर जितकं सोपं होतं तितकं खऱ्या आयुष्यात नव्हतं. तरी घेणारे घेतातच म्हणा. इतर देशांमध्ये हे फिल्टर्स कशा पद्धतीने विकले गेले मला माहित नाही, पण आमच्या देशात जेव्हा हे प्रकरण आलं, तेव्हा ते आणखी किचकट होऊन आलं. कंपन्यांनी केंद्र सरकारसोबत संगनमत करून आमच्या देशासाठी आणखी काही नियम घातले. त्यातला महत्वाचा नियम म्हणजे अमुक एक लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना हे फिल्टर्सचं सबस्क्रिप्शन नोकियाचा फोन घ्यावा तितक्या कमी पैशात मिळणार! त्याहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांना मात्र आयफोन 11 ची किंमत द्यावी लागणार. सुरुवातीला या नियमाला घेऊन काही प्रमाणात असंतोष व्यक्त झाला. एका उच्चभ्रू व्यक्तीने तर मुद्दाम असं खोचक ट्विट केलं की ‘गरीब लोक गरिबीमुळे मुळातच विद्रुप असतात. त्यामुळे त्यांना स्वस्तात सुंदर दिसूदे. आम्ही काय, पहिल्यापासून देखणेच आहोत.’ त्याला नंतर लोकांनी चांगला चोपला. त्याचं अकाऊंट ब्लॉक झालं वगैरे. पण अशी उलटसुलट काहीही प्रतिक्रिया उमटली तरी नियम काही बदलला नाही. खरंच ज्यांचं उत्पन्न ठरवलेल्या लिमिटपेक्षा कमी होतं, त्यांनी भसाभस सबस्क्रिप्शन्स घेतले. ज्यांचं उत्पन्न जास्त होतं आणि जे भिकारचोट होते त्यांनी खोटे दाखले आणून स्वस्तात सबस्क्रिप्शन घेतलं. जे भरपूर सधन होते, त्यांना तर आयफोन 11ची किंमत देऊन सबस्क्रिप्शन घेणं सहज शक्य होतं. त्यांनी तसं घेतलं. राहता राहिले ते मधले लोक ज्यांना उत्पन्नाचा खोटा दाखला पैदा करणं अशक्य होतं आणि आयफोन 11ची किंमतही परवडण्यासारखी नव्हती. त्यांची मधल्यामध्ये मोठी गोची झाली. त्यांनी या मुद्द्याला घेऊन सोशल मिडिया आणि वृत्तपत्रातून थोडीफार कुरकूर केली, पण तेवढीच. त्याचा काही फायदा झाला नाही. त्यांना आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं भाग झालं. मग त्यांनी स्वतःला समजावलं की ठीक आहे ना. नैसर्गिक सौंदर्य ते नैसर्गिक सौंदर्य. आपण नैसर्गिक सौंदर्याचे पुरस्कर्ते. मग काही काळ असाच गेला. मधल्या काळात काही अलिखित नियम आणि जनरल प्रेफरन्सेस असे तयार झाले, की त्यामुळे खूप मोठा लोचा झाला. तो होईल अशी आयडिया कुणालाच नव्हती. आयला आता लोचा पण सांगितला पाहिजे नाय का. त्या लोचामुळेच तर एवढी जनता इथे एकत्र जमलीय. माझ्या पोटातले अवयव आता एकमेकांना खायला उठलेत आणि ऊन मला वितळवायला लागलंय. अद्याप मी फूटपाथच्या दिशेने एकच पाऊल टाकू शकलोय. पण ठीक आहे, सांगतो. सबस्क्रिप्शन घेतलं की जे चार पॅकेट्स मिळायचे, त्यातले फिल्टर वर्षभर डेली वापरता यायचे. त्यामुळे दृष्टीदोष असणारी माणसं जशी उठल्या उठल्या चष्मा लावतात आणि झोपतानाच काढतात, तसं आमच्या जगात या फिल्टरला घेऊन झालं. झोपण्याचा आणि अंघोळीचा टाईम सोडला तर माणसं पूर्णवेळ फिल्टर लावूनच जगू लागली. मग या रेखीव, उजळ, डागरहित, तुकतुकीत चेहऱ्यांची सगळ्यांनाच सवय झाली. खरे चेहरे फिल्टर्सनी रिप्लेस केले. मग अर्थातच, जे लोक फिल्टर्स वापरत नव्हते, त्यांना बघून फिल्टरवाली मंडळी नाकं मुरडू लागली. त्याचंही सुरुवातीला नॉन-फिल्टरवाल्या लोकांना फार काही वाटलं नाही, त्यांनी समजून घेतलं. पण नंतर नंतर लोचा वाढत गेला. फिल्टर न वापरणाऱ्यांना सरळसरळ विद्रुप म्हटलं जाऊ लागलं. त्यांना डावललं जाऊ लागलं. फिल्टर्स वापरणारी जनता तशी बक्कळ होती, सर्वत्र होती, त्यामुळे त्यांचीच चलती झाली. बरं दिसणं, ओके ओके दिसणं वगैरे चेहऱ्यांचे विविध प्रकार लुप्त झाले. एकतर सुंदर नायतर विद्रुप. याचा परिणाम सर्व स्तरांवर झाला. पेपरमध्ये वधू पाहिजे, वर पाहिजे सेक्शनमध्ये ठळक अक्षरात अशी अट पडू लागली- ‘फिल्टर्सचं सबस्क्रिप्शन असणाराच मुलगा/मुलगी पाहिजे!’ कॅफे, पब, मोठमोठी हॉटेल्स इथे वेटर, रिसेप्शनिस्ट म्हणून फक्त फिल्टर वापरणाऱ्या लोकांनाच जॉब दिले जाऊ लागले. मालिका-चित्रपट क्षेत्रात फिल्टर न वापरणाऱ्या ‘सो-कॉल्ड विद्रुप’ नट-नट्यांना ऑडीशन न घेताच रिजेक्ट केलं जाऊ लागलं. International schools आणि collegesमध्ये फिल्टर्सचं सबस्क्रिप्शन असणारा उमेदवारच शिक्षक म्हणून पाहिजे असं management आणि पालकसुद्धा सांगू लागले. हे लोण मग आणखी सैरावैरा वाढत गेलं. कित्येक फिल्टर्स वापरणाऱ्या कुटुंबांनी family doctor विद्रुप आहे म्हणून त्याच्याकडे जाणं बंद केलं. ट्रेन आणि विमानांमध्ये फिल्टर न वापरणाऱ्यांना अनेकवेळा फर्स्टक्लासची तिकिटं नाकारली गेली. हा वर्ग या सगळ्या गोष्टींमुळे अधिकाधिक डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. त्यांचे जॉबचे वांधे झाले, स्वाभिमानाचे वांधे झाले. तर हा लोचा. आणि आपल्यावर होणाऱ्या या अन्यायामुळे विद्रूप लोकांनी काढलेला हा भव्य मोर्चा. अनेक वर्षे वैयक्तिक, सामाजिक पातळीवर अवहेलना, राग, दुजाभाव, अन्याय सहन करून फायनली ते ह्या फिल्टर कल्चर विरोधात एकत्र आलेत. ते प्रचंड चिडलेले आहेत. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा म्हणून एकत्र आलेत. आणि त्यांच्या मोर्चात मी असा हकनाक सापडलोय. माझ्याकडून थोडी जरी चूक झाली तरी इथे दंगल उसळू शकते. याचं कारण निव्वळ माझी भूक आणि वाढत चाललेली अगतिकता नाहीय. आणखी एक महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं नाही. काल मित्राकडे दारू प्यायला जात असताना तिथे त्याच्या काही मैत्रिणीही येणार होत्या म्हणून मी त्यांच्यावर इम्प्रेशन पाडायला फिल्टर लावून गेलो होतो! मीही खरंतर फिल्टर परवडू न शकणाऱ्या माणसांपैकीच एक आहे, पण माझी एक्स गर्लफ्रेंड फिल्टर वापरणाऱ्या वर्गातली होती. तिने माझ्या वाढदिवसाला तिच्या पॅकेटमधले चक्क तीन फिल्टर मला दिले होते. त्यातलाच एक लावून काल मी गेलो होतो. मग आज सकाळी उशिरा उठलो, खूप भूक लागली म्हणून नुसतंच तोंडावर पाणी मारून बाहेर पडलो. त्यामुळे फिल्टरची पुटं अजून माझ्या चेहऱ्यावर उरली आहेत. ती गर्दीतल्या बऱ्याच विद्रुप लोकांनी अचूक हेरली आहेत. माझ्याबद्दल त्यांच्या मनात रागाची एक जबरदस्त ठिणगी पडली असणार हेही उघड आहे. त्यामुळे मी काहीही चुकीची हालचाल केली तर मला जीव जाईस्तो मार पडू शकतो हे मी जाणून आहे. पण मी काय करू? माझंही जनावर होत चाललंय. माझ्या डोळ्यात रक्त उतरलंय. मी भूक सहन न होणारा माणूस आहे. डोकं गरगरू लागलंय माझं. या विद्रूप लोकांच्या माना, खांदे, कान, हनवट्या, गाल- माझ्या तोंडाच्या कितीतरी जवळ आहेत. मी न राहवून एखाद्याच्या मानेचा लचका तोडला तर? आयुष्यात कधीही न खाल्लेल्या कच्च्या मांसाची चव माझ्या तोंडात रेंगाळू लागलीय. माझा झोंबी होऊ लागलाय. आधी मी या माणसांना वचावचा खाईन मग हे मला वचावचा खातील... -हे असंच घडणार यावर माझा विश्वास बसू लागलाय. मी हळूहळू या परिणामाला तयार होऊ लागलोय. पोट म्हणतंय आता कच्चं मांसच पाहिजे. घसा म्हणतोय आता पाणीबिणी नाय, गरम रक्तच पाहिजे. मी नकळतपणे मला खेटून उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर माझे ओठही टेकवलेत. तोडू काय लचका? एवढ्यात माझी नजर त्या गर्दीत निर्माण झालेल्या एका बारीक फटीकडे जाते आणि त्या फटीतून दिसणाऱ्या फुटपाथजवळच्या एका निर्मनुष्य बोळावर जाते. निर्मनुष्य बोळ! तोही इतका जवळ, इतक्या आवाक्यात! या भुकेच्या आणि झोंबी होण्याच्या नादात मी असा इच्छित स्थळाच्या जवळ कधी पोचलो हे मलाच समजलं नाही! तो समुद्र दुभंगणारा कोण तो माणूस- च्यायला नाव आठवेना- त्याच्यासारखंच झालं हे. मला कुणा अज्ञात शक्तीने गर्दीत फट निर्माण करून दिली आणि कल्टी मारायला बोळ निर्माण करून दिला. मला आता कशाचीच, कुणाचीच पर्वा नाही. मी न भिता माणसांना बाजूला सारत, त्यांच्या पायावर पाय देत त्या फटीतून वाट काढत बोळाच्या दिशेने जातो. इरिटेट झाल्याचे काही आवाज माझ्या कानावर पडतात पण भोकात गेले ते. मला भूक लागलीय, मला खायचंय. चार ढांगातच मी तो बोळ गाठतो आणि त्या निर्मनुष्य बोळातून वाहणारा गार वारा छातीत भरून घेत सुसाट पळू लागतो. इथून अण्णाचं दुकान फार लांब नाही. थोडा वळसा घालून गेलं की आलंच. मी पोटातली आग आणखी भडकू देतो. तहानेला आणखी तापू देतो. आज एवढा खाणार की बासच. कोल्ड्रिंक, ज्यूसबीस एवढा पिणार की विषयच नाय. आज अण्णा काहीही म्हणूदे, त्याला बोलणार आई घाल तुझी नाय देत पैसे. गपचूप उधारी ठेव. अंगात त्राण नसल्यामुळे मला चांगलीच धाप लागलीय पण तरी मी धावतोय. एक बोळ-दोन बोळ करत, आडवीतिडवी वळणं घेत फायनली मी अण्णाच्या दुकानापाशी येऊन पोचतो. पोचतो, समोर बघतो आणि धाप लागलेली असतानाही माझा श्वास अडकतो. मी अण्णाच्या बंद दुकानाकडे बघत ढिम्म उभा राहतो. भेंचो दुकान बंद? शटरवर एक कागद चिकटवलाय त्यावर लिहिलंय- ‘आज फिलटर न वापरनाऱ्यांचा मोर्चा निघणार असल्यामुळे दुकान संध्याकाळपर्यंत बंद राहील.’ आणि मला कळून चुकतं की आज सगळीच दुकानं बंद आहेत. कुठेही खायला मिळणार नाही. माझं डोकं सुन्न होतं. भवताल म्युट होतं. अचानक माझ्या पोटात डेंजर लेव्हलची कळ येते आणि मी डोळे गच्च मिटून घेतो, पोट आवळत खाली बसतो. माझ्या पोटातून काहीतरी सळसळत वर येतंय असं मला डोळ्यांपुढच्या अंधारातही जाणवू लागतं. ते सळसळणारं काहीतरी वेगाने वर येतं आणि माझ्या डोळ्यात येऊन साठतं. मी डोळे उघडतो. ते लालभडक झालेत. त्यांत माणूसपणाचा लवलेशही नाहीय. मी लटपटणारे पाय घेऊन उभा राहतो. एक दीर्घ श्वास घेतो. माणसांची गर्दी ज्या दिशेने आहे त्या दिशेने माझे पाय आपोआप वळतात. माझ्या नाकपुड्या फुलतात आणि मी माणसांच्या समुद्राकडे अमानवी वेगाने पळू लागतो.
  1. Jibberish Katha
  2. Fantasy
जागी झालेली माणसे कुठे जातात?
आज बऱ्याच दिवसांनी त्याने जुन्या पेंटिग्सवरची धूळ झटकली होती आणि रंगाचे सामान पुन्हा वर काढले होते. पण बहुतेक सर्वच कलर ट्यूब्स अंगाचं मुटकुळं केल्यासारख्या आकसल्या होत्या. त्यांच्या तोंडाशी रंग सुकून दगडासारखा कठीण झाला होता. पॅलेटच्या कडेचा मोठा टवका उडाला होता आणि ब्रशचे केस वापरात नसल्यामुळे रखरखीत झाले होते. पेंटिंग्स झाकण्यासाठी वापरलेले वर्तमानपत्रांचे कागद वाऱ्याने घरभर पसरले होते. त्या दहाबारा पेंटिंग्सकडे पाहत तो बराच वेळ उभा राहिला. जुन्या कुस्करलेल्या स्वप्नांकडे पाहावे तसे तो त्या रंगीत कॅनव्हासेसकडे पाहत होता. मग मनाशी काहीतरी ठरवून तो टेबलापाशी गेला आणि त्याने पुन्हा ते ब्रोशर काळजीपूर्वक वाचायला घेतले. कुठल्याशा एका चित्रप्रेमी संस्थेने होतकरु चित्रकारांची कला पुढे आणण्यासाठी उपक्रम हाती घेतला होता. त्यांनी चित्रकारांकडून त्यांच्या पेंटिंग्सच्या प्रिंटआऊट्स मागवल्या होत्या आणि त्यातून ते प्रत्येकी सात चित्रांची निवड करुन एका मोठ्या प्रदर्शनात त्या चित्रांना स्थान देणार होते. त्याने बॅगेतून काल आणलेले चित्रांचे कलर प्रिंट्स काढले. त्यांची नीट घडी केली आणि सोबत स्वतःची माहिती लिहीलेला एक कागद घालून त्याने लिफाफा बंद केला. मग ब्रोशरवर दिलेला पत्ता लिफाफ्यावर उतरवून त्याने तो आपल्या बॅगेत ठेवून दिला. ते काम होताच त्याने घरभर झालेला पसारा आवरायला घेतला. पण तो पसाऱ्याला हात लावतो न लावतो तोच त्याचा फोन वाजला. टेबलवर ठेवलेल्या फोनवर झळकणारे नाव त्याने दुरुनच मान उंचावून पाहिले आणि तो त्वरेने फोनपाशी गेला. '"मीराचा फोन!? एवढ्या सकाळी?" तो स्वतःशीच उद्गारला आणि त्याने फोन उचलला. काही महिन्यांपूर्वी तो कंपनीच्या कामासाठी मुंबईला गेला होता आणि न चुकता त्याने जहांगीर आर्ट गॅलरीला भेट दिली होती. ‘मीरा नारायण’ नामक कुणा चित्रकारिणीच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते. तिची पेंटिंग्स पाहून रघू खूप प्रभावित झाला. पर्यायाने मीराही त्याच्या मनात घर करुन राहिली. त्याला आयुष्यात प्रथमच कुणाशीतरी गाल दुखेपर्यंत बोलावेसे वाटले. तो नंतर कितीतरी वेळ एखाद्या चित्राला न्याहाळावे तसे मीराकडे पाहत उभा होता, पण तिचे साधे अभिनंदनही न करता शेवटी फक्त टेबलवरचे कार्ड घेऊन तो बाहेर पडला. पुण्याला आल्यावर रघूने मीराला एक पत्र लिहीले. तिच्या चित्रसंवेदनांबद्दल, एकदोन चित्रांच्या अर्थाबद्दल त्याने बरेच काही लिहीले होते. मीराची बरीच स्तुतीही केली होती. ते पत्र लिहील्यानंतर त्याला एकदम भिजल्यासारखे वाटले. ..आणि एके दिवशी अगदी अनपेक्षितपणे मीराचे उत्तर आले. त्यानंतर मग हा पत्रव्यवहार वाढतच गेला. पाचसहा महिन्यात दोघांची ओळख गहिरी झाली. अधूनमधून फोनवर बोलणे होऊ लागले. पण अद्याप भेट काही घडली नव्हती. या एवढ्या अवधीत मीराने रघूला एकदाही पाहिले नव्हते, त्यामुळे तिला या पत्रमित्राला भेटायची जास्त उत्सुकता होती. आणि आज ही उत्सुकता संपणार होती.. ..संपूर्ण कोरा चेहरा करुन तो तिचं बोलणं ऐकत होता. मीराने आपण आज पुण्याला येणार असल्याची वार्ता दिली होती आणि तो कधी फ्री आहे, कुठे भेटू शकेल इत्यादी विचारण्यासाठी फोन केला होता. त्याने ततपप करीत काहीबाही तिला सांगितले आणि फोन ठेवला. मग धाप लागल्यासारखे सुस्कारे टाकत तो आरशापुढे जाऊन उभा राहिला. आरशातल्या राघवेंद्राकडे त्याने रागाने पाहिले. तो त्याला बरंच काही अद्वातद्वा बोलणार होता पण तेवढ्यात दार वाजतंय असं त्याला जाणवलं आणि तो दार उघडायला गेला. दारात आनंद उभा होता. "कधीचा दार वाजवतोय मी..आणि खालून पण किती हाका मारल्या. करतोयस काय?" त्याने चपला काढत म्हटले. पण चूक रघूची नव्हती. तळमजल्यावर राहणाऱ्या महाजनांच्या मुलीचे आज का उद्या लग्न होते आणि त्यांनी सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या आवाजात डीजे लावला होता. म्हणून त्याने दारे-खिडक्या गच्च लावून घेतल्या होत्या. "या गोंगाटात ऐकू आलं तर ना." त्याने त्राग्याने म्हटले. "शादीका मोसम है, चालणारच!" आनंद आत येत म्हणाला. "अरे काय चालणारच? तुमच्या लग्नाचा त्रास आम्हाला का?" "बरं बाबा असूदे. आणि हा पसारा कसला?" रघू आनंदकडे पाहून ओशाळा हसला. "काही नाही रे, बरेच दिवस सगळी पेंटिंग्स पडून होती ती काढली. मधूनमधून बघायला लागतं." "हं.. बरं, चल आटप पटकन. नाश्ता करुन येऊ." रघूने ते कॅनव्हास गोळा करायला सुरुवात केली. आनंदनेही दोनचार पेपर आणि रंग इकडचे तिकडे केले आणि तो टेबलापाशी गेला. "रघ्या हे काल SK Group चं पेमेंट मी रिसीव्ह केलं, पण मला ते देशमुखांना देता आलं नाही. तू प्लीज आज तेवढं देऊन येशील का? मीच गेलो असतो, पण मग गावी निघायला उशीर होईल मला." "मीपण आज सुट्टी घेतलीये आनंद." "हो माहित आहे, पण तू डेक्कनलाच जायचास ना आज, मग ऑफिसच्या रस्त्याने जा. जाताजाता तेवढं देऊन ये, काय?" रघूच्या उत्तराची वाट न पाहता आनंद पुढे म्हणाला, "एकेचाळीस हजार पाचशे आहेत. देशमुखांच्या हातात फक्त ठेव. विषय एन्ड." "ओके.. आण इकडे," असं म्हणत रघूने ते सफेद पाकीट घेतले आणि बॅगेच्या आतल्या कप्प्यात ठेवून दिले. राहिलेला पसारा आवरुन तो आतल्या खोलीत कपडे करायला गेला. तेवढ्यात त्याला पुन्हा मीराच्या फोनची आठवण झाली. त्याबद्दल आनंदला सांगावे का हा विचार करत असतानाच हातात एक पेन घेऊन आनंद आत आला. "रघ्या, हे तपकिरी पेन एकदम भारीतलं वाटतंय रे..." त्याने म्हटले. "हे तुला कुठे मिळालं?" "हे काय इथेच तर पडलं होतं." रघूने गडबडीने त्याच्या हातातून ते घेतलं आणि बाहेर जाऊन टेबलावर पसरलेली तिची दहाबारा पत्रं; तीही उचलली. तो हे सगळं ड्रॉवरमधे ठेवून देत असता आनंद हसू दाबत रघूसमोर जाऊन उभा राहिला. "तुझ्या मुंबईच्या मैत्रिणीने दिलं ना? गिफ्ट!?" "हो." "हं... प्रगती आहे! नाव काय रे तिचं?" "जसं की तुला माहितच नाही!" "तसं नाही, actually ते तुझ्या तोंडून ऐकायला बरं वाटतं! तुम्ही नुस्तीच पत्रं पाठवता की कधी फोनवरपण बोलता?" रघूला हा विषय काढायचाच होता, तो आयता निघाला. "अरे आत्ता दहा मिनिटांपूर्वी मीराचा फोन आला होता." "अरे वा! काय म्हणत होती?" "पुण्याला येतेय आज. कुठे भेटायचं विचारत होती." "सांगतोस काय? अप्रतिम! पाच महिन्यांच्या दीर्घ पत्रव्यवहारानंतर पहिल्यांदाच मीरा-राघवेंद्राची भेट! कुठे भेटताय मग?" "नाही ठरलं." "का?" आनंदने रघूकडे निरखून पाहिले. "तू काय सांगितलंस तिला?" "काही नाही, कळवतो म्हटलं." "अरे गाढवा, ती स्वतःहून तुला भेटायला मुंबईहून पुण्याला येतेय आणि तू तिला फक्त कळवतो म्हटलास? तुला भेटायचं नाहीये का तिला?" "बहुतेक.." "अरे पण का?" "हे बघ आनंद, अशी पत्रांमधून जुळलेली नाती दूर असलेलीच चांगली. जवळ आल्यावर ती खुलण्याऐवजी spoil व्हायचीच शक्यता असते." "अच्छा.. ही भीती आहे होय.. पण समजा ती आधीच तुझ्या प्रेमात पडली असेल तर?" "प्रेमात?" "हो, म्हणजे atleast तू तिला आवडतोस हे नक्की." "कशावरुन?" "तिच्या पत्रांवरून पाचवीतला पोरगाही सांगेल." "तू चोरुन वाचलीस!?" "तो वेगळा मुद्दा आहे. पण तू आज तिला भेटायला जातोयस." आनंदने जरबेने म्हटले. खरंतर रघूकडे तिला न भेटण्याचे ठोस असे काहीच कारण नव्हते. त्यामुळे त्याचा निर्णय डळमळू लागला. तरीही आपल्या मतावर उगाचच ठाम राहत तो म्हणाला, "आनंद तिला पत्रातला राघवेंद्र आवडत असेल पण-" "पण मी हा असा गबाळा, आयुष्यात खचलेला.. मी कसा आवडेन?" आनंदने त्याचे वाक्य पूर्ण करत पुढे म्हटले, "हे बघ रघ्या, कोणतीही पोरगी 'तू पोक काढून चालतोस म्हणून आपलं प्रेम कॅन्सल'; असं नाही म्हणत. माझं जरा ऐक. हा स्वतःबद्दलचा न्यूनगंड काढून टाक. तू काही वाईट नाहीयेस. जसा आहेस तसा उत्तम आहेस- हां, फक्त जरा पॉलिशिंग करायला पाहिजे. पण तू तिला भेटायला जातोयस, that’s it!" "हे बघ-" रघू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्याला बिलकुल बोलू न देता आनंदने चढ्या आवाजात "मला काही ऐकायचंच नाहीये," असं म्हणत रघूचा फोन घेतला आणि थेट मीराला लावला. रघू बावचळला, पण त्याला गप्प बसायची खूण करत आनंदने बोलायला सुरुवात केली- "हॅलो मीरा ना? मी राघवेंद्रचा मित्र आनंद. तो आज तुला भेटायला येतोय. तुला डेक्कनच्या आसपास यायला जमेल का? ओके, रुपाली हॉटेल माहित आहे? संध्याकाळी जमेल? ठीक आहे. मग रुपालीला सहा वाजता रघू तुला भेटेल. ओके बाय." फोन ठेवून रघूच्या हातात देत आनंदने म्हटले, "विषय एन्ड." • रघू काहीच बोलला नाही. त्याला राग आला नव्हता, उलट झालं ते एकाअर्थी बरंच झालं असं त्याला वाटत होतं. तेवढ्यात आनंदने त्याला विचारले, "अरेरे! हा शर्ट घालून जाणार आहेस होय तू?" "का? यात काय वाईट आहे?" "तिथे डाव्या बाजूला डाग पडलाय." रघूचे आत्ता लक्ष गेले. मघाशी रंगाच्या बाटल्या ठेवताना कमरेपाशी बऱ्यापैकी मोठा काळपट हिरवा डाग पडला होता. पण रघू आता इरेला पेटला. "पडू दे डाग. मी हाच शर्ट घालणार आणि असाच तिला भेटणार." एकतर तो रघूचा आवडता शर्ट होता, त्यामुळे त्या शर्टला ऑप्शनच नव्हता. निळ्या रंगाचा, कागदी टेक्श्चर असलेला शर्ट. त्यातून मघापासून त्याला आनंदचे सारखे ऐकून घ्यावे लागत होते, म्हणून त्याने इरेस पडून हाच शर्ट घालायचे ठरवले. पण तरी तो डाग दिसू नये म्हणून त्याने शर्ट इन केला. "ठीक आहे, मला काय. पण आटप रे लवकर. नाश्ता करुन मला लगेच निघायचंय गावी जायला." आनंद म्हणाला. रघूने सगळी आवराआवर केली, आणि बॅग घेऊन तो आनंदसोबत एकदाचा घराबाहेर पडला. • मामा वढावकरांच्या छोटेखानी हॉटेलात मिसळ खात दोघे बसले होते. "तू फक्त वहिनींना आणायला गावी चाल्लायस?" रघूने मिसळवर फुंकर मारीत विचारले. "नाही रे. दादाने बोलवलंच होतं मला. आमचं रानातलं घर बांधून पूर्ण झालं नुकतंच. थोडे आर्थिक व्यवहार राहिलेत. म्हणून जातोय. आणि हिच्या मावसबहिणीचं लग्न आटोपलं काल; म्हटलं थांब एक दिवस. मी येतोय उद्या, तर एकत्रच परत येता येईल." "हं.." रघूने पुन्हा मिसळीवर लक्ष केंद्रित केले आणि आनंदने त्याच्याकडे पाहून कपाळाला आठी घातली. "रघ्या, पाच-सहा महिने झाले तू आणि मीरा पत्र-पत्र खेळताय, चांगली अडीच तीन पानं भरुन पाठवता एकमेकांना आणि आता आयुष्यात पहिल्यांदा भेटताय तर जराही excitement वाटत नाहीये का रे तुला?" आनंदने गरम लोह्यावर थेट बोट ठेवूनही रघूच्या चेहऱ्यावरचे थंड भाव ढिम्म हलले नाहीत. "Excitement काय त्यात? ती येणार, भेटणार, जाणार. मला त्याहीपेक्षा महत्वाची मीटिंग आहे आज. खांडेकरांनी स्वतःहून बोलवलंय. मला त्याची excitement आहे." त्याने निर्विकारपणे म्हटले. "अच्छा! बाय द वे, मीराचा डिव्होर्स झालाय ना रे? म्हणजे चान्स आहे तुला." आनंदने तरीही किल्ला लढवत म्हटले. "प्लीज.. पॉसिबलच नाही. आमच्या वयात, स्टेटसमधे फरक आहे. शिवाय तिचा स्वभावही वेगळा आहे. म्हणजे, fun loving, party loving इत्यादी इत्यादी. चंगळसंस्कृती." "हो, आणि आपण नेमके उलटे. सदानकदा जगावर उखडलेले, एकटे राहणारे! शेजारणीच्या लग्नात गाण्यावर नाचायचं सोडून दारंखिडक्या लावून बसतोस तू." "अरे? चूक काय आहे त्यात? मोठमोठ्याने गाणी वाजवायची, ही कुठली संस्कृती? दुसऱ्याची स्पेस डिस्टर्ब होते हे ह्यांना कळत नाही का?" आता मात्र आनंदने किल्ला सोडला. "सॉरी बाबा, चुकलं माझं. पण लेका तुझा हा प्रॉब्लेमच आहे. जे जे घडेल त्याच्या विरोधात तू जातोस. आणि बदलत मात्र काहीच नाही! काय उपयोग? याउलट आयुष्यात जे काही घडतंय त्यालाच आपण सिक्वेन्स समजायचं आणि म्हणायचं बिंगो!" "ह्यावर आपण नंतर विवेचन करु. मला खांडेकरांनी बाराची वेळ दिलीये आणि तुलाही गावी जायचंय, सो आपण आता निघालं पाहिजे." एखाद्या दगडाकडे पहावे तसे आनंदने रघूकडे पाहिले आणि दोघे नाश्ता उरकून वढावकरांच्या हॉटेलातून बाहेर पडले. आनंदला आणखी एक गोष्ट रघूला सांगायची होती, पण तो मीराला भेटायला पूर्णतः तयार झालाय याची अजून खात्री नव्हती. म्हणून त्याने निर्वाणीचे विचारले, "तू नक्की भेटणार आहेस ना मीराला?" "आपणच फोन करुन भेट ठरवलीत ना? चल." त्याने स्कूटरवर बसता बसता म्हटले. आनंदचं समाधान झालं आणि ती गोष्ट कशी सांगायची याचा मनात प्लॅन करत त्याने रघूला बसस्टॉपवर आणून सोडलं. "अरेरे, एक गोष्ट राहूनच गेली." बसस्टॉपवर येताच रघूला अचानक काहीतरी आठवलं. "कोणती?" "एका संस्थेला पेंटिंग्स पाठवायची आहेत. तो लिफाफा पोस्टात टाकायचा राहिला." "तो टाक सवडीने, पण आधी एक काम कर. मीराला पहिल्यांदा भेटायला जातोयस, तर काहीतरी गिफ्ट घेऊन जा. "गिफ्ट काय घेऊ आता?" "तिच्या आवडीनिवडी तुला माहित. पण मोकळाढाकळा जाऊ नकोस, काय? आणि ते पाकीट आठवणीने देशमुखांना देऊन जा. चल येतो मी. तुला all the best.." भर्रकन स्कूटर वळवून आनंद निघून गेला. रघूपुढे आता एक मोठाच प्रश्न उभा राहिला. गिफ्ट काय घ्यायचे? खास कुणा मैत्रिणीला गिफ्ट घ्यायचे प्रसंग त्याच्यावर आलेच नव्हते. पण तिने आपणहून एकदा भारीतले पेन आणि एकदा खूप नक्षीकाम केलेला, लालसर लकाकी असलेला बुकमार्क त्याला भेट दिला होता. ते त्याला आठवलं आणि गिफ्ट घेणं ही नैतिक जबाबदारी वाटू लागली. आत्ता नाही, तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काहीतरी नक्की सुचेल असं समाधान करुन घेऊन तो ऑफिसकडे जाण्यासाठी बसमधे चढला. • एक वळण घेऊन आनंदने स्कूटर रस्त्याच्या कडेला थांबवली आणि त्याने रघूला फोन लावला. "बोला.." "एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. फक्त ऐकल्यावर 'काय?' असा किंचाळू नकोस." "काय सांगणार आहेस?" "मी मीराला फोन लावलाच नव्हता." आनंदच्या या वाक्यानंतर दोन सेकंद शांततेत गेले. रघू 'काय' असंच किंचाळणार होता, पण त्याने ते कसेबसे गिळले. पण काय बोलावे हेही त्याला कळेना. मग आनंदनेच सांगायला सुरुवात केली. "ती तुझी मैत्रीण आहे; तुम्ही भेटणार हा तुमचा पर्सनल मॅटर आहे. त्यात तिसऱ्याच कुणीतरी सेटिंग लावल्यासारखी भेट फिक्स करायची, हे बरं दिसतं का? पण तू तयारच नव्हतास, आणि तुझा विचार शंभर टक्के बदलायचा हा एकच उपाय होता. सॉरी." बसमधे बरीच गर्दी होती आणि आजूबाजूची माणसे मढ्या डोळ्यांनी रघूकडेच पाहत होती. त्यावरुन त्याच्या लक्षात आले की आपण विचित्र चेहरा करुन उभे आहोत. तो भानावर आला आणि दबक्या आवाजात म्हणाला, "अरे पण आता तिला कुठल्या तोंडाने सॉरी म्हणू मी?" "सॉरी कशाला? तिला काहीच माहित नाहीये, इथे आपण काय उपद्व्याप केलेत ते. तुला फक्त मी जे मघाशी बोललो, तसंच बोलायचंय, विषय एन्ड!" रघू बराच गोंधळला होता, तो आता स्थिरावला. "ठीक आहे. सांगतो मी तिला. आणि आपल्या मदतीसाठी धन्यवाद." असं म्हणून त्याने फोन कट केला. आनंदला हे अपेक्षितच होतं त्यामुळे त्याला फार काही वाटलं नाही आणि तो आपल्या वाटेला लागला. सापशिडीत चांगले तीस-चाळीस आकड्यांनी पुढे जावे आणि एकदम ठेच लागून थेट पहिल्या घरावर यावे तसे रघूला वाटू लागले. पाहुण्याच्या हातून विंचू मारल्याचे मिळालेले समाधान एकदम विरुन गेले. पण आता फार वेळ न घालवता तिला कळवले पाहिजे असा विचार करुन त्याने तिला फोन लावला. • मीराने एव्हाना निघायची सगळी तयारी केली होती. काही राहिले आहे का, हे आठवत तिने आत्याला फोन लावला आणि 'बारा वाजेपर्यंत पोहोचेन' असा तिला निरोप दिला. तिच्या आत्याने दोन महिन्यांपूर्वीच स्वारगेटला घर घेतले होते, आणि तिच्या पुण्याला जाण्यामागे आत्याचे नवे घर पाहणे हेही मुख्य कारण होते. आत्याला फोन केल्यावर राघवेंद्रालाही फोन करावा का असा विचार तिच्या मनात आला. साधी भेटायची जागा त्याला ठरवायची होती आणि त्यासाठी त्याचा एवढ्या वेळात फोन यायला हवा होता. पण आपण फोन करण्यापेक्षा त्याच्याच फोनची वाट पाहावी असे तिने ठरवले, आणि ती घराबाहेर पडली. आता बसस्टँडपर्यंत जाण्यासाठी रिक्षा शोधणे भाग होते. दोनचार रिक्षा अशाच हुकल्यावर एकदाची तिला रिक्षा मिळली. ती रिक्षात बसतेय तोच तिचा फोन वाजला. तो राघवेंद्रचाच असणार असं म्हणत तिने तो पर्समधून काढला. त्याचाच फोन होता. त्यानंतर दोघांनी कुठे भेटायचे यावर विस्तृत चर्चा केली. एकतर मीराला पुण्याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे रघूने सुचवलेल्या काही चांगल्या जागा गळाल्या. शेवटी तिला काय माहित आहे या दिशेने प्रवास सुरु झाला. सुदैवाने मीराला कर्वेरोडवरचे Paradise हॉटेल माहित होते. तिथेच सहा वाजता भेटायचे ठरले, आणि मीराने फोन ठेवला. एव्हाना रिक्षा स्टँडला येऊन पोहोचली होती. स्टँडला आल्यानंतर लवकरच मीराला बसही मिळाली आणि तिचा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. • एका गजबज चौकात ती बस येऊन थांबली आणि रघू उतरला. याच चौकातल्या एका इमारतीत त्याचे ऑफिस होते. 'मीराशी भेट तर ठरली, आता हा पैशाचा भार देशमुखांच्या खांद्यावर टाकला की आपण खांडेकरांना भेटायला मोकळे.' असा विचार करीत तो ऑफिसच्या दाराशी आला आणि आत येऊन त्याने सभोवार नजर फिरवली. आणखी दोनतीन मेंबर्स आज त्याच्यासारखेच सुट्टीवर होते. 'माझ्यासारखे? छे! मी रजा घेतली कारण मला खांडेकरांना भेटायचंय. ते मला कलादालनात प्रदर्शन लावायला मदत करणार आहेत. त्यांनी कमिटीपुढे प्रस्ताव मांडायचं स्वतःहून ठरवलंय. यावेळी माझं काम नक्की होणार. याउलट हे लोक रजा घेतात ते कुणा गणागणपाच्या लग्नाला जाण्यासाठी! लग्ना-बारशाला जाण्यासारखं गाढवकाम करण्यासाठी सुट्टी घेणं हा मूर्खपणाच आहे...' रघूला अशा लोकांचा नेहमी राग येई. पण लगेच त्याने तो विचार झटकला आणि देशमुखांच्या टेबलापाशी गेला. देशमुख जागेवर नव्हते. "काय राघवेंद्रा, सुट्टीवर होतास ना आज?" काहीतरी टाईप करता करता काळेंनी विचारले. "हो, सुट्टीवरच आहे. एक पेमेंट रिसीव्ह केलेलं देशमुखांना द्यायचंय म्हणून आलो. कुठे गेलेत?" रघूने विचारले. "काही कल्पना नाही बुवा." काळे म्हणाले. "साहेबांबरोबर साईटवर गेलेत." सावंतानी माहिती पुरवली. "कधीपर्यंत येतील?" "आत्ता तर गेलेत. दुपारच्या आत नक्कीच परतायचे नाहीत." सावंत म्हणाले. रघू विचारात पडला. एवढा वेळ इथे थांबणे शक्यच नाही. "पेमेंटच द्यायचंय ना देशमुखांना? मग त्या वरच्या ड्रॉवरमधे ठेऊन द्या, देशमुख आले की मी सांगतो त्यांना घ्यायला." सावंतांनी उपाय सुचवला. "हं हे चालेल. पण त्याची चावी?" "माझ्याकडेच असते," असं म्हणत सावंतांनी रघूला चावी दिली. रघू चावी घेऊन कपाटाजवळ गेला. "कुठला ड्रॉवर?" त्याने खांद्यावरुन बॅग काढता काढता विचारले. "चावीवर नंबर लिहीलेला आहे की." 'नवीन आल्यासारखा करतोय' अशा नजरेने सावंतानी रघूकडे पाहिले. रघूने बॅग शेजारच्या टेबलवर ठेवली आणि त्यातून पैशांचे पाकीट काढू लागला. एवढ्यात काळेंना काहीतरी आठवले आणि ते खुर्चीसकट एकदम रघूकडे वळले. "तुला बातमी समजली की नाही? सावंत आज संध्याकाळी पार्टी देतायत. ओली!" "ओली! का?" रघूने ड्रॉवर उघडता उघडता विचारले. "त्यांच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण होतायत." काळे 'कारकिर्दी'वर विशेष जोर देत म्हणाले. "राघवेंद्रसाहेब, सुट्टीवर असलात तरी तुम्ही यायला पाहिजे बरं का! आनंद नाही तर नाही, पण तुम्ही तरी पाहिजेच! काय काळे?" तोंडभर हसत सावंतांनी आमंत्रण दिले. रघूने एव्हाना पाकीट ठेवून ड्रॉवर बंद केला होता. तो सावंतांपाशी आला. “Congratulations," म्हणत त्याने चावी सावंतांना दिली. "पण सॉरी मला यायला नाही जमणार, मला आज दुसरं एक काम आहे." त्याने सांगितले. सावंतांनी हरकत नाही म्हटले. एवढ्यात काळेंना स्टाफमधल्या आणखी एकाकडून पार्टी येणार असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी ते सावंतांना सांगितले. मग दोघे त्यावर चर्चा करु लागले. रघूला त्या चर्चेत जराही रस नव्हता. तो बॅग घेऊन बाहेरच्या दिशेने चालू लागला. चालता चालता त्याचे विचारचक्र सुरु झाले. 'पंचवीस वर्षे! एकच जागा, एकच काम. नावीन्य नाही, वेगळेपण नाही. पंचवीस वर्षे अशीच काढली, हे सांगताना धन्यता कशी वाटू शकते एखाद्याला? इतक्या वर्षात काय जमवलं? काही हजार रुपये, हप्त्याने सोडवलेलं घर, वळण लावलेली पोरंबाळं.. ही आयुष्यभराची कमाई? या एकाच डेस्कवर कागदी मोबदल्यात जितक्या फायली उपसल्या, त्यावरच आयुष्याची किंमत ठरवायची का? किंवा का ठरवायची नाही? एकाच क्षणासाठी झगझगीत हिरे लकाकून गेलली वीज- तिचं आयुष्य परिपूर्ण मानायचं की येईल तो ऋतू रटाळपणे पण तितक्याच हिमतीने झेलणाऱ्या झाडाचं परिपूर्ण मानायचं? सावंतांची पंचवीस वर्षे.. आपली चार वर्षे. आपलंही सावंतांसारखं झाड होतंय का? चार वर्षात आपली किती मुळं रुजली इथे? ती खोलवर जायच्या आत इथून हलायला पाहिजे.' रघू पायऱ्या उतरुन खाली आला. या इमारतीचा तळमजला भुयारासारखा लांबलचक होता आणि खाली काही दुकानांचे गाळे होते. समोरच्या दुकानाच्या काचेत रघूला आपले प्रतिबिंब दिसले. त्या पुसट आकृतीतही त्या शर्टावरचा थोडा बाहेर असलेला डाग उठून दिसत होता. रघूला तो डाग आता जास्त गडद वाटला, पण त्यामागे आणखी एक कारण होते. या पाचसहा महिन्यांच्या मैत्रीत आपणही चित्रकार आहोत हे त्याने जाणूनबुजून मीराला सांगितले नव्हते. तिच्यालेखी तो केवळ एक नोकरदार, रसिक मित्र होता. खरंतर सांगलीहून वडलांचा विरोध पत्करुन तो पुण्यास आला तेव्हा चित्रकार बनण्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा त्याच्यापाशी होती. पण त्याच्या आत्मकेंद्री आणि तत्वनिष्ठ स्वभावामुळे त्याला कलाकार म्हणून यश आले नाही आणि पोटापाण्यासाठी थोडाच काळ करायची ठरवलेली नोकरी तो सतत चार वर्षे करीत राहिला. हरठिकाणी येणारे अपयश हे त्याच्या आयुष्याचे विधान झाले आणि त्याच्यातली वीजच मेली. या चार वर्षात त्याच्यातला चित्रकार वृद्धिंगत होण्याऐवजी खचत गेला. आता तर त्याने चित्रकला थांबवलीच होती. त्याची चित्रकारी त्याच्या आयुष्यावरचा डाग बनली होती. त्याने अंगठ्याने तो डागाचा भाग आत खोचला. मीराला आपण केवळ एक मित्र म्हणूनच सामोरे जायचे, असे त्याने स्वतःला दटावले आणि तो बसस्टॉपच्या दिशने चालू लागला. 'आजच्या दिवसाचे फासे काही वेगळेच पडलेत. काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय कुणालाही न भेटणारे खांडेकर- त्यांनी स्वतःहून आपल्याला भेटायला बोलवलंय. ते स्वतः कलादालनाचे कमिटी मेंबर आहेत.. आणि आज चक्क मीरा स्वतःहून आपल्याला भेटायला येतेय..' रघूच्या ओठांवर एक लकेर उमटली. इतर दिवसांपेक्षा तो आज जास्त जिवंत वाटत होता. पण एका वेगळ्याच कारणाने त्याचा आजचा दिवस पूर्ण पालटून जाणार होता. कारण मघाशी काळ्यांसोबत बोलता बोलता त्याने गफलतीने पैशांच्या पाकीटाऐवजी तसेच दुसरे- त्याचा अर्ज आणि प्रिंटाऊट्स असलेले सफेद पाकीट ड्रॉवरमधे ठेवले होते, आणि पैशांचे पाकीट तसेच त्याच्या बॅगमधे राहिले होते. त्या नोटांचा 'एकेचाळीस हजार पाचशे' हा आकडा मोठी उलथापालथ घडवणार होता... • तो गजबजलेला चौक ओलांडून रघू पलिकडच्या बाजूला आला आणि त्याने नवा रस्ता धरला. या रस्त्याच्या टोकाला मोठा चौक आहे आणि तिथून डेक्कनला जाण्यासाठी थेट बस मिळते. आता अकरा वाजून गेले होते. 'खांडेकरांनी आपल्याला बाराची वेळ दिली आहे. ते वेळेच्या बाबतीत पक्के आहेत. आज स्वतःहून त्यांनी भेटायला बोलवलंय म्हणजे प्रदर्शनात आपला नंबर लागणार असं दिसतंय. आजची ही भेट व्यवस्थित पार पडली पाहिजे. फक्त हीच नाही, सहा वाजताचीही...' सबंध प्रवासभर त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होते. डेक्कनला त्याच्यासह चारपाच प्रवाशांना उतरवून बस निघून गेली. कलादालनापर्यंत चालत जायचे म्हणजे वीसएक मिनिटे लागणारच. आता तर पावणेबारा वाजून गेले होते. वेळेच्या आत पोहोचायचा अंदाज चुकला म्हणून रघू झपाझपा पावले उचलीत चालू लागला. अटीतटीने बाराची वेळ धरत कलादालनाच्या दारात तो पोहोचला आणि उसंत न घेता थेट पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमधे गेला. खाली आराम करत बसलेल्या वॉचमनने त्याला धावत वर जाताना पाहिले, आणि तो त्याला हटकणार तोच रघू दिसेनासा झाला. "खांडेकर सर आले आहेत का?" रिसेप्शनिस्टला त्याने विचारले. "नाही अजून." तिने सांगितले. "केव्हा येतील?" "कल्पना नाही." ती तुटकपणे म्हणाली. नेहमी वेळेवर येणारे खांडेकर आज कसे आले नाहीत म्हणून रघू विचारात पडला. तिथेच असलेल्या एका बाकावर तो बसला. थोडी वाट पाहिल्यानंतर तो पुन्हा तिच्यापाशी गेला. "तुम्ही फोन करुन बघा ना एकदा." तिने थोड्या नाखुषीनेच खांडेकरांना फोन लावला. "ते उचलत नाहीयेत." रघू पुन्हा बाकावर जाऊन बसला. ऑफिसमधे बरेच लोक येत जात होते, पण खांडेकर काही अजून येत नव्हते. त्याने स्वतः त्यांना दोनतीन वेळा फोन लावून पाहिला, पण खांडेकरांनी एकदाही फोन उचलला नाही. पाऊणएक तास असाच गेला आणि त्याचा धीर सुटू लागला. शेवटचा एक प्रयत्न करुन पहावा म्हणून तो पुन्हा रिसेप्शनिस्टकडे गेला आणि तिला त्यांना फोन करण्याची विनंती केली. तिने मघापेक्षा दुप्पट नाखुषी दाखवत खांडेकरांना फोन लावला. एवढ्यात मागून कुणीतरी उंची कपडे घातलेला गृहस्थ आला. तो जवळ येताच महागडाच असणार अशी खात्री पटायला लावणारा सेंटचा वास दरवळला. "के.बी. आहेत का आतमधे?" त्या गृहस्थाने रिसेप्शनिस्टला विचारले. "हो आहेत.” तिने एक कान फोनकडे ठेवत उत्तर दिले. रघूचे सगळे लक्ष खांडेकर फोन उचलतायत का याकडे लागले होते, आणि त्याने या गृहस्थाची दखल घेतली नव्हती. पण त्याचा आवाज त्याला ओळखीचा वाटला आणि त्याने त्याच्याकडे पाहिले. "केदार..! केदार जयराम!" रघू उद्गारला. आपल्याला ओळखणारा हा कोण, म्हणत केदारने रघूकडे पाहिले, आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. "अरे रघू.." तो एवढंच म्हणाला. जुलुमाने आल्यासारखे हलकेसे स्मित त्याच्या चेहऱ्यावर आले. चांगले मित्र असणारे ते दोघे आज वर्षा-दीड वर्षाने भेटत होते, पण केदारला त्याचे जराही अप्रूप नव्हते. हा केदार जयरामही चित्रकार होता आणि त्याच्या ओळखीचा होता. पुण्यातच दोघांची ओळख झाली. रघूला केदारच्या मुत्सद्दीपणाचे आणि बोलक्या स्वभावाचे कौतुक होते आणि केदारला रघूच्या चित्रकारितेच्या निराळ्या शैलीचे. तो एकेकाळी वरचेवर रघूच्या घरी येत असे. त्यावेळी त्यांचे संभाषण अगदी ठरलेले असे. "रघ्या लेका तुला नाही माहीत तू केवढी अप्रतिम चित्रे काढतोस ते! हे Orange spine माझं favourite आहे राव. निव्वळ अप्रतिम रंगसंगती, पर्फेक्ट स्ट्रोक्स, अमेझिंग पॅटर्न आणि भन्नाट कल्पना. कमाल." "हं! अप्रतिम! इथे दूरदूरपर्यंत कुणाला मी चित्रे काढतो हेही माहित नाही. अप्रतिम की फालतू हे दूरच राहिलं." "तुला ती पुढे आणायची नाहीत हा तुझा दोष आहे." "मला लाख आणायचीयेत, पण कशाशी काय खुडबूड करायची हे माहीत हवं ना! तू नशीबवान आहेस लेका. जहांगीरमधे दोनदा प्रदर्शन लावून आलास." "हो मग! आता पुढच्या आठवड्यात ऑबेरॉयला लावतोय. अरे कॉन्टॅक्ट्स लागतात बाबा. थोडे प्रयत्न करावे लागतात. चित्र काढून नुस्ती घरी ठेवली की कुणीतरी येऊन घेऊन जाईल असं वाटतं की काय तुला!" "हो बाबा खरंय, पण पैसे नकोत?" "हे तुझं नेहमीचंच आहे. बरं ऐक, मुंबईला माझ्या माहितीतली एक Artist community आहे, ती तुला मदत करु शकते. पण त्याआधी त्यांना तुझी चित्रे पहावी लागतील. तुझ्या निवडक चित्रांची प्रिंटाऊट मला दे. मी पुढचं बघतो." या गोष्टीला बरेच महिने उलटले. त्यानंतर केदार रघूला भेटला नाही. त्याचे पुण्यात आणि मुंबईतही घर होते आणि त्याची पुणे-मुंबई वारी सतत चालू असे. रघूने एकदोनदा त्याच्या घराकडे चक्कर टाकली, पण दरवाजाला कुलूप होते. त्यानंतर रघू ही गोष्ट विसरून गेला. रघूला त्याच्याशी बरेच बोलायचे होते, पण इकडतिकडच्या चार चौकशा झाल्यावर त्याला फार उसंत न देता 'केबींकडे एक महत्वाचे काम आहे, नंतर भेटू' असे सांगत त्याने निरोप घेतला आणि तो केबिनमधे गेला. रघूला त्याच्या वागण्याचे नवल वाटले. पण असेल काहीतरी अर्जंट काम, असे त्याने स्वतःचे समाधान करुन घेतले. खांडेकरांना केलेला शेवटचा फोनही निकामी गेला. आज काही त्यांची भेट व्हायची नाही हे रघूला समजले आणि तो निराश होऊन ऑफिसमधून बाहेर आला. उजवीकडे गेल्यावर मुख्य कलादालन होते. त्याची पावले आपोआपच तिकडे वळली. दाराशी जाऊन त्याने कुणाचे प्रदर्शन आहे ते पाहिले. बाहेर एक मोठी पाटी टांगली होती. 'Art exhibition & Sale Acrylic & Oil Paintings Artist: Kedar Jayram.' त्याच्या भिवया वर गेल्या. त्याने खाली प्रदर्शनाची वेळ पाहिली. 9am-1pm, 3pm-8pm. केदारच्या चित्रांचे प्रदर्शन नक्की पाहायचे असे त्याने मनाशी ठरवले. पण तीन वाजायला अजून दीड तास अवकाश आहे. या मधल्या वेळात किमान गिफ्टचा ससेमिरा सोडवावा या विचाराने तो कलादालनातून बाहेर पडला आणि मीराला काय आवडेल याचा विचार करीत चालू लागला. • रघू कलादालनात परत आला तेव्हा साडेतीन वाजत आले होते. चांगली दीडदोन तास शोधाशोध करुनही त्याला मनाजोगे गिफ्ट काही सापडले नाही. त्याला मीराची आवड जोखता आली नाही, आणि त्याला स्वतःला अशी एकही वस्तू आवडली नाही त्यामुळे वैतागून त्याने तो नाद सोडून दिला. ही गोष्ट 'नंतर'वर ढकलून तो पुन्हा दालनाकडे आला होता. मुख्य दालनात रघूने प्रवेश केला, आणि तिथले पेंटिंग्स, दिव्यांचा सौम्य प्रकाश, शांततेवर मुलामा चढवल्यासारखे वाटणारे संगीत या सर्वांमुळे त्याला बाकी गोष्टींचा विसर पडला. गेले तीन दिवस तिथे केदारच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते. आज शेवटचा दिवस. या तीन दिवसात केदारची दोन मोठी पेंटिंग्स विकली गेली होती. सभोवार पाहून झाल्यावर त्याने पहिल्या पेंटिंगकडे नजर वळवली. केदारचे ठरलेल्या साच्यातले पेंटिंग! त्याचा या प्रकाराशी जुना परिचय होता. 'नवीन काहीतरी कर की लेका!' त्याने मनात म्हटले. एकेक पेंटिंग पाहत तो पुढे सरकत होता. सोबत केदार कुठे दिसतो का याकडेही त्याचे लक्ष होते. पण तो तिथे नव्हता. फक्त त्या पलिकडच्या कोपऱ्यात एक तरुण मुलगी बसली होती- ती बहुधा केदारची असिस्टंट असावी. पाहता पाहता रघू एका पेंटिंगपुढे आला. The Blue Sea. Rs. 30,000/- SOLD. सोल्डची बोल्ड अक्षरात चित्राच्या बाजूला मोठी पट्टी लावली होती. त्याने भिवया उंचावल्या. तीस हजार! बापरे! अर्थात, केदारने वापरलेले रंग, त्याचे कौशल्य, तो कॅनव्हास आणि एकंदरीतच ते चित्र- दर्जेदार होते. त्याला स्वतःला तसले महागडे रंग घेऊन इतक्या मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग करणे परवडलेच नसते. तो तसाच पुढे सरकला. आणखी दोन तीन चित्रे पाहिल्यावर त्याचे एका मोठ्या चित्राकडे लक्ष गेले. त्याच्या कपाळावर बारीकशी आठी चढली. प्रथम त्याला तो भास वाटला, पण न राहावून त्याने मधली चार पाच चित्रे सोडली आणि तो थेट त्या चित्रापुढे जाऊन उभा राहिला. त्या चित्राचे नाव होते- The Orange Spine. रघूच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. आजूबाजूचे आवाज, ते मंद संगीत या सगळ्याचा त्याला विसर पडला आणि हैराण डोळ्यांनी तो एकेका तपशीलाकडे पाहू लागला. तोच ग्रे कलरचा दाट पोत, स्ट्रोक्स देण्याची तीच पद्धत, पॅटर्न्स करण्यासाठी वापरलेली तीच टॅक्ट, एकूण रंगसंगती, नारंगी रंगाचा कमीत कमी पण उठावदार वापर, कडेने गूढता वाढवणारा, मूळ चित्राखाली अस्तर असल्यासारखा वाटणारा काळा रंग.. सगळं तेच. सर्वार्थाने रघूचंच चित्र. फक्त ते चितारणारा हात केदारचा, रंग उच्च दर्जाचे आणि मूळ चित्रापेक्षा मोठ्या कॅनव्हासवर चितारलेले. पण एवढ्यातच ही नवलशृंखला थांबायची नव्हती. त्याचे कॅनव्हासच्या उजव्या कोपऱ्यात लक्ष गेले. Rs. 41,500/- SOLD. त्याने डोळे अधिकच विस्फारले आणि त्याला एकदम गळून गेल्यासारखे झाले. छातीचे ठोके बाहेरपर्यंत स्पष्ट जाणवू लागले आणि अनेक भावनांचा गोंधळ त्याच्या डोक्यात सुरु झाला. पायांच्या जड शिळा झाल्या आहेत आणि बरगड्यांमधून कुणीतरी धडका मारतंय असं त्याला वाटू लागलं. त्याने पुन्हा एकदा अविश्वासाने चित्रावरून नजर फिरवली आणि खाली कोपऱ्यात 'केदार जयराम' अशी झक्क सही त्याला दिसली. त्याबरोबर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. थेट त्या टेबलापाशी जाऊन त्या मुलीला त्याने विचारले, "केदार कुठाय?" "सर पाहुण्यांना रिसीव्ह करायला गेलेत, येतील इतक्यात." इतक्यात बाहेरच्या दिशेने कुणीतरी मोठ्या आवाजात हसल्याचा आवाज आला. ही हसण्याची पद्धत केदारचीच. तो सोबत तीन चार पाहुणे मंडळींना घेऊन तो येत होता. त्याने केदारला येताना पाहिले आणि तो स्वतःच्या नकळत त्याच्या दिशेने चालू लागला. रघूला समोर पाहून केदार दारातच थांबला. ‘हे होणारच होतं’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. रघू त्याच्यापाशी आला आणि ‘हरामखोर’ असं ओरडत त्याने केदारचे बकोट धरले. दालनात बऱ्यापैकी माणसे होती. त्या मंद संगीताच्या शांत वातावरणात हा अनपेक्षित ओरखडा उमटल्याबरोबर त्यांनी चमकून दाराच्या दिशेने पाहिले. ती मुलगी धडपडत उठून उभी राहीली, आणि केदारसोबत आलेले तीन चार लोक विस्मयाने हा प्रकार पाहू लागले. "हरामखोर माझं चित्र चोरतोस आणि विकतोस!?" रघूने त्याची कॉलर गच्च धरली होती आणि तो रागाने धुमसत होता. त्याचा हा अवतार पाहून दालनातल्या लोकांनी धाव घेत त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. केदार कोऱ्या चेहऱ्याने रघूकडे पाहत होता. "हे माझं चित्र आहे. ह्याने चोरलंय. याला पकडा, पोलिसात द्या याला.." रघू आता रागात बरळू लागला. त्याला एकदम निर्वातात असल्यासारखं वाटू लागलं होतं. तो आजूबाजूच्या लोकांना उत्कटपणे आपली बाजू समजावू लागला. तेवढ्यात गलका ऐकून वर आलेल्या वॉचमनला केदारने इशारा केला; त्याने पुढे होऊन रघूला धरले आणि तो ओढतच त्याला खाली घेऊन गेला. सर्वजण स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होते. रघू गेल्यानंतर दालनात कोरडी शांतता पसरली. वॉचमनने रघूला दणदण ओढत खाली आणले आणि हिसकून बाहेर ढकलले. "चल भाग यहाँसे. साले हरामी लोग. फुकट तमाशा करते हैं.." रघूचा तोल गेला आणि तो धडपडत खाली पडला. त्यासरशी त्याची बॅग आणि वरच्या खिशात ठेवलेला फोनही खाली पडला आणि स्विच ऑफ झाला. रघूचे त्राण गळून गेले होते. त्याने आपला सांडलेला संसार उचलला आणि बॅग सावरीत उभा राहिला. त्याचे डोके आता बंद पडल्यासारखे झाले होते. तो शून्य नजरेने दालनाकडे पाहत राहिला आणि वॉचमनने पुन्हा हटकल्यावर ग्लानीत चालल्यासारखा तिथून बाहेर पडला. हा सगळा प्रकार प्रदर्शन बघायला आलेली एक व्यक्ती शांतपणे पाहत होती. रघूला वॉचमन घेऊन गेल्यानंतर काही वेळाने तीही दालनातून बाहेर पडली आणि रघूचा पाठलाग करु लागली. • देशमुख मघाशीच साहेबांबरोबर साईटवरुन परतले होते आणि पंख्याचा वारा खात खुर्चीवर रेलून बसले होते. काहीवेळाने सावंतांना त्या पेमेंटची आठवण झाली, आणि त्यांनी ती बातमी देशमुखांना दिली. "पण आता उशीर झाला सावंत. आज काही बँकेत पैसे भरता येणार नाहीत, चार वाजत आले.." देशमुख खुर्चीवरुन उठले, "तरी माझ्या ड्रॉवरमधे ठेवतो, म्हणजे उद्या विसरायला नको. सकाळीच भरले पाहिजेत. चावी द्या." सावंतांकडून चावी घेऊन त्यांनी ड्रॉवरमधून पाकीट काढले आणि ते आपल्या जागेपाशी आले. त्यांचा ड्रॉवर त्यांनी उघडला आणि त्यात पाकीट ठेवून तो बंद केला. मग ते काहीतरी लिहायला लागले. काहीतरी चुकतंय असं त्यांना आतल्या आत जाणवलं आणि त्यांनी लिखाण थांबवलं. कसलासा विचार करत पुन्हा ड्रॉवर उघडून त्यांनी ते पाकीट बाहेर काढलं, आणि उलटंपालटं करुन वाचलं. त्यावर एका कलासंस्थेचा पत्ता लिहीला होता आणि 'from' खाली राघवेंद्राचे नाव-पत्ता लिहीला होता. हे इथे कसं आलं असेल याचा विचार करत त्यांनी राघवेंद्रला फोन लावला. तो बंद येत होता. त्यांनी दोनतीन वेळा त्याला फोन लावून पाहिला, पण तो लागला नाही. मग ते उठले आणि त्यांनी सावंतांना पुन्हा चावी मागितली, आणि ड्रॉवरमधे आणखी एखादं पाकीट आहे का ते पाहिलं. तिथे काही नव्हतं. सावंतांना हा प्रकार समजताच त्यांना राघवेंद्रच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. पण देशमुखांनी हा प्रकार खेळीमेळीने घेतला. "अहो, ड्रॉवरमधे ठेवेपर्यंत मलाही समजलं नाही की हे वेगळं पाकीट आहे. पैशाचं आणि हे पाकीट एकसारखंच असणार, म्हणून राघवेंद्र फसला. असो. तसंही आज पैसे भरता येणारच नव्हते, उद्या तो आला की या पाकीटांची देवाणघेवाण करू!" देशमुख हे बोलले खरे, पण आत कुठेतरी त्यांना वेगळी जाणीव होत होती. राघवेंद्रने पैसे चोरले असतील का? पण तो असा नाही. किंबहुना चोरी करायची त्याच्यात धमकच नाही. मग तो इथे आलाही नसता. हे चुकूनच घडलंय असं त्यांनी स्वतःला पटवलं, पण तरी रघूला आणखी दोनतीन वेळा फोन लावला. तो अजूनही बंदच येत होता. उद्याच काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवून ते पुन्हा काहीतरी लिहायला लागले. • कुणीतरी आपल्याला मागून धक्का दिला आहे आणि आपण एका खोल विहीरीत पडत आहोत असे काहीसे रघूला वाटत होते. तो दालनाच्या इमारतीतून बाहेर पडला आणि जवळच असलेल्या एका कट्ट्यावर जाऊन बसला. त्याचे मन सुन्न झाल्यासारखे झाले होते आणि भवतालच्या हालचाली त्याला जाणवेनाशा झाल्या होत्या. खांडेकर, मीरा, ऑफिस या सगळ्याचा त्याला आता पूर्ण विसर पडला. त्याचे आयुष्य फक्त The Orange Spine नावाच्या पेंटिंगभोवती गोल गोल घिरट्या मारत होते. मन थोडे शांत झाल्यावर तो विचार करु लागला. 'नेमका धक्का कशाचा बसला? केदारने फसवल्याचा? चित्रासारखी चित्रे नसतात का? जरी हे चित्र हुबेहूब त्याच्या चित्रासारखे होते तरी केदारने ते नव्याने घडवले होते, त्यामागे त्याची मेहनत होती. मग असं काय घडलं की इतका राग यावा? एकेचाळीस हजार पाचशे रुपयांना ते विकले गेले या गोष्टीचा राग!?' अचानक रघूला दुखरी नस सापडली. भले त्या चित्रामागे केदारची मेहनत होती, पण त्या चित्राची सबंध परवल रघूची होती. कित्येक दिवसांचा विचार, कितीतरी फसलेले प्रयत्न, स्व-अभ्यास करुन लखलखीत केलेली प्रतिभा यांच्या मिश्रणातून निर्माण झालेले ते पेंटिंग होते. त्या चित्रातील सौंदर्य, कलात्मक मूल्य, विशिष्ट रंगसंगती यांचा आविष्कार रघूच्याच प्रतिभेतून झाला होता. यावर संपूर्णतः त्याचाच अधिकार होता. केदारने केली ती फक्त कारागिरी. त्याच्या कारागिरीपेक्षा रघूची कलाकारी निर्विवाद उच्च प्रतीची आणि अस्सल होती. आणि अशा अस्सल कलाकृतीची नक्कल करुन तो परस्पर जाहीर प्रदर्शनात मांडतो आणि विकतो? रघूला आता अर्थपूर्ण राग आला. ही साधीसुधी गोष्ट नाही. ही बाब अशी डावलून चालायची नाही. त्याने मनाशी काहीतरी ठरवले आणि तो उठला. आता त्याची पावले आत्मविश्वासाने पडू लागली. दालनाच्या दारात बरीच झाडी होती, तिथे उभे राहून ती मघाची व्यक्ती रघूकडे निश्चल पाहत होती. तो उठून कुठेतरी चालला आहे हे पाहून तिने शांतपणे एक सिगरेट शिलगावली आणि अंतर राखत त्याच्यामागे चालू लागली. रघू थेट जवळच्या पोलीस स्टेशनात गेला. "सर मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे." "दोन मिनीटं बसा, मी तुम्हाला बोलवतो." तो एका बाकड्यावर बसला. 'आजचा दिवस काय भलतीच कलाटणी घेऊन आलाय! खांडेकरांनी आज बोलावले, त्यासाठी खास आपण सुट्टी घेतली. पण ते काही भेटले नाहीत. त्यांच्याऐवजी केदार भेटला आणि हे सगळे घडले. समजा त्यांनी बोलावलंच नसतं आणि नेहमीसारखे आपण ऑफिसवर असतो तर? आपली चित्रे प्रदर्शनात लावण्याच्या आणि विकण्याच्या लायकीची आहेत हे आपल्याला समजलेच नसते. पण आज समजले ते तरी कसे! काहीवेळा वाटा अशा सक्तीने नागमोडी वळण घेतात की आपल्याला त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याशिवाय पर्यायच नसतो. आता या पोलिसांनी त्या कोपऱ्यात उभा केलेला तो पंधरा सोळा वर्षांचा फाटका बेरकी पोरगा. त्याच्याबद्दल एक हवलदार दुसऱ्याला सांगत होता- “बेन्यानं पन्नास रुपयांसाठी बापाच्या टाळक्यावर सोड्याची बाटली फोडली. बापान् गपकन डोळे मिटले-" "म्हणजे मेला?" "नाही मेला नाही, ताबडतोब बेशुद्ध. आता याला पन्नास रुपये कशाला हवे असतील?" "कशाला?" "चीज बर्गर खायचा होता म्हणे! माणसाला कशाची तलफ लागेल काही सांगता येत नाही." त्या मुलाच्या चेहऱ्यावर तर अपराधीपणाचा लवलेशही नाही. गुन्ह्याचे परिणाम माहित असूनही लोक गुन्हे कोणत्या प्रेरणेने करतात? त्यात किती प्रचंड ओढ असते! आणि अशा गुन्ह्यानंतर त्यांना पश्चातापही होत नाही. आपण समजा रागाच्या भरात केदारला मारले असते, तर आपणही संपूर्ण कोऱ्या निर्विकार चेहऱ्यानेच फासावर गेलो असतो..' तेवढ्यात हवालदाराने त्याला हटकल्यामुळे त्याची विचारशृंखला तुटली. "हं या तुम्ही." रघू त्या टेबलापाशी गेला. "काय कंप्लेंट आहे?" "इथल्या आर्ट गॅलरीत केदार जयराम या व्यक्तीचं Painting exhibition लागलंय. त्यातलं एक चित्र माझं आहे. माझं चित्र चोरुन त्याने ते एकेचाळीस हजार पाचशे रुपयांना विकलंय." "चोरुन विकलंय? म्हणजे त्यांनी तुमच्या घरुन चोरलं की.." "नाही, तसं चोरलं नाही. त्याने माझी आयडिया चोरली. म्हणजे माझ्या चित्राची हुबेहूब नक्कल करुन त्याने स्वतःची म्हणून मांडली. म्हणजे एकप्रकारे चोरीच ना.." "आयडिया चोरली! बरं. पण ही आयडिया तुमचीच याचा काही पुरावा आहे का?" "पुरावा म्हणजे? माझ्या घरी ते ओरिजिनल पेंटिंग आहे. त्यावरूनच त्याने हे चित्र काढलंय." "अहो पण त्याचाच पुरावा हवा ना. उद्या त्यांनी असा दावा केला की तुमच्या घरी असलेलं चित्र तुम्ही त्यांच्या चित्राची नक्कल करुन काढलंय, तर?" "पण पुरावा म्हणजे नेमकं काय देऊ तुम्हाला?" "ते आम्हीच सांगायचं होय?! अहो काही रजिस्ट्रेशन कागद किंवा काहीतरी.. आम्हाला चित्रातलं काही कळत नाही." "असं कसं म्हणता तुम्ही? अहो उघडउघड चोरी केलीय त्याने आणि-" "आम्ही कुठं नाही म्हणतोय मग! पण पुरावा नको का? आणि चित्रासारखी चित्रं शंभर असतात की! गाण्यांसारखी गाणी करुन विकतात, ती चांगली हिट होतात.. अहो गाड्यांच्या मॉडेलमधेपण कॉपी करतात. हे चालतच असतं. एवढं काय मनाला लावून घेताय!" "काय मनाला लावून घेता म्हणजे? माझ्या मेहनतीच्या कलाकृतीवर त्या माणसाने एकेचाळीस हजार पाचशे रुपये मिळवलेत आणि मी मनाला लावून नको घेऊ?" "मग तुम्ही पण प्रदर्शन लावायचं की! हे बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी. तुम्ही पुरावा आणा, मग आपण पुढची कारवाई करु." तो हताश झाला. पोलिसाचं म्हणणंही बरोबर होतं. नुस्त्या शब्दावर दुनिया चालत नाही. आपण तरी काय पुरावा आणणार! हतबल होऊन तो उठला. बॅग खांद्यावर अडकवत त्याने सहज त्या मुलाकडे पाहिले. तो वर छताकडे पाहून निबर हसत होता. सूडाचा आनंद असा असतो? तेवढ्यात त्या मुलाने रघूकडे पाहले. रघूने चटकन आपली नजर काढून घेतली आणि तो बाहेर पडला. आता काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. या घटनेने रघूच्या आयुष्यभराच्या निर्णयांना, त्याच्या तत्वांना एका कड्यावर आणून सोडले होते. त्यांचा केव्हाही कडेलोट होणार होता. काय करावे? आत्ताच्या आत्ता पुणं सोडून परत गावी जावे का? आप्पांनी कारखान्यात सुपरवायझरची नोकरी धर म्हणून खूप आग्रह धरला होता. त्यांचं ऐकायला हवं होतं... विजेच्या वेगाने त्याच्या मनात विचार येत होते. "Excuse me. मला तुझ्याशी जरा बोलायचंय." मागून एका व्यक्तीने रघूला हटकले. दालनापासून त्याचा पाठलाग करत असलेली ती हीच व्यक्ती. पन्नास-पंचावन वय, उमदे व्यक्तिमत्व, बारीक पण भेदक डोळे आणि चेहऱ्यावर खूप पाहिल्या-वाचल्यानंतर येतो तो सूज्ञपणा. त्या व्यक्तीने रघूकडे हसून पाहिले. पण रघूच्या चेहऱ्यावर कसलेच भाव उमटले नाहीत. दोन क्षण असेच शांततेत गेले. "मला The Orange Spine विषयी बोलायचंय." आता मात्र खडा बरोबर पडला. "काय बोलायचंय?" रघूने विचारले. "इथे नको. छानशा हॉटेलात जाऊ." असं म्हणत त्या गृहस्थांनी वळून चालायला सुरुवातही केली. रघू आपल्या नकळत त्यांच्यामागे चालू लागला. • आत्याचे नवे घर मीराला प्रचंड आवडले होते. स्वारगेट परिसरात असूनही त्या भागात शांतता होती आणि हिरव्या रंगाचा मुलामा दिल्यासारखी ठिकठिकाणी दाट झाडी होती. इतकी, की त्या घराच्या एका खिडकीतून फक्त दाटीवाटीने खेटून बसलेली पानेच दिसत. त्यातून आत्याने घरही मोठ्या कल्पकतेने सजवले होते. त्यामुळे आतून बाहेरुन मीरा त्या घराच्या प्रेमात पडली होती. मीरा येऊन तीनचार तास झाले तरी त्या दोघींच्या गप्पा काही संपत नव्हत्या. मधे जेवणाचा वेळ सोडला तर दोघींचे बोलणे अखंड चालू होते. समोरची व्यक्ती गप्पिष्ट असेल तर बोलायला विषय लागत नाही. एखाद्या वाक्यातल्या एखाद्या शब्दाला फांद्या फुटतात आणि तिथून नवाच विषय सुरु होतो. त्यातून मीराची आत्या बऱ्याच मासिकांमधून वगैरे लिहायची. तिचे एखाददुसरे पुस्तकही प्रकाशित झालेले होते. त्यामुळे दोघींच्या गप्पा नेहमी रंगायच्या. एवढ्या वेळात प्रथमच कुठल्याशा शब्दाला लग्न विषयाची फांदी फुटली आणि तो मुद्दा ऐरणीवर आला. "तू काय ठरवलंयस लग्नाचं?" आत्याने विचारले. "काय ठरवायचं त्यात?" लक्षात न घेतल्यासारखं मीरा उत्तरली. डिव्होर्स झाल्यापासून तिला लग्न, नवरा वगैरे गोष्टींचा बऱ्यापैकी तिटकारा होता आणि तितकाच तिच्या आईला आणि आत्याला त्यात रस होता. म्हणून आज मीराच्या आईने खास आत्याबाईंना फोन करुन मीराचं मन वळवण्याबद्दल चारचारवेळा सांगितले होते. "अगं पुन्हा लग्न करण्याबद्दल विचारतेय मी." आत्या म्हणाली. "मी पुन्हा लग्न करण्यासाठी अविनाशकडून डिव्होर्स नाही घेतलाय. आणि हे तुला माहित आहे." "अगं पण अशी एकटीच राहणार आहेस का आयुष्यभर? सोपं वाटतं का तुला ते?" "काय अवघड आहे त्यात? मुळात एकटेपणा आहेच कुठे? एवढ्या Assignments आहेत, दौरे आहेत, शिवाय आमच्या सतत कुठे ना कुठे पार्ट्या, सेलिब्रेशन्स वगैरे चालू असतातच. I am happy with this life. "असं तुला आत्ता वाटतंय. एवढ्यात एकटेपणा नाही जाणवणार तुला, कारण तू अजून तरुण आहेस. पण नंतर तुला एका जोडीदाराची गरज भासेल. पण तेव्हा उशीर होईल." "हे वाक्य ती तुझी सुशीला तिच्या मुलीला म्हणते! परवाच त्या मासिकातला तुझा लेख वाचला मी!" मीराने त्यातले सगळे गांभीर्यच काढून टाकले. "ते मासिक मरूदे," आत्याही न डळमळता पुन्हा विषयाकडे वळली, "मला सांग, आज तू तो राघवेंद्र का कोण; त्याला भेटायला जाणार आहेस ना?" "हो. पण आम्ही फक्त मित्र आहोत. आणि तू म्हणतेस तसं काही आमच्यात घडायचं नाही. कारण आमच्या वयात अंतर आहे," मीराने आधीच बचावाचा पवित्रा घेतला. "पण वयात अंतर म्हणजे फार नसेल ना, तीनचार वर्षांनीच मोठा असेल तो..." "तो नाही, मी मोठी आहे! He is a bachelor and i am a divorcee!" "अच्छा.. पण ठीक आहे की. तीनचार वर्षांनीच लहान असेल तो!" आत्या मिश्किलपणे म्हणाली. पण मीरा यावर काहीच बोलली नाही. प्रेम,आवड, लग्न यांच्या व्याख्याच तिच्यालेखी बदलल्या होत्या. अविनाशबरोबर लग्न झाले तेव्हा आम्ही स्वतःला perfect couple म्हणवून घेत होतो. किंबहुना काही काळ ते तसेच होते. पण तीनच वर्षांनी गोष्टी थेट घटस्फोटावर आल्या आणि प्रवास संपला. कोण कशात कमी पडले? काहीच समजले नाही. कोणातच काही कमतरता नव्हती, हीच कमतरता होऊन बसली का? याउलट कितीतरी जोडपी एकमेकांच्या अधिकउण्या गोष्टी सांभाळत सुखाने आयुष्य काढतात. Perfect couple म्हटलं की चुका, भांडणे होऊच नयेत ही अपेक्षा! एकमेकांमधे दुसऱ्याला सांभाळता यावी अशी कोणतीच पडकी बाजू नव्हती, म्हणून लग्नानंतर नाते गुंफलेच गेले नाही... एवढ्यात आत्याने हटकल्यामुळे मीरा भानावर आली. तिने एक वेगळाच प्रस्ताव मांडला. "तू राघवेंद्रला घरीच का बोलवत नाहीस? बाहेर कुठे भेटण्यापेक्षा हे जास्त सोयिस्कर पडेल. शिवाय माझीही ओळख होईल त्याच्याशी." मीराला हा प्रस्ताव आवडला. पण यामागे आत्याचा काही डाव आहे का, अशा साशंक नजरेने तिने तिच्याकडे पाहिले. "ठीक आहे. सांगते मी त्याला. पण तू उगाच कसली आशा लावून बसू नको. मला काही जोडीदाराची गरज वगैरे भासत नाही!" "बरं बाई, राहिलं. पण ही गरज आधीच भासत नाही बरं का! ती विशिष्ट व्यक्ती भेटली की आपसूक गरज जाणवू लागते!" असं म्हणून आत्या किचनमधे गेली, आणि तिच्या बोलण्याकडे लक्षच नाही असं करुन मीराने राघवेंद्रला फोन लावला. तो स्विच ऑफ येत होता. तिने थोड्या वेळने पुन्हा लावून पाहिला, पण तो प्रत्येकवेळी स्विच ऑफच येत होता.. • जंगली महाराज रोडवरच्या एका हॉटेलात ते दोघे बसले होते. आजचे वातावरण अगदी आल्हाददायक होते, पण रघू या जगात नव्हताच. वर्तमान, भविष्य यांच्या पाट्या संपूर्ण कोऱ्या झाल्यासारखा तो त्या खुर्चीत बसून होता. त्या गृहस्थांनी आणखी एक सिगरेट शिलगावली होती आणि दोघांसाठी चहा मागवला होता. त्यांनी थोडावेळ एकटक रघूकडे पाहिले. “तर, The Orange Spine हे मूळ तुझं पेंटिंग आहे." त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले. "हो. पण काय उपयोग आता.." "Why? What happened?" उगाच अज्ञान पांघरुन ते म्हणाले. "काय झालं म्हणजे?" रघूचा राग पुन्हा उफाळून आला,"त्या केदारने माझं चित्र चोरलं, आणि विकलंसुद्धा." "अरे ही तर चांगली गोष्ट आहे!" रघू आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. त्यांनी निवांतपणे सिगरेटचा झुरका घेतला आणि म्हणाले, "आजपर्यंत तुझी किती पेंटिंग्स विकली गेली आहेत?" "एकही नाही." "मग त्या बिचाऱ्याने एवढी मेहनत घेऊन, स्वतःचे पैसे खर्च करुन तुझं चित्र एवढ्या मोठ्या exhibition मधे लावलं, ते लोकांना आवडलं, त्यातल्या एकाने ते विकतही घेतलं- ही गोष्ट चांगली नाही का?" रघूने असा विचार केलाच नव्हता. "हो," तो आपसूकच बोलून गेला. "हं, पण गोष्ट credit वर अडते! पण मला विचारशील तर मी शंभर टक्के क्रेडिट त्यालाच देईन. त्याने आज तुझं चित्र पळवलं नसतं, तर तुझी चित्रं अजून दहाबारा वर्षे धूळखात पडली असती. तू उलट त्याला थँक्यू म्हटलं पाहिजेस." रघू थोडा हसला. त्याचा स्वाभिमान अजूनही नाही म्हणत होता, पण तरी त्याला त्यांचं बोलणं पटत होतं. या गृहस्थाच्या बोलण्यात एकप्रकारची जादू आहे! "पण माझं आजवर एकही पेंटिंग विकलं गेलं नाही हे तुम्हाला कसं माहित?" "तुला वाचता येणं फार सोपं आहे. अजून काही महिन्यांनी तू चित्रकला सोडून गावी परत जायच्या बेतात होतास. पण मग आपण एकेकाळी कलाकार होतो हा डाग आयुष्यभर मिरवावा लागला असता तुला!" "मी आजच गावी जायचा विचार करतोय. माझा इकडचा अवतार आज संपला!" रघू स्वतःवरच कुत्सित हसला. "गावी जाऊन काय करणार? शेती? छे! आपलं स्वप्न जगता आलं नाही तर सरळ कड्यावरुन उडी टाकावी! असो. गावी तू नंतरही जाऊ शकतोस, पण आधी माझ्या घरी चल." असं म्हणून त्यांनी चहा संपवला, आणि ते उठले. रघूने तो गरम चहा फुंकर मारत भरभर रिचवला आणि तोही उठला. तोपर्यंत ते गृहस्थ बिल देऊन बाहेरही पडले होते. रघू जवळजवळ धावतच त्यांच्यामागे गेला. हा माणूस मी नक्की येत आहे का, हे मागे वळून पाहतही नाही! • एका बैठ्या टुमदार बंगल्याच्या फाटकामधून ते गृहस्थ आत शिरले आणि रघू त्यांच्या मागोमाग आत आला. बंगल्याच्या आवारातली छोटीशी बाग फार देखणी होती. त्यात गुलाबाचीच तीनचार प्रकारची झाडे होती. आणखी जवळच एक पसरट पाने असलेले, टपोऱ्या गोल फुलांचे झाड, शिवाय त्या खिडकीपाशी गडद हिरव्या पानांचा चाफा, आणि झोपाळ्याला लागूनच पारिजातक. रघूला सगळ्या उलथापालथीचा विसर पडला आणि तो त्या बागेकडे पाहतच राहिला. त्या गृहस्थांनी बोलवल्यावर तो आत गेला. आत जाताजाता त्याने दारावरची पाटी पाहिली. 'Shrinivas Chandorkar' आत आल्यावरही तो त्याच नवलाने घराकडे पाहू लागला. भिंतींवर टांगलेली अप्रतिम चित्रे, भिंतींच्या आणि दिव्यांच्या रंगाची निवड, शोकेसमधे असलेल्या मूल्यवान वस्तू आणि कोपऱ्यातले दोन मोठे स्कल्पचर्स... या घरावरुन रसिकता ओसंडून वाहत होती. रघूला ते घर फार आवडले आणि आपलेसे वाटले. स्वतःहूनच तो सोफ्यावर बसला. पण त्यांनी आपल्याला घरी का बोलावले हे त्याला अजून समजले नव्हते. चांदोरकर आत गेले होते, ते बाहेर येताना दोन ग्लास घेऊन आले. ते टीपॉयवर ठेऊन त्यांनी कपाटातली स्कॉचची बाटली काढली. रघूने ते पाहिले आणि तो दबक्या आवाजात म्हणाला, "पण मी घेत नाही.." "पण आज घे! आज सेलिब्रेशन डे आहे!" ग्लास भरता भरता त्यांनी म्हटले. "कसलं सेलिब्रेशन?" "आज तुझं पहिलं चित्र विकलं गेलंय! चिअर्स!" मिश्किल डोळ्यांनी रघूकडे पाहत ते म्हणाले. रघू खरंच सगळा राग विसरुन गेला होता आणि त्याला आता वेगळेच वाटू लागले होते. त्यानेही हसून चिअर्स म्हटले आणि ग्लास ओठांना लावला. "इकडे ये, तुला एक गंमत दाखवतो," असं म्हणत चांदोरकर उठले. मागोमाग रघूही उठला. दोघे एका रुममधे गेले. ती मोठी प्रशस्त रुम होती आणि तिथे खुर्च्या, कपाट, पलंग यांपैकी काहीच नव्हते. होती ती फक्त भिंतीवर टांगलेली खूपशी पेंटिंग्स, मधल्या मोकळ्या जागेत ठेवलेली कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची स्कल्पचर्स, आणि या सर्व खजिन्यावर पसरलेला मंद सोनेरी प्रकाश. रघू ते दृश्य पाहून हरखून गेला. पार देशाविदेशातल्या चित्रकारांची मूल्यवान चित्रे आणि स्कल्पचर्स चांदोरकरांच्या संग्रही होती. त्यातले दोघेतिघे तर रघूला गुरुस्थानी होते. तो आ वासून सगळ्या चित्रांकडे पाहत राहिला. चांदोरकर एका चित्रापुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी रघूला बोलावले. "हे पेंटिंग बघ. हा मानव कड्याच्या टोकावर उभा आहे, आणि आता तो उडी मारणार आहे. त्याचं काय होईल? पुढे ही तीन वेड्यावाकड्या रेषेत विभागलेली त्याची भविष्यातली तीन रुपं आहेत. Now he has to choose the universe to fall!" रघूला त्यांच्या म्हणण्याचा रोख समजला आणि तो किंचित हसला. चांदोरकर पुढे गेले आणि एका मोकळ्या, कोऱ्या भिंतीपाशी उभे राहिले. त्या कोऱ्या भिंतीकडे पाहत ते म्हणाले, "मला खरंतर The Orange Spine विकत घ्यायचं होतं, पण ते आधीच विकलं गेलं. I was late. पण हरकत नाही! आता तर आख्खा चित्रकार माझ्या गळाला लागलाय! माझ्यासाठी एक पेंटिंग करशील का?" चांदोरकरांनी थेट प्रश्न केला. रघू आधी गडबडला. त्यांच्या एवढ्या अप्रतिम संग्रहामधे माझं पेंटिंग? पण आता त्याला नेहमीसारखा न्यूनगंड जाणवला नाही. आपणही चांगल्या दर्जाचे चित्रकार आहोत! तो चटकन हो म्हणाला. चांदोरकरांनी पेग संपवला आणि ग्लास घेऊन ते बाहेर गेले. रघू पेंटिंग्स पाहत तिथेच उभा राहिला. विशेषतः ते कड्यावर उभा असलेल्या मानवाचं पेंटिंग. तो मानव म्हणजे आपणच, असे त्याला वाटले असेल तर नवल नाही! काही वेळाने तोही बाहेर हॉलमधे गेला, तेव्हा चांदोरकर तिथे नव्हते. टीपॉयवर ग्लास ठेवून तो बसून राहिला. तेवढ्यात शेजारच्या खोलीचे दार उघडले आणि व्हीलचेअरवर कुणालातरी घेऊन चांदोरकर बाहेर आले. "Meet my wife Sumitra." ते म्हणाले. रघूने त्यांना नमस्कार केला. सुमित्राबाईंनीही नमस्कार केला. "हा राघवेंद्र खूप उत्तम चित्रकार आहे बरं का! आणि आपल्यासाठी तो एक पेंटिंग करणार आहे." त्यांनी सांगितले. सुमित्राबाई थोडा वेळ दोघांशी बोलल्या आणि औषधाची वेळ झाली म्हणून चांदोरकर पुन्हा त्यांना आत घेऊन गेले. काही वेळाने बाहेर आल्यावर ते रघूशेजारी बसले आणि त्यांनी दोघांसाठी पेग भरायला सुरुवात केली. पेग भरता भरता सुमित्राबाईंबद्दल ते स्वतःहूनच सांगू लागले. "आमचं लग्न आमच्या वडलांनी लावून दिलं. माझ्या मनाविरुद्ध. त्यामुळे सुमित्रा मला कधीच आवडली नव्हती. मी सुरुवातीला खूप तुसडेपणाने तिच्याशी वागायचो. प्रेमाच्या गोष्टी, गप्पा वगैरे आमच्यात कधी झाल्याच नाहीत. मी पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीमधे रसिकता जपायचो आणि तिला रसिकतेपेक्षा स्वस्त आणि टिकाऊपणात जास्त रस असायचा.. " चांदोरकर क्षीण हसले आणि स्कॉचचा एक घोट घेऊन त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली, "आमचे मतभेद तर इतके होते की नंतर आम्ही एकमेकांशी बोलणंच टाकलं. केवळ व्यवहार म्हणून बोलायचं. त्यातच एक दिवस कारच्या अपघातात तिचा पाय निकामी झाला. बरेच महिने ती बेडरेस्टवर होती. या घटनेनंतर मात्र गोष्टी पार बदलून गेल्या. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. तिची सुश्रुषा करता करता मी तर चक्क तिच्यावर प्रेम करायला लागलो. यथावकाश ती बरी झाली आणि नंतर माझा आमच्या नात्याकडे पाहायचा दृष्टिकोनच बदलला. तिच्याइतकी उत्कृष्ट बायको मला मिळालीच नसती असं मला वाटू लागलं!" चांदोरकर थांबले. त्यांचे डोळे भूतकाळात गेल्यासारखे वाटत होते. त्यांनी तो पेग संपवला आणि ग्लास खाली ठेवला. "आयुष्याचा चुकलेला सांधा जोडण्यासाठी कधीकधी एक हिसकाच गरजेचा असतो." असं म्हणून त्यांनी अर्थपूर्ण नजरेने रघूकडे पाहिले. रघूने होकारार्थी मान हलवली. चांदोरकरांच्या नजरेत पुन्हा आधीसारखा मिश्किलपणा आला, आणि त्यांनी डोळे बारीक करत रघूला विचारलं, "मग, आता गावी जायला गाडी कधी आहे!?" "सगळ्या गाड्या रद्द!" त्यानेही त्याच ढंगात उत्तर दिलं. चांदोरकरांनी हसून त्याला दाद दिली. "उत्तम. हे माझं कार्ड घे. काहीही लागलं तर फोन कर. आणि त्या पेंटिंगच्या संदर्भात आपल्याला पुन्हा भेटायचं आहे." "हो नक्की." रघूने घड्याळ पाहिले. पाच वाजत आले होते. "मला आता निघालं पाहिजे." तो म्हणाला. "ओके. पुन्हा ये." चांदोरकर त्याला फाटकापाशी सोडायला आले. "येतो," असं म्हणत रघू तिथून बाहेर पडला. • पाच वाजत आले आणि त्याचबरोबर ऑफिसमधल्या सगळ्यांनी आजच्या दिवसाच्या कामाला पूर्णविराम द्यायला सुरुवात केली. फायलींचे गठ्ठे कपाटात गेले, कॉम्प्युटर्स बंद झाले. सावंतांच्या पार्टीसाठी किती वाजता भेटायचं यावर चर्चा सुरु झाली. संगनमताने आठ ही वेळ ठरली आणि सगळेजण आवराआवर करायला लागले. देशमुखांनी शेवटचा प्रयत्न म्हणून रघूला फोन लावला. अजूनही तो बंदच येत होता. 'खरंच काही भानगड असेल का?' असा विचार पुन्हा त्यांच्या मनात चमकून गेला. पण तो फारवेळ टिकला नाही आणि ते सावंतांच्या ओल्या पार्टीच्या विचारात बुडाले. • रघू पुन्हा एकदा मुख्य रस्त्यावर आला आणि त्याने जवळच असलेल्या झाडांनी वेढलेल्या त्या दालनाच्या इमारतीकडे पाहिले. आता त्याच्या मनात राग नव्हता. ईर्षाही नव्हती. उलट केदारमुळे आज त्याला स्वतःतली वीज पुन्हा एकदा जाणवली होती. कित्येक वर्षे अनिच्छेच्या शिळेखाली पिचत पडलेले आयुष्य आज खडबडून उठले होते. सकाळपासून शर्टवर पडलेला डाग त्याला बोचत होता, पण आता ते त्याला बिरुद वाटू लागले. 'एकच घटना, पण तिचे परिणाम किती वेगवेगळे! या घटनेने आपण खडबडून जागे झालो खरे, पण आधी आपण गावी कायमचे निघून जायचे ठरवले. गावी जाऊन आयुष्यभर शेवाळासारखे एकाच डबक्यात राहून लोकांचे टोमणे ऐकत रोज मरत राहिलो असतो. आपल्यातली वीज जागी झाली, पण तिला योग्य आभाळ दाखवलं चांदोरकरांनी. खरंच आज सेलिब्रेशन डे आहे! आज माझं पहिलंवहिलं चित्र चक्क एकेचाळीस हजार पाचशे रुपयांना विकलं गेलंय!' एकदम कात गळाल्यासारखे रघूला वाटू लागले. आता करण्यासारखे बरेच काही त्याच्यापाशी होते. त्याचा विचार करत चालत असताना त्याला एके ठिकाणी दाटीवाटीने उभा असलेला गजबज घोळका दिसला. त्याने जवळ जाऊन टाचा उंचावून पाहिले. दोनतीन माणसे कसलासा वस्तूंचा आणि चिठ्ठ्यांचा पसारा एका लुंगीवर मांडून बसली होती. "बोलो भाई.. नसीब का खेल.. पाच दो दस लो, दस दो बीस लो.. चिठ्ठी निकालो नसीब आजमाओ.." खिसे क्षीण असणाऱ्यांचा हा आवडता जुगार. पत्ते बित्ते भानगड नाही. पाच रुपये द्यायचे, चिठ्ठी उचलायची. चिठ्ठीत जितका आकडा असेल तितक्याचा माल मिळेल. लाकडी पेटी, कंगवा, पेन.. काय वाट्टेल ते. पुढे आणखी पाचदहा रुपये दिले की चिठ्ठीच्या दुप्पट माल मिळणार असे काहीसे ते निराळे गणित होते. तो पाहत होता तेव्हा एका माणसाने पहिले पाच देऊन फक्त दोन रुपये कमावले होते आणि आता तो इरेला पेटून दुसरी नोट काढत होता. त्याने वट्ट दहा रुपये काढले आणि कानाच्या पाळ्या तापतील इतक्या गरम शिव्या देत त्याने पैसे टाकून एक चिठ्ठी उचलली. "साला आपन आपन है.. बाबाका हाथ है सरपे.. पता था आपनको दसका बीस होएगा.." त्याला दहा देऊन वीस रुपये मिळाले. लोकांनी एकच गलका केला. डोळे मोठे करीत तो वीसची नोट घेऊन तिथून उठला. त्याच्या पाठीवर थापा पडल्या, त्याला लोकांनी कायच्या काय विशेषणे लावली. त्याच्या काळपट तेलचेहऱ्यावरुन, मोठ्या चमकणाऱ्या डोळ्यांमधून ओसंडणारे अतीव समाधान आणि विजयभाव त्या चित्रकाराच्या नजरेतून सुटला नाही. त्याला नवल वाटले. इतका शुद्ध स्वरुपातला झगझगीत विजयी, समाधानी चेहरा त्याने कधी पाहिला नव्हता. त्या विजयी व्यक्तीने तिथून झोकांड्या देत प्रयाण करताच त्याचेही खेळातून लक्ष उडाले आणि तो त्या माणसाकडे पाहू लागला. तो माणूस जगमालकाच्या चालीने रस्त्यापलिकडच्या टपरीकडे गेला. ऐटीत सिगारेट मागितली आणि तिथल्याच एका कट्ट्यावर एक पाय पोटाशी घेऊन विजयाचे झुरके घेत बसला. त्या फाटक्या शर्ट-पँटने झाकलेल्या दरिद्री कातडीवर आलेली ही क्षणिक विजयाची लव किती सुखद आणि झिरझिरीत असेल! हा खरा जगण्याचा क्षण. ही झिंग खरी. जीवनरस कोंदट बाटलीत बंद करुन पंचवीस वर्षे रोज थोडा थोडा पिण्यापेक्षा दुर्दम्य वासनेने एका मिनिटात त्याच्या पहिल्या ताज्या चवीसकट रिचवण्याचे सुख काही औरच. 'जे घडेल त्याला सिक्वेन्स समजायचे आणि म्हणायचे बिंगो!' आनंदचे वाक्य रघूला आता चपखल समजले. एक दीर्घ श्वास घेऊन तो तिथून चालू लागला. संध्याकाळ पिवळ्या काजूसारखी भासत होती. आभाळात तुरळक ढग होते आणि त्यांच्यावर हळद उधळली असावी असे वाटत होते. रघू चालत चालत नदीपात्रापाशी आला. नदीच्या पुलावरुन कुणा अज्ञाताच्या लग्नाची वरात चालली होती. बँडवाले गाणी वाजवत होते आणि लोक नाचत होते. रघूला तो माहोल एकदम ओळखीचा वाटला. सकाळी महाजनांच्या डॉल्बीवर हेच गाणं लागलं होतं, नाही का? पण आता ते कर्कश वाटत नव्हतं. तो पुलाच्या तोंडाशीच वरात पाहत थांबला. वरात सरकत सरकत रघूपाशी आली. त्या नाचणाऱ्या लोकांना पाहून रघूचे पाय आपोआप तालावर थिरकू लागले. तो त्यांच्यात सामील झाला आणि त्या बेभान गर्दीतलाच एक होऊन मनसोक्त नाचला. पण नाचणाऱ्या इतर लोकांसारखा त्याचा जल्लोष उथळ नव्हता. मैलोनमैल पसरलेल्या वैराण माळावर चालताना अचानक दाट हिरव्या रंगाचे डेरेदार झाड दिसावे तशा पाचूच्या आनंदाचा तो जल्लोष होता. हळूहळू सरकत ती वरात तशीच पुढे गेली आणि रघू परत नदीच्या घाटापाशी आला. घाटाच्या पायऱ्या उतरता उतरता पुन्हा तो The Orange Spineचा विचार करु लागला. 'त्या विकत घेणाऱ्याला माझ्या चित्रात काय दिसले असेल? कोणता साक्षात्कार त्याला ते चित्र एकरकमी एवढी किंमत देऊन विकत घेण्यास प्रवृत्त करुन गेला असेल? एकेचाळीस हजार पाचशे! थोडेथोडके नाहीत!! माझी चित्रे नुस्तीच चित्रे नाहीत. त्यांना स्वतःचा असा दर्जा आहे.. ती घराबाहेर पडू शकतत, जहांगीर किंवा ऑबेरॉयमधे दिमाखाने मिरवू शकतात. त्यांना एकेचाळीस हजार पाचशे इतकी किंमत मिळू शकते! एखादी किक बसावी तसा पापणी लवताच सगळा माहोल बदलून गेला. समोरचं वाहतं पाणी, पुलावरची गर्दी, आभाळातील पाखरे, वाहता वारा हे सर्व त्याला अधिक जिवंत वाटू लागले. सारे भवताल जणू पाणी शिंपडावे तसे ताजेतवाने झाले. अगदी हेच त्या जुगारवाल्या फाटक्या माणसाला वाटलं असेल का? त्याने दहा रुपये देऊन वीस रुपये मिळवले आणि मी एक चित्र देऊन एकेचाळीस हजार पाचशे! रघू शेवटच्या पायरीवर बसला आणि बॅग काढून त्याने बाजूला ठेवली. आता लवकर गोष्टी ठरवल्या पाहिजेत. या चित्रकाराकडे बरीच कामं आहेत. आता मी स्वतः कलादालनात प्रदर्शन लावणार! खांडेकरांच्या शिफारसीची गरज नाही! शिवाय तो सकाळी तयार केलेला लिफाफाही पोस्टात टाकायचा राहून गेलाय. तो लवकर पोस्ट केला पाहिजे. परवा लास्ट डेट आहे. ती संस्था नक्की माझ्या चित्रांची निवड करेल! लिफाफ्याची आठवण होताच रघूने सहज बॅगेतून तो सफेद लिफाफा काढला आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहिले. पण त्याच्या नजरेला तो अनोळखी वाटला. हा आपला लिफाफा नाही.. त्यावर निळ्यालाल रंगाचा लोगो होता आणि वर कोपऱ्यात एका आकड्याची पट्टी प्रिंट करुन चिकटवली होती. तो आकडा होता, 'एकेचाळीस हजार पाचशे!' ते पाहून रघू एकदम झिंगल्यासारखा झाला. हे पाकीट इथे कसे आले? आणि अर्जाचे पाकीट कुठे गेले? त्याला काहीच कळेनासे झाले. पण दोन क्षणांतच एकेचाळीस हजार पाचशेंचे गारुड त्याच्या मनावर एवढे चढले की ही गफलत कशी झाली हा विचार त्याच्या मनातून निखळून पडला आणि तो वेगळ्याच विचारात बुडाला. जादूचा आकडा! इतकं तंतोतंत साम्य या दोन आकड्यांमधे? बेचाळीस नाही, चाळीस नाही. पाचशे पन्नास नाही की नऊशे त्र्याहात्तर… काहीच नाही. बरोबर एकेचाळीस हजार पाचशे! या योगायोगामुळे रघूचा आत्मविश्वास आणखी बळावला. मघापासून तो केदारच्या जागी स्वतःला विणत होता, त्याला जणू दुजोराच मिळाला. कुणीतरी अगदी नेम धरून मारावी, अशा मोक्याच्या वेळेस ती-तेवढीच किंमत मूर्त स्वरुपात त्याच्या हातात आली होती. रघूला आपली कंपनी, देशमुख, दर दोन वाक्यांमागे उगाच हसणारे सावंत, SK Group या सगळ्याचा पूर्ण विसर पडला. कुठल्याही भावनेवर मात करेल अशी जालीम धुंदी त्याला चढली होती. त्या धुंदीतच तो उठला. एखादा पुरस्कार घ्यायला स्टेजवर चढत आहो अशा आविर्भावात तो त्या पायऱ्या चढू लागला. शेवटची पायरी चढल्यावर त्याने डाव्या बाजूला जणू पुरस्कार प्रदान करायला कुणीसे उभे आहे अशा प्रकारे त्यांना किंचित लवून अभिवादन केले आणि आपलाच हात पुढे करुन ते पाकीट नव्याने हातात आल्यासारखे पाहिले. त्याने ते पाकीट उघडले. एकेचाळीस हजार पाचशेचे ते जाड बंडल हातात येताच तो जगज्जेता झाला. त्या पैशांकडे त्याने एकवार पाहिले, त्यांच्यावरुन हात फिरवला आणि नीट घडी करुन त्याने ते बंडल खिशात ठेवून दिले. • "अगं मी कितीवेळा लावला त्याला फोन, पण स्विच ऑफ येतोय.." मीरा आत्याला सांगत होती. "काय गं बाई.. त्याला भेटायचंच नाहीये की काय तुला?" आत्याने शंका मांडली. "नाही गं.. असेल काहीतरी प्रॉब्लेम. बरं ऐक, आता घरी तर बोलवता येणार नाही, सो मी ठरलेल्या ठिकाणीच भेटते त्याला. ते हॉटेल paradise फार लांब नाही ना इथून?" "घ्या! तुला भेटायचं ठिकाणच माहित नाही होय!?" "अगं माहित आहे, पण तुझ्या नव्या घरापासून कसं जायचं हे सांगशील का?" मग आत्याने तिला सविस्तर वर्णन करुन रस्ता सांगितला. आणि शेवटी म्हणाली, "ही चावी घे, माझी स्कूटी घेऊन जा. जाशील ना व्यवस्थित?" "हो गं.. त्यासाठी मुद्दाम लवकर निघतेय मी." मीरा खबरदारी म्हणून अर्धा तास आधीच आत्याच्या घरुन निघाली. पण तिथून स्कूटीवर पॅरॅडाईज काही फार लांब नव्हते. त्यामुळे थोडसं भरकटूनही मीरा शास्त्री रोड, टिळक रोड वगैरे करत पूना हॉस्पिटलचा पूल ओलांडून वेळेच्या बरंच आधी कर्वेरोडला आली. पॅरॅडाईजच्या आवारात गाडी लावून तिने घड्याळ पाहिले. सहाला अजून दहा मिनिटे कमी होती. • आता कुठे जावे याचा विचार करत रघू फर्ग्युसन रोडच्या दिशेने चालू लागला. नदीपात्रावर दूरपर्यंत पसरलेले आभाळ तन्मयतेने संध्याकाळ चितारत होते. कडेला कुठल्याशा इमारतीमागे सूर्याचा तुकडा उरला होता आणि तिथून लालपिवळा रंग धुराप्रमाणे वरच्या पटलावर पसरत होता. खाली संथ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यानेही तेच रंग बरोबर उचलले होते. केदारसारखे!? रघू हसला. त्याला आता मुक्त झाल्यासारखे वाटत होते. सूडभाव नाही, रागही नाही.. फर्ग्युसन रोडवर आता वर्दळ वाढली होती. एरवी तो या सगळ्या गजबजाटात मानेवर कसलंतरी अदृश्य ओझं वाहत संथ पावलांनी चालत असलेला दिसे. पण आता दहा माणसांमधे वेगळी काढता येईल अशी ऐट त्याच्या चालण्यात आली होती. वाटेत रघूने एक सिगरेट विकत घेतली. सिगरेट ओढण्यामधे एक वेगळीच ऐट असते! ती हातात असली की माणसाला नवीनच आब येतो! गडकऱ्यांच्या त्या कुठल्याशा वाक्याच्या चालीवर- ऐट दावण्यासारखे जोपर्यंत काही जवळ आहे, तोपर्यंत सिगरेट ओढण्यात मौज आहे! त्याने ठसकत ती सिगरेट ओढून संपवली आणि नंतर तो आरास मांडावी तशा मांडलेल्या फर्ग्युसन रोडवरच्या छोट्या छोट्या दुकानांच्या रांगेतून खूप हिंडला. आज तो काहीही विकत घेऊ शकला असता. पैशांनी माणसाला व्यक्तिमत्व येते हेच खरे! पैसा जवळ असला की माणूस वस्तुनिष्ठ होतो, आणि नसला की तत्वनिष्ठ होतो! रघूने आज ही दोन्ही रुपे अनुभवली होती, आणि त्याला हे नवे रुप जास्त आवडू लागले होते. रघूने खूप वस्तू न्याहाळल्या. दहापासून हजारपर्यंत किंमतीची घड्याळे, कसले कसले ब्रेसलेट्स, गॉगल्स, शूज, कपडे आणि काय काय. पण अचानक इतके पैसे हातात आल्यामुळे तो गोंधळला होता, आणि त्याने अजून काहीच विकत घेतले नव्हते. यात किती वेळ गेला त्याचं त्यालाही समजलं नाही. काय घ्यावे याचा विचार करत तो एका दुकानापाशी आला आणि दुकानात टांगलेल्या घड्याळाकडे त्याचे लक्ष गेले. साडेसहा वाजत आले होते. सहा वाजता आपण मीराला भेटणार होतो हे त्याला अचानक आठवले. या सगळ्या गदारोळात ही इतकी महत्वाची गोष्ट कशी विसरलो आपण? त्याला स्वतःचा प्रचंड राग आला. पण मीरानेही फोन का केला नाही याचे त्याला नवल वाटले. किमान आपण तिला फोन करुन कळवावे असा विचार करत त्याने खिशातून फोन काढला. आपला फोन बंद पडलाय हे आत्ता त्याच्या लक्षात आले. तो आणखीनच उद्विग्न झाला. पण फोनच्या खनपटीस न बसता तो तडक त्या दुकानांच्या ओळींतून बाहेर पडला आणि Hotel Paradiseच्या दिशेने धावत सुटला. • अर्धापाऊण तास होऊन गेला तरी अजून राघवेंद्रचा पत्ता नव्हता. तोही आपल्याप्रमाणेच लवकर आला असेल असे मीराला वाटले होते. पण सहाचे ठोके पडूनही बराच वेळ झाला तरी तो काही आला नाही. हॉटेलमधे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी ती राघवेंद्रची आपण तयार केलेली प्रतिमा ताडून पाहत होती. तिने पुन्हा दोनतीनवेळा त्याला फोन लावला आणि तो बंदच येतो आहे म्हटल्यावर त्याला भेटायचेच नाही की काय, असे तिला आतून वाटू लागले. अजून तिचे स्वतःचेच यावर एकमत झाले नव्हते, तरी आता अजून वाट पाहण्यात अर्थ नाही असं म्हणत ती उठली आणि काऊंटरवर बिल चुकते करुन बाहेर पडली. • रघू धावत हॉटेलमधे येऊन पोहोचला. नेहमीप्रमाणे paradise वर गर्दी होतीच. त्याने मान उंच करुन सगळीकडे पाहिले. पण मीरा कुठे दिसली नाही. त्याला याच गोष्टीची भीती होती. पण हे होणारच होते. सहा वाजून इतका वेळ झाला तरी आपला पत्ता नाही, फोनही बंद, त्यामुळे काहीच संपर्क नाही.. तिचे निघून जाणे अगदीच बरोबर होते. आता काय करावे हा विचार करत असता त्याच्या समोरुन कुणीसे हॉटेलबाहेर पडले आणि रघूला तो चेहरा ओळखीचा वाटला. लगेच त्याची खात्री पटली की ही मीराच होती. तो तिच्या मागोमाग हॉटेलमधून बाहेर आला, आणि त्याने तिला हाक मारली. मीराने चमकून मागे पाहिले. फर्ग्युसन रोड ते कर्वे रोड एवढं अंतर धावत आल्यामुळे आधीच बिघडलेला रघूचा अवतार आणखी बिघडला होता. पण त्या अस्ताव्यस्त लवाजम्यात त्याचा चेहरा मात्र अजूनही टवटवीत होता. मीराने दोन क्षण त्याच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. "राघवेंद्र" असं म्हणत रघूने हात पुढे केला. "मीरा" ती हात मिळवून म्हणाली. "सॉरी, मला यायला उशीर झाला.." "Its ok," मीराने रघूचा अवतार पाहिला आणि ती म्हणाली, "ऑफिसवरुन धावत वगैरे आलास की काय!?" आधी काय चित्रपट घडला होता हे मीराला ठाऊक नव्हते. रघू ऑफिस संपवून आपल्याला भेटायला येणार आहे, असेच तिने गृहीत धरले होते. रघूने आत्ता आपल्या अवताराकडे पाहिले आणि तो हसला. "ती एक वेगळीच कहाणी आहे! सांगेन तुला. आपण बसूयात का कुठेतरी?" "हो, पण इथे नको. दुसरीकडे कुठेतरी जाऊ." रघू दुसरीकडे कुठे जावे याचा विचार करत असताना मीराने आपल्याकडे गाडी असल्याचे त्याला सांगितले. "माझ्या आत्याची स्कूटी घेऊन आले. ती स्वारगेटला राहते." "हे उत्तम! पण तुझी आत्या पुण्यात असते हे माहित नव्हतं." "दोन महिन्यांपूर्वीच आली. तिचं नवीन घरही पाहायचं होतं मला, म्हणून हा दौरा केला!" "मग किती दिवस आहे मुक्काम?" "उद्याच जायचा विचार होता, पण आत्या काय सोडतेय!? परवा जरी सोडलं तरी नशीब!" दोघांनी एव्हाना paradise मागे टाकले होते आणि त्यांची गाडी कर्वेरोडवरून प्रभात रोडकडे चालली होती. बरीच वळणे घेत एका शांत रस्त्यावर असलेल्या ccdपाशी येऊन गाडी थांबली. “मी आणि माझा मित्र आनंद नेहमी इथे येतो," रघूने आत जाता जाता मीराला सांगितले, "इथली कॉफी एकदम मस्त असते! आम्हा दोघांचा हा सेलिब्रेशन पॉईंट आहे. काहीही सेलिब्रेट करायचं असलं की आम्ही इथेच येतो." "अरे वा! मग आज कसलं सेलिब्रेशन आहे?" रघू संभ्रमात पडला आणि काही क्षण गप्प राहिला. पण खरंतर त्याला आतून पूर्वीसारखा संकोच वाटत नव्हता. आपली ओळख आपल्याला आवडू लागली असताना ती लपवून का ठेवायची? उलट आता अभिमानाने सांगता आलं पाहिजे, मीही चित्रकार आहे! "आज माझं पहिलं मोठं पेंटिंग विकलं गेलं. त्याचं हे सेलिब्रेशन." रघूने सरळ सांगून टाकले. "अरे वा! Congratulations!" मीरा म्हणाली. रघूला हा सहजसाधा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. "तुला आश्चर्य नाही वाटलं? मीही चित्रकार आहे हे मी तुला सांगितलं नव्हतं." "मला बरीचशी खात्री होती आणि थोडासा डाऊट होता!" मीराने डोळे मिचकावले. "कसं काय?" "तुला वाचता येणं फार सोपं आहे! अरे तू पत्रात ज्याप्रकारे एखाद्या पेंटिंगबद्दल बोलायचास, ते स्वतः artist असल्याशिवाय पॉसिबलच नव्हतं. पण म्हटलं मी हटकण्यापेक्षा तू स्वतःहून कधी सांगतोस ते बघावं!" रघू आणि मीरा दोघेही हसले, आणि मग कॉफी पिता पिता एकमेकांच्या चित्रशैलीवर बोलू लागले. रघूला आता कसलाही आडपडदा उरला नव्हता. बराच काळ साचलेले मळभ नाहीसे होऊन आभाळ स्वच्छ झाले आहे, असे त्याला वाटत होते. त्याचा आत्मविश्वास दुणावला. त्या पाकिटातून ज्याक्षणी त्याने पैसे काढले, तेव्हाच त्याच्या नैतिकतेवर त्या आकड्याचा अंमल चढला होता; पण पेंटिंगबद्दल मीराकडे बोलल्यानंतर तो आणखी दृढ झाला. ते पैसे आपलेच, ते विकले गेलेले पेंटिंगही आपलेच याबद्दल त्याच्या मनात कसलाही संदेह उरला नाही. • Ccd मधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी मॉलमधे जायचे ठरवले. रघूच्या अवतारात जरा सुधारणा व्हावी या हेतूने मीराने त्याला नवे कपडे घ्यायचा आग्रह केला होता. 'चित्रकाराने कसे चित्रकारासारखे दिसायला हवे,' हे तिचे म्हणणे रघूला अगदीच पटले, आणि दोघे मॉलकडे जायला निघाले. रघूने खास लेखक-चित्रकारांकडे असते तसे जाकीट घ्यायचे ठरवले. शिवाय ती विशिष्ट टोपीही हवी! तिचं नाव माहित नाही, पण विजय तेंडुलकर घालायचे तशीच! मॉलमधे बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना हवे तसे जाकीट सापडले. त्याच्या रंगावर, टेक्श्चरवर दोघा चित्रकारांनी बरीच चर्चा केली आणि शेवटी ते पसंत केले. नंतर रघू टोपीची शोधाशोध करु लागला आणि मीरा सहज म्हणून तिथे टांगलेल्या पर्सेस पाहू लागली. त्यातली एक तिला आवडलीही होती, पण ती विकत घेण्याचा तिचा विचार दिसला नाही. ती इतर वस्तू पाहत पुढे गेली. तिला आवडलेली पर्स रघूने दुरूनच हेरली होती. तिच्या नकळत ती त्याने घेतली आणि हे मीराला काऊंटरवर समजले. कपड्यांची मुख्य खरेदी झाल्यानंतर दोघे इतर दुकानांतून हिंडले. दाट तपकिरी शिसवी लाकडात कोरलेले, खूप नक्षीकाम असलेले एका बेटाचे शोपीस मीराला खूप आवडले. रघूने ती एकसारखी दोन बेटे विकत घेतली. शिवाय गुलज़ारांचा एक काव्यसंग्रह, कडेने निळी लकाकी असलेले काळ्या रंगाचे wristwatch, तळहाताएवढ्या चौकटीत रंगीत दगडांचे लहानलहान तुकडे बसवून केलेली Van Goghच्या The Starry Nightची प्रतिकृती, अशी मनसोक्त खरेदी झाल्यावर दोघे मॉलमधून बाहेर पडले. आता अंधार पडू लागला होता. रस्त्यावर वर्दळ होती म्हणून दिव्यांचा झगझगाट होता. रघूने मॉलच्या पार्किंगमधून गाडी काढली आणि तो तिच्यापाशी आला. "ते कलादालन इथून जवळ आहे ना रे?" मीराने विचारले. ती गेल्या वर्षी कलादालनात येऊन गेली होती, त्यावरुन तिला पुसटसे आठवले. मीराचा प्रश्न ऐकून रघू थोडा हबकला आणि त्याने मानेनेच होकार दिला. "जाऊयात?" तिने विचारले. कलादालनात पुन्हा जायचे या विचाराने रघूला थोडे हसू आले. पुन्हा एकदा ते प्रदर्शन वेगळ्या नजरेने अनुभवू असा विचार करुन तो म्हणाला, "हो जाऊयात की!" • कलादालनाच्या आवारात गाडी लावून दोघे जिन्याकडे जात असताना त्या वॉचमनला उभे का रहावे वाटले कोण जाणे! काही तासांपूर्वी ज्याला आपण ओढत खाली आणले तो हाच, हे त्याला मुळीच समजले नाही. कपडे बदलले की माणूस बदलतो! माणसाची पत मापायचे सर्वात सोपे परिमाण- कपडे! रघूने त्याच्याकडे हसून पाहिले आणि दोघे वर गेले. मीरा एकेक चित्र पाहू लागली. रघू थोडावेळ तिच्यासोबत थांबला, आणि मग सरळ The Orange Spine पाशी जाऊन उभा राहिला. शांतपणे तो एकेका तपशिलाकडे पाहत होता. काहीवेळाने मीराही तिथे पोहोचली. "काय सुंदर आहे रे हे!" रघू गालातल्या गालात हसला. 'जादूचं चित्र आहे हे!' त्याने मनात म्हटले. हे चित्र त्याचं आहे हे मीराला सांगायचं नाही असं त्याने आधीच ठरवलं होतं. ‘खरंतर हे चित्र केदारचंच आहे. माझ्यातली वीज जेव्हा मला परत मिळाली, तेव्हा मी हे त्याला देऊन टाकलं!’ दोघांनी त्या चित्रावर बरीच चर्चा केली. उरलेली चित्रे पाहून मग दोघे टेबलपाशी गेले. तिथे अभिप्रायाची वही ठेवली होती. मीराने त्यात अभिप्राय लिहील्यावर रघूने ती वही आपल्याकडे ओढली. त्याने Dear Kedar लिहून आख्खी चौकट मोकळी सोडली, आणि शेवटी लिहीले, Thank you. Regards, Raghvendra. नंतर दोघे दालनाच्या बाहेर पडले. मीराला हा चित्रकार मित्र त्याच्या पत्रांइतकाच प्रत्यक्षातही आवडला होता. खरतंर तो इतका 'fun loving' असेल असं तिला वाटलं नव्हतं! किंबहुना ती त्याला आज सकाळी भेटली असती तर तिला वेगळाच अनुभव आला असता. रघूने मघाशी 'अवतार संपला' असे चांदोरकरांना म्हटले ते एकाअर्थी खरेच होते. त्याचे पूर्वीचे अडगळीत पडल्यासारखे झालेले आयुष्य संपले होते आणि त्या पेंटिंगमुळे नवे उदयाला आले होते. दोघे काही न बोलता दालनाच्या पायऱ्या उतरत होते. दोघांच्याही मनात भेटीपासून घडलेल्या घटनांची उजळणी चालली होती आणि एकमेकांच्या संदर्भाने ते स्वतःला जोखत होते. आत्याच्या म्हणण्याप्रमाणे मीराला अजूनतरी राघवेंद्र ती विशिष्ट व्यक्ती आहे, असे वाटले नव्हते. इतर चारचौघांसारखाच तो केवळ एक मित्र होता. त्यातून तिने अंदाज केला होता त्याहून जास्त अंतर त्यांच्या वयात होते. ही गोष्ट राघवेंद्रसोबत असताना तिला सतत जाणवत होती. त्यामुळे पत्रव्यवहारातून गहिरी झालेली आपली ओळख कोणाच्याही बाजूने आधी आवड, मग प्रेम या दिशेने जाऊ नये, असे तिला वाटले. आता आठ वाजत आले होते, त्यामुळे मीराने निघायचे ठरवले आणि जाताजाता उद्या आत्याच्या घरी येण्याचे रघूला आमंत्रणही दिले. त्याने ते आमंत्रण स्वीकारले. मग त्याला निरोप देऊन मीरा निघून गेली. ती गेल्यावर रघूही बसस्टॉपच्या दिशेने चालू लागला. 'आजचा दिवस संपला. विचित्र कलाटण्या घेऊन संपला! ते काहीही असो, पण शेवट चांगला झाला हे महत्वाचे!' पण अजून एक हिशोब चुकता करायचा राहिला आहे हे रघूच्या ध्यानीमनीही नव्हते. किंबहुना ते नसणेच त्याच्या माणूसपणाचे लक्षण होते! अचानक सारे आयुष्य एका बिंदूभोवती गोळा होते, आणि त्यापुढे सारी अवधानेसुद्धा गळून जातात. ययातिला सोनेरी केसांच्या मुलीपुढे सगळे फिके वाटले, डॉन किझोट लोकांच्या शिव्या खाऊनही आंधळेपणाने स्वतःला लढवय्या समजत राहिला.. व्यक्ती, वस्तू, विचार- कशानेतरी ही माणसे पुरती झपाटून गेली आणि अस्ताला जाताना इतरांपेक्षा जास्त उजळून गेली. आज त्यात आणखी एकाची भर पडणार होती. सिग्नल पडला आहे हे पाहून रघूने रस्ता ओलांडला आणि बसस्टॉपच्या दिशेने तो जाऊ लागला. तो रस्ता ओलांडत असताना सिग्नलला थांबलेल्या एका व्यक्तीचे त्याच्याकडे लक्ष गेले. प्रथम तिने त्याला नव्या वेषात ओळखले नाही, पण निरखून पाहिल्यावर त्या व्यक्तीची खात्री पटली आणि सिग्नल सुटल्यावर ती त्याच्यामागे गेली. बाईकचा हॉर्न वाजवत ती रघूच्या शेजारी येऊन उभी राहिली. "अरे काळेसाहेब, इकडे कुठे?" "म्हटलं लक्ष जातंय की नाही तुझं! या कपड्यांमुळे आधी ओळखलंच नाही मी तुला!" काळ्यांनी त्याच्या नव्या जाकीटाकडे पाहत म्हटले, "काय लग्नाबिग्नाला गेला होतास की काय?" "हो," रघू अनपेक्षितपणे म्हणाला. काळ्यांना इथे अचानक भेटून तो जरा गोंधळला होता. "हं, तुम्ही जाताय लग्नाला आणि तिकडे देशमुख टेन्शनमधे आलेत!" "का? काय झालं?" "पैसे कुठायत?" पोलिसाच्या थाटात काळ्यांनी मिश्किलपणे प्रश्न केला, आणि त्यामुळे रघूचा नूरच बदलला. आत्तापर्यंत वेगवेगळ्या घटनांखाली दबला गेलेला पैशांचा मुद्दा आता उसळी मारून वर आला. पण अजूनही त्याला ते पैसे आपल्याकडे कसे आले याचा उलगडा झाला नव्हता. किंबहुना त्याचा त्याने विचारच केला नव्हता. "कसले पैसे?" त्याने विचारले. "अरे SK Groupचं पेमेंट.. तू सकाळी देऊन गेलास ते. एकेचाळीस हजार पाचशे. कुठायत ते? ड्रॉवरमधे तर नव्हते!" रघूला काहीच माहित नसणार हे काळ्यांनी हेरले होते आणि त्यांना त्याची फिरकी घ्यायची हुक्की आली होती. "अहो पण ड्रॉवरमधेच ठेवले होते मी.." रघू सावधगिरीने बोलू लागला. "हो, ड्रॉवरमधे तू एक पाकीट ठेवलंस. पण ते पेमेंटचं पाकीट नव्हतं! त्यात तुझा कसलासा अर्ज की काहीतरी होता. पैसे नव्हतेच! ते पाहून देशमुख टेन्शनमधे..." काळ्यांचं पुढचं बोलणं त्याला ऐकूच आलं नाही. सगळ्या गफलतीचा त्याला स्वच्छ उलगडा झाला होता आणि मघाशी जे खर्च केले, ते आपल्या पेंटिंगचे पैसे नसून कंपनीचे होते हा डंख झाल्यासारखा साक्षात्कार त्याला झाला. तो एकदम सुन्न झाला. काळे काहीतरी विचारतायत हेही त्याला जाणवले नाही. शेवटी त्यांनी त्याला गदागदा हलवले तेव्हा तो भानावर आला. "अरे फोन का बंद होता तुझा?" त्यांनी तिसऱ्यांदा तो प्रश्न विचारला. "अं? तो जरा बिघडलाय." "अच्छा. पण ते पाकीट आहे कुठे? चुकून अर्ज समजून पोस्टात नाही ना टाकलंस? मग वाजला सगळा बोऱ्या!" "नाही. ते घरीच राहिलं असणार. हो, घरीच आहे ते." रघूने थाप मारून वेळ निभावून नेली. "मग ठीक आहे. उद्या आल्या आल्या ते देशमुखांच्या हातात ठेव, तरच त्यांचा जीव भांड्यात पडेल! बाय द वे, आम्ही सावंतांच्या पार्टीसाठी भेटतोय- इथल्याच हॉटेलमधे. देशमुखसुद्धा आहेत. तू भेटतोस का त्यांना?" "नाही नको. मला आणखी एक काम आहे. त्यापेक्षा तुम्हीच सांगा ना, मी भेटलो होतो म्हणून.." "तसंही चालेल! बरं चल मी निघतो. बाकीचे वाट पाहत असतील," असं म्हणत काळ्यांनी बाईक सुरु केली आणि ते निघून गेले. काळे निघून गेले आणि रघूचा चेहरा पांढराफटक पडला. उद्या ऑफिसवर गेल्या गेल्या देशमुखांच्या हातात पैसे ठेवले पाहिजेत. अखंड एकेचाळीस हजार पाचशे रुपयांचं पाकीट. पण आता शक्य आहे का हे? रघू आतून चांगलाच हादरला. आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा कुणीतरी खसकन ओढून काढावा आणि खऱ्या चेहऱ्याजागी अनोळखीच चेहरा दिसावा तसे त्याला वाटू लागले. तो दबकत एका निर्जन कोपऱ्यापाशी आला आणि त्याने खिशातले बंडल काढले. मघाशी बंडलमधून जे थोडे पैसे काढले होते, तेही काढून सगळे पैसे मोजले. सारा खर्च दहाबारा हजार झाला होता. रघूला आपल्या चुकीची जाणीव आता वारंवार टोचू लागली. त्या खर्च झालेल्या पैशांची पोकळी त्याला फार भयाण वाटू लागली. आता काही करायचे नाही, कुणाच्याच नजरेस पडायचे नाही, थेट घरी जायचे असे त्याने ठरवले. त्याच विचारात तो बसस्टॉपवर गेला. आता त्याला चांगलेच अपराधी वाटत होते आणि सगळं जग आपल्याकडेच रोखून पाहतंय अशी त्याला सारखी जाणीव होत होती. बसची वाट बघत उभ्या असलेल्या माणसांपासून थोडं अंतर ठेऊन तो उभा होता. आज साली बसही लवकर येत नव्हती. • रघू तिथे उभा राहिला खरा, पण त्याला आता आजूबाजूचे जग अधिकच भयाण वाटू लागले. सगळे आवाज धारदार असल्यासारखे कानावर आदळू लागले. तेवढ्यात अचानक रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या एकदम थांबल्या. सर्वजण गाड्यांमधून बाहेर पडले, बसमधून उतरले. सगळ्या माणसांनी हातातली कामं टाकून रघूकडे रोखून पाहायला सुरुवात केली आणि ते हळूहळू त्याच्याजवळ येऊ लागले. रघू प्रचंड भेदरला. त्याने बॅगेचा बंद घट्ट धरला आणि तो मागे सरु लागला. पण ती माणसे थांबली नाहीत. त्याची भीती अजूनच वाढली आणि तो आकांताने पळू लागला. कुणी त्याच्या मागे आले नाही पण तरी तो पळत राहिला. आडवीतिडवी वळणे घेत कितीतरी गल्ल्या त्याने ओलांडल्या. शेवटी एका निर्जन रस्त्याला आल्यावर तो थांबला. त्याने रस्त्याकडेला असलेल्या एका कट्टयावर आपले अंग झोकून दिले. थोड्या वेळाने धाप थांबली. पण त्याला अजून गरगरत होतं. तो कितीतरी वेळ डोळे मिटून तसाच पडून राहिला. काय करावं त्याला काहीच समजत नव्हतं. डोक्याची शकले झाल्यासारखं वाटत होतं. कुणीतरी या भयाण स्वप्नातून आपल्याला उठवावं किंवा हा दिवस पुन्हा सुरु करता यावा असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं. हजारो विचारांचा गोंधळ त्याच्या डोक्यात माजला. तो तिथे कितीवेळ बसून राहिला कुणास ठाऊक. पण उठल्यावर त्याला बरीच भूक लागली होती. वेळ-अवेळ..पोटाला काही समजत नाही.. आपण एक वेगळे जगतो, पोट एक वेगळं जगतं. खरा संघर्ष इथेच तर सुरु होतो! तो तसाच उठला. बॅग अडकवून दुबळ्या पावलांनी त्याने चालायला सुरुवात केली. समोर काही अंतरावर भुर्जीपावची गाडी दिसत होती, तिच्या दिशेने तो चालू लागला. तिथे बऱ्याच पदार्थांच्या गाड्या लागल्या होत्या आणि पाठीमागेच बार होता. रघू तिथे पोहोचला. त्याने भुर्जीपाव मागितला. "कितनेको है?" "पच्चीस रुपया" रघूने प्लेट घेतली आणि त्या दोन पावांमधला एक परत दिला. "एक बस साब?" "हं.." "क्या साब दो रुपया बचाते हो!" रघूने चमकून त्याच्याकडे पाहिले. पण तो स्वतःवरच मनात हसला. असे दोन रुपये वाचवून ती रक्कम भरून निघणार आहे का! तेवढ्यात बारमधून बाहेर पडणाऱ्या एका टोळक्याकडे त्याचे लक्ष गेले. सावंत आणि बाकीची कंपनीतली मंडळी बारमधून हसत खिदळत बाहेर पडत होती. त्यांना पाहून रघूला धडकी भरली. त्याने तडक भुर्जीपावची प्लेट ठेवली, पैसे दिले आणि तो अंधारात एका झाडाआड उभा राहिला. सावंत, देशमुख, काळे, पिसाळ, पवार सगळा स्टाफ तिथे होता. ते मोठमोठ्या आवाजात काहीतरी बोलत होते, जोरजोरात हसत होते.. सावंताबद्दल त्याला आता आदर वाटू लागला. पंचवीस वर्षे…एकसुरी तर एकसुरी, पण अशी जीवघेणी वळणं तरी वाट्याला येत नाहीत! पण आपण जास्त पिचलो गेलो, जास्त मागणी केली, जास्त ओढायचा प्रयत्न केला.. सगळं जास्त जास्त! उंच उडायचं की जमिनीलगत जास्तवेळ उडायचं; यात आपण उंची निवडली आणि आता तितक्याच वेगाने खाली येत आहोत. नाही… हे बरोबर नाही. काहीतरी केलंच पाहिजे. देशमुखांकडे पाहून त्याला मेल्याहून मेल्यासारखे होऊ लागले. तो तिथून निघाला आणि लपतछपत दूर एका वळणाआड गेल्यावर त्याला जरा हायसे वाटले. त्याने आजूबाजूला कुणी नाही असे पाहून पुन्हा पैसे काढले आणि नीट मोजले. मग ते खिशात ठेऊन तो चालायला लागला. एके ठिकाणी एटीएम दिसताच तो थांबला. एटीएम पाहून त्याला जरा आत्मविश्वास आला. खात्यावर दहाबारा हजार रुपये आहेतच. ही किंमत पूर्ण करण्याइतके तरी नक्कीच असतील याची त्याला खात्री झाली. त्याचे अंग जरा सैलावले. इतक्या वेळात प्रथमच त्याला वाऱ्याची गार झुळूक आल्हाददायक वाटली. तो एटीएममधे गेला आणि त्याने खात्यावरचे सर्व पैसे काढले. मग त्यांना या पैशांसोबत जोडून त्याने एकत्रितपणे ती रक्कम मोजायला सुरुवात केली. रक्कम भरत चालली होती. त्याच्या डोक्यावरचा भार कमी होऊ लागला. मणामणाचे ओझे ते आकडे खाली टाकतायत असं त्याला वाटू लागलं. एकेचाळीस हजार पाचशे हा आकडा जवळ येत होता. पण चाळीस हजार सातशेवर नोटांचे बंडल संपले. हातातोंडाशी आलेला घास हिसकून घेतल्यासारखे रघूला झाले. फक्त आठशे रुपयांची तफावत! हा खड्डा त्यामानाने छोटाच होता पण आता भरुन काढता येणे अशक्य होते. रात्रीचे अकरा वाजत आले होते. आत्ता पैसे मागायला जायचे तरी कुणाकडे? ताबडतोब काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर उद्या देशमुखांना तोंड दाखवता येणार नाही. रात्री नाही तर नाही, पण इतक्या सकाळी तरी पैसे कोण देणार? रघूचे डोके एकदम तापल्यासारखे झाले. रात्रीचे दहा..सकाळचे आठ.. मधले काळोखे दहा तास.. समोर पंचपक्वान्ने असावीत पण ती सगळी उष्टी निघावीत तसा तो वेळ त्याला उष्टा वाटू लागला. त्याची उद्विग्नता अजूनच वाढली. आज एकंदरीत सगळे प्रसंग संयमाची सीमा जोखणारेच होते. त्याची असहायता वाढू लागली. ह्या दिवसाला पडलेले भगदाड बुजत आले होते, पण फक्त हे शेवटचे आठशे रुपये.. रघूकडे स्वतःचे असे ओढूनताणून फक्त शंभर रुपये निघाले. उरले सातशे रुपये. मरण यावे तर सबंध एकेचाळीस हजार पाचशे रुपयांचे यावे नाहीतर येऊच नये. खरंच, एवढं सगळं झाल्यानंतर मरणाचे दुःख नाही. कशाचेच दुःख नाही! खुशाल पकडून न्यावे आपल्याला. त्या बापाच्या डोक्यात बाटली फोडणाऱ्या पोरासोबत आपल्याला डांबावे. आम्ही दोघे तसेच दगडाच्या डोळ्यांनी आढ्याकडे पाहत बसू. त्या उध्वस्तपणातही हसत राहू. 'येड्याने हे पैसे जोडण्याचा प्रयत्न केला, पण थोडक्यात तोंडघशी पडला', असे म्हणून कुणी आपल्यावर हसायला नको. या थोड्याशा सातशे रुपयांनी आपला घात होणे हीच सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट! राघवेंद्रने सगळे पैसे खर्च केले, किंवा राघवेंद्रने ते अजिबात खर्च केले नाहीत, ही दोनच विधाने खरी. रघूचा पेटता स्वाभिमान एकदम उमळून आला. एव्हाना तो चालत चालत पुन्हा बसस्टॉपपाशी आला होता. तिथे येता त्याने विचार केला, की घरी कदाचित पैसे सापडण्याची शक्यता आहे. त्याने आता घरीच जायचे ठरवले, आणि तो बसची वाट पाहत थांबला. पण काहीवेळाने नीट आठवल्यावर त्याच्या लक्षात आले की घरी काही पैसे आपण ठेवलेले नाहीत. या खोट्या आशेला धरुन राहण्यात अर्थ नाही. तो अजूनच चिडला. सातशे रुपये! सातशे रुपयांपायी मरण अटळ. आपल्या चित्राची खरी किंमत फक्त सातशे रुपयेच. विचारांचे घण त्याच्या डोक्यात बसू लागले. तशातच बस आली आणि तो यंत्रवत बसमधे चढला. रात्र बरीच झाली होती, त्यामुळे बसमधे फारसे प्रवासी नव्हते. रघू खिडकीशी बसला. त्याच्या वागण्यात आता एक वेगळाच निगरगट्टपणा आला होता. अटळ घटनांमधून जाताना येणारी असहायता आता दगडाची होऊन येतील ते वारे अंगावरून जाऊ देत नागडी पडली होती. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या सपाक्यात त्याला आजचा दिवस संपूर्ण आठवून गेला. पण त्याच्या चेहऱ्याने कशाचीच दखल घेणे सोडून दिले होते. दहाचे वीस रुपये मिळवणारा तो फाटक्या, बापाला मारणारा तो पोरगा, हे सगळे एकाच चिकट, रबराच्या कातडीने जोडलेले होते. रघू आज त्यातलाच एक झाला. त्याचा स्टॉप जवळ येऊ लागला होता. इथे येईतो सगळेच प्रवासी उतरून गेले. एकच डोकं पुढे बसलेलं दिसत होतं. दिवसभराची धावपळ संपवून कंडक्टर निवांत बसला होता. आता कुणी नवा प्रवासी चढायचा नाही. कारण दोन स्टॉप गेले की डेपो येणार.. बसल्याबसल्या तिकीटांचे पैसे पुन्हा मोजावेत म्हणून त्याने खाकी बॅगेतून ते बंडल काढले. आणि तो आरामात त्या नोटा मोजू लागला. त्याच्या उजवीकडच्या सीटवर बसलेल्या रघूचे लक्ष त्या पैशांकडे वेधले गेले. कंडक्टरने दहादहाच्या, वीसच्या, पन्नास-शंभरच्या नोटा क्रमवार लावायला घेतल्या. त्यात किमान तीनचार तरी शंभरच्या नोटा होत्या. पन्नासच्या मात्र बरोबर मोजून चार. म्हणजे झालेच की जवळजवळ सहाशे! आणि ते दहा-वीसचं बंडल शंभरदीडशेचं असायला काहीच हरकत नाही! रघू त्या पैशांकडे पाहत राहिला. जे करायचे ते लवकर केले पाहिजे. आपला स्टॉप जवळ येत चालला आहे.. तेवढ्यात कंडक्टरने स्टॉपचे नाव घेतले. झालं. आता विचार करायला वेळ नाही. या क्षणाचा जो कौल, तोच खरा. आता जे होईल त्याला सामोरे जायला आपण अगदी तयार. रघू सतत त्या पैशांकडे एकटक बघत होता, आणि तसाच तो उठला. त्याला चांगलीच झिंग चढली होती. त्याच्या कानात आवाज घुमू लागले. पन्नास रुपयांच्या बर्गरसाठी बापाच्या डोक्यात सोडावॉटरची बाटली फोडली याने.. कुणाला कशाची तलफ लागेल सांगता येत नाही! तलफ..वासना..सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू हाच. त्याच्या भोवतीने जपत फिरायचे, त्याला स्पर्श मात्र होऊ द्यायचा नाही! गाडीचा वेग कमी झाला. रघूचे तळवे घामाने ओले झाले होते. त्याने मुठी आवळल्या. बस थांबू लागली तसा तो पुढे झाला आणि त्याने चपळाईने कंडक्टरच्या हातावर झडप घातली. ते पैसे हिसकावून घेऊन त्याने कंडक्टरला धक्का दिला आणि तो दोन उड्यांमधे खाली उतरला. कंडक्टरदेखील लगेच चोर चोर ओरडत त्याच्यामागे खाली उतरला आणि रघूचा पाठलाग करत पळत सुटला. बसचालकाला काय करावे समजलेच नाही. तो गाडी थांबवून तसाच उभा होता. बसमधला एकटा प्रवासी हा गोंधळ थोडा थोडा समजून घेत खाली उतरला, आणि खुळ्या नजरेने त्या पळणाऱ्या दोघांकडे पाहू लागला. रस्त्यावर पुरेसे लाईटही नव्हते तरी दोघांच्या आकृत्या आणि कंडक्टरच्या आरोळ्या ठळक जाणवत होत्या. रघूने कुठलेसे चिंचोळे वळण घेतले. तो आता काही केल्या थांबणार नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर तशा परिस्थितीतही समाधान पसरले होते. रघू धावत होता, आणि मागून कंडक्टरही. त्याच्या आरडाओरड्याने आणखी एकदोघे रघूचा पाठलाग करू लागले होते. पण रघू झपाटल्यासारखा धावत होता. माणसे कोणत्या प्रेरणेने गुन्हा करतात? त्याचे त्यांना काहीच वाटत नाही? रघूला उत्तर मिळाले होते. त्या त्या क्षणाचे भान खरे. सगळ्यांच्या सुखाची परिमाणे वेगळी. धावता धावता रघू जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनवर आला. लोणावळ्याच्या दिशेने जाणारी एक लोकल हलक्या पावलांनी निघू लागली होती. कंडक्टर आणि बाकीचे दोघे तिथे पोहोचायच्या आतच त्याने लोकल पकडली आणि विजयी मुद्रेने धावत येणाऱ्या त्या तिघांकडे पाहत तो तिथून निसटला. लोकलचा वेग वाढला तसं ते स्टेशन लहान होत गेलं. मागचा गलका विरळ होत गेला आणि रघूचे मन एकदम शांत झाले. त्याला अगदी परिपूर्ण वाटत होते. आता काही नको. पुढचा दिवसही नको. सगळे येथेच थिजून जावे. एकेचाळीस हजार पाचशे ही रक्कम पूर्ण झाली. आता जगाचा गाडा कायमचा थांबला तरी हरकत नाही! रघू शांत स्वच्छ मनाने बाकावर बसला होता. त्याला आतून उबदार वाटत होते. रात्रीच्या पडद्यामागे सगळे विरून जाऊन आपण एकटेच उरलो आहोत असे त्याला वाटू लागले. काही वेळाने त्याच्याही नकळत तो कुठल्याशा स्टेशनवर उतरला. त्या स्टेशनाच्या बाहेर पडून तो वाट दिसेल तिकडे चालू लागला. रस्त्यावर माणसे जवळजवळ नव्हतीच. रात्र गडद झाली होती. रस्त्यावरचे दिवे तेवढे डोळे उघडे ठेऊन होते. कुठूनतरी रातराणीचा सुगंध रेशीमधाग्यासारखा हळूच स्पर्शून जात होता. समोर उंच चढावरून पलिकडे एक चांदणी डोकावत होती. सगळ्या चांदण्यांमधली ती उजळ चांदणी. रघू ओढत गेल्यासारखा त्या वाटेने ती टेकडी चढला. उंचावर आल्यावर त्याने एकदम डोळे मिटून ती उंची आणि तिथून वाहणारा बेफिकीर वारा श्वासात भरून घेतला. त्याने त्या चांदणीकडे पाहिले. तितक्या दूर जाता यायला हवे! आभाळाच्या पांढऱ्या बत्त्यांनी आपला मंद प्रकाश त्या टेकड्यांच्या रांगेवर शिवरला होता. रघू कितीतरी वेळ त्या चंदेरी पातळ पडद्यांमधून चालत राहिला. आजूबाजूला काहीही नव्हते. दुरून मात्र काही घरांचे मिणमिण दिवे दिसत होते. तिथल्याच एका मोठ्या शिळेला टेकून रघू बसला. त्याने चोरलेले पैसे आणि पाकिटातले पैसे जुळवले, ती रक्कम मोजली आणि जास्तीचे पैसे बेफिकीरीने फेकून देऊन मोठ्या समाधानाने त्या पैशांकडे पाहिले. एकेचाळीस हजार पाचशे. कमी नाही, जास्त नाही. तो बराच वेळ त्यांना उराशी कवटाळून बसला. एखाद्या निळ्याशार सरोवराच्या तळाशी बसल्यासारखे त्याला वाटत होते. तो भानावर आला तेव्हा रात्र उतरायला लागली होती. आभाळ अंधार सारत स्वच्छ होऊ लागले होते. काही वेळाने पहाटेचा गार वारा वाहू लागला. रघूला एकदम ताजेतवाने वाटले. असा दिवस याआधी आयुष्यात कधी उजाडलाच नाही. निरंजन लावल्यावर जसा देवारा मंद पिवळ्या प्रकाशाने उजळून निघतो, तसाच निरंजन लावलेला हा दिवस. संपूर्ण रिक्तभाव घेऊन आल्यासारखा, नव्या पुस्तकाचा कोरा वास असलेला. आजूबाजूला काही नाही. दूरदूरपर्यंत फक्त हिरव्यालाल वस्त्रांनी झाकलेल्या टेकड्या. अनंतापर्यंत. साऱ्या वातावरणात एक वेगळेपण भरुन राहिले होते. वारा जोरात वाहू लागला होता. त्याचा एक झोत हुंकारत रघूला भिडला आणि रघूने एकदम त्याच्यामागे पळायला सुरुवात केली. वाऱ्याला हाळी घालत रघू दूरदूरपर्यंत त्याच्यामागे पळत राहिला. रात्र सरली होती. पूर्वेकडे उजळ रंगांची प्रभावळ दिसत होती. रघू बेभान होऊन वाऱ्यामागे धावत होता. आपल्याच शरीरातून कुणीतरी आनंदाने हसतंय असं त्याला वाटत होतं. वारा जणू दिसत असल्याप्रमाणे त्याला हाळी घालत रघू धावत होता. एका कड्यापाशी आल्यावर रघू धापा टाकत थांबला आणि त्याने हसत वाऱ्याला हात दाखवून थांबायची खूण केली. पण आता वाऱ्यानेच रघूला मोठ्याने हाक दिली. त्यासरशी रघूने अंगातले ते नवे जाकीट काढले, आणि तो अजून जोमाने धावत कड्याच्या दिशेने वाऱ्यामागे धावू लागला. जसाजसा कडा जवळ येऊ लागला तसे त्या कड्यावरच्या गवताने रघूला हलकेच वर उचलले. आता आणखी दोन धावांत जमीन संपणार.. कड्याच्या अगदी टोकाशी आल्यावर रघूने शेवटचे पाऊल घट्ट रोवून उंच उडी घेतली आणि हात हवेत फेकून तो अधांतराला सामोरा गेला. वाऱ्याने त्याला अलगद झेलले, आणि वाऱ्यावर स्वार होऊन तो पहाटपटलावरुन दिसेनासा झाला. Written by Sujay Jadhav Story registered under SWA Registration All rights reserved.
  1. Realistic
चंदू चिंचगूळकर, नंदू चिंचचूळभर आणि एक विचित्र जग
हाफ्फ्याथ्रास्स्यू! चंदू चिंचगूळकरला शिंक आली. धूळ उडाली म्हणून शिंक आली. पंखा साफ करताना धूळ उडाली म्हणून शिंक आली. आईने चार रट्टे मारत पंखा साफ करायला सांगितला, पंखा साफ करताना धूळ उडाली म्हणून शिंक आली. आईला राग आला म्हणून तिने चंदू चिंचगूळकरला चार रट्टे मारत पंखा साफ करायला सांगितला, पंखा साफ करताना धूळ उडाली म्हणून शिंक आली. खिडकीत मोबाईल ठेऊन इन्स्टाग्राम रील करताना एकशे चौदावा टेक चांगला आला, पण तेवढ्यात फोनची बॅटरी संपली आणि फोन बंद पडला म्हणून आईला राग आला म्हणून तिने चंदू नामक कार्ट्याला चार रट्टे मारत पंखा साफ करायला सांगितला, पंखा साफ करताना धूळ उडाली म्हणून शिंक आली. बास. असं शिंकेचं मूळ शोधत राहिलो तर मागेमागे जाताजाता जगाचा इतिहास पार संपून जाईल आणि इकडे वर्तमानात इतिहासाची पाठ्यपुस्तकं कोरी होतील. त्यामुळे नको. आपण शिंकेच्या पुढे जाऊ, भविष्यात डोकावू. तर चंदू चिंचगूळकरला शिंक आली. वसकन एखाद्याच्या अंगावर आपण कसं ओरडतो जीव खाऊन, तसा तो खिडकीच्या दिशेने तिरपी मान करून शिंकला. हाफ्फ्याथ्रास्स्यू! त्यामुळे झालं असं की खिडकीत बाहेरच्या बाजूला चिंतन करत बसलेली कमनीय मांजर एकदम दचकून जागी झाली, तिचा तोल गेला आणि खाली रस्त्यावरून एक मनुष्य अत्यंत टापटीप कपडे घालून झपाझपा पावले उचलीत ऑफिसला चालला होता, त्याच्या अंगावर अचानकभयानकपणे ती कमनीय मांजर पडली. तिची नखं घासून त्याचा शर्ट तीन ठिकाणी फाटला आणि अतिभयाने त्याने चड्डी ओली केली. मांजर गेली निघून तिचीतिची दुसऱ्या ठिकाणी चिंतन करायला. पण इकडे या मनुष्याच्या दिवसाचा पार बट्ट्याबोळ झाला. त्याला ऑफिसमध्ये जाऊन एका मोठ्या क्लायंटसमोर एक फारच महत्वाचं प्रेझेन्टेशन द्यायचं होतं, तिथे तो वेळेवर पोहोचू शकला नाही कारण तो मधल्यामध्ये नवीन कपडे खरेदी करायला म्हणून गेला तिथे त्याचा वेळ गेला. धावतपळत तो ऑफिसला पोचला तेव्हा क्लायंट लोक आधीच वैतागले होते. तरीही त्याने कसंबसं प्रेझेंटेशन दिलं, ते काई फार चांगलं झालं नाही. परिणामी ते मोठं प्रोजेक्ट कंपनीच्या हातातून निसटलं. त्यामुळे त्या मनुष्याचा बॉस प्रचंड वैतागला आणि मनुष्यावर दोन-तीन भाषांमध्ये आगपाखड करत तो ऑफिसमधून बाहेर पडला, थेट फुटपाथवर असलेल्या एका न्हाव्याच्या ठेल्यावर गेला आणि त्याला म्हणाला की कराकरा माझे केस काप. न्हाव्याने आज्ञा मानून त्याचे केस कराकरा कापले आणि बॉसने टकलावरून घसाघस हात फिरवत न्हाव्याच्या हातावर त्याचं अख्खं पाकीटच्या पाकीट ठेवलं आणि तो तडक तिथून बाहेर पडला. न्हाव्याने चकित होऊन पाकीट पाहिलं उघडून तर त्यात एक्क्याण्णव हजार एकशेएकोणतीस रुपये होते. न्हावी आनंदाने चक्रावून गेला आणि त्याने ठरवलं की आज रात्री नाइंटी न मारता रमची सबंध क्वार्टर मारायची शिवाय मित्रालाही पिलवायची. त्याप्रमाणे रात्री न्हाव्याने आपल्या तीनमजली गुलाबी रंग दिलेल्या घराच्या गच्चीवर त्याच्या खास मित्राला, म्हणजे ‘नंदू चिंचचूळभर’ला बोलावलं आणि साधारण बघा दोन-सव्वादोन वाजेपर्यंत रम पीत, चकल्या खात ते दोघे असंबद्ध जिब्रिश बोलत बसले, मग केव्हातरी तसेच झोपून गेले. तरीही झोपताना भान ठेवून नंदू चिंचचूळभरने चारचा गजर लावला होता, पण त्याला काही केल्या चारला जाग आली नाहीच. त्याला जाग आली सव्वासहा वाजता. तो तसाच धावतपळत उठला आणि शक्य तितक्या वेगाने आपल्या घरी गेला. नंदू चिंचचूळभर हा अतिशय हुशार पण अतरंगी माणूस होता. तो रोज चारला उठायचा आणि सव्वाचार वाजता आपल्या ग्रेट डेनला एका अतिशय स्वच्छ, शांत उच्चभ्रू कॉलनीमध्ये फिरवून आणायचा. फिरवून आणताना तो त्याच्या ग्रेट डेनला फुटपाथवर किंवा एखाद्या बंगल्याच्या गेटपुढे शीदेखील करवून आणायचा. एवढ्या भल्या पहाटे कुणी उठलेलं नसायचं त्यामुळे आपल्या बंगल्यासमोर किंवा आपल्या घराच्या फुटपाथवर इतकी शी कुठून येते हे आजतागायत कुणाला समजलं नव्हतं. नंदू चिंचचूळभर आणि त्याच्यासारखे इतर अतरंगी श्वानमालक हे त्या उच्चभ्रू कॉलनीमधल्या रहिवाशांसाठी एखाद्या गायब वॉंटेड गुन्हेगारासारखे होते. तीनचार वॉचमन, मोठं इलेक्ट्रॉनिक गेट असा सगळा तामजाम असूनसुद्धा नंदू चिंचचूळभर आणि इतर श्वानमालक त्या कॉलनीत कसे घुसायचे हे आजतागायत कुणाला माहीत पडलं नव्हतं. (मला विचारु नका, मलाही माहीत नाही) पण आज नंदू चिंचचूळभरचा पोपट होण्याचा दिवस होता. ग्रेट डेनला फिरवून आणायला आज उशीर झाला. साडेसहा वाजले. आणि नेमका एका उच्चभ्रू बंगल्यापुढे त्याचा ग्रेट डेन शी करताना रंगेहाथ पकडला गेला. मग त्या बंगल्याच्या मालकाने या ग्रेट डेनच्या मालकाला म्हणजेच नंदू चिंचचूळभरला खूप सुनावलं. आपलं राहणीमान, मग स्वच्छता, मग स्वच्छतेवरून सौंदर्य, मग जगताना एस्थेटिकची पर्वा न करणारी माणसं हीन असतात, ज्यांना सौंदर्यदृष्टी नसते अशी माणसं कितीही पैसा जवळ असली तरी क्षुद्रच असतात असं तो मालक खूप टोचेल असं बोलला नंदू चिंचचूळभरला. त्यामुळे नंदू चिंचचूळभरचा टापटीप स्वाभिमान दुखावला. 'ह्या भंपक झालेल्या जगात तू मला एस्थेटिकचे धडे देतोस होय रे, तुला दाखवतो एस्थेटिक काय असतं ते' असं मनातल्या मनात पुटपुटत नंदू चिंचचूळभर ग्रेट डेनला घेऊन आणि त्याची शी खिशात घालून तिथून तरातरा निघाला. आयला, एक सांगायचं राहिलं- नंदू चिंचचूळभर कुणी साधासुधा व्यक्ती नसून अत्यंत बुद्धिमान असा सायंटिस्ट आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या बळावर काहीही साध्य होऊ शकतं असा त्याला दृढ विश्वास आहे. तो मघाशी तिथून जो तरातरा निघाला तो तडक आपल्या सीक्रेट अद्ययावत लॅबमध्ये गेला आणि कसलेकसले केमिस्ट्रीमधले फॉर्म्युले पुटपुटत त्याने तीनचार लिक्विडं एकमेकांमध्ये घुसडली, कसलीशी एक्झॉटिक पावडर त्यात मिसळली, ते मिश्रण ढवळलं आणि बर्फाच्या लादीवर उकळायला ठेऊन तो इन्स्टाग्रामवर चंदू चिंचगूळकरच्या आईचे रील्स बघत बसला. बराच वेळ कधी गेला समजलंच नाही. चंदू चिंचगूळकरच्या आईचे क्रिंजी रील्स बघण्यात नंदू चिंचचूळभर प्रचंड रमलाय हे त्या उकळत असलेल्या मिश्रणाला लक्षात आलं आणि ते मिश्रण आपण गुळण्या करतो त्या आवाजात ओरडलं, “नंदू चिंचचूळभर मी रेडी झालोओओ.” नंदू चिंचचूळभर भानावर आला आणि त्याने त्या काचेच्या फ्लास्कमध्ये डोकावून मिश्रण पाहिलं. त्याला रंग नव्हता. सरळसोट पाण्यासारखं ते दिसत होतं. नंदू चिंचचूळभरच्या चेहऱ्यावर एक अतरंगी स्माईल आली. मग नंदू रात्र होण्याची वाट बघत थांबला. म्हणजे, रात्र होईपर्यंत त्याने इथे-तिथे टाईमपास केला किंवा तो जेवला, झोपला असं अजिबात नाही. तो एक्चुअली, प्रॅक्टिकली रात्र होण्याची वाट बघत एकाजागी थांबला. मग रात्र झाली. मग नंदू चिंचचूळभर अंगावर निंजासारखे काळे कपडे चढवून त्या मिश्रणाची कुपी घेऊन दबकत दबकत घराबाहेर पडला आणि पेटफूड कारखान्याच्या दिशेने जाऊ लागला. नंदू चिंचचूळभर पेटफूड कारखान्याच्या दिशेने जात असताना हॉटेल 'ल प्लझिर'च्या बाहेर उभा राहून असंबद्ध जिब्रिश, खिशात वारेमाप पैसे असूनही आत जाण्याला आपण कातडीने आणि फिजिकने लायक आहोत की नाही, याची चिंता करत भुकेल्या अवस्थेत घुटमळत उभा होता. नंदू चिंचचूळभर आणि असंबद्ध जिब्रिशची नजरानजर अजिबात झाली नाही किंवा त्यांनी एकमेकांची दखलही घेतली नाही. पण तो ते करत असताना तो ते करत होता एवढंच. असो. मुद्द्याची गोष्ट अशी की नंदू चिंचचूळभर वॉचमनला गुंगारा देऊन अतिशय लीलया कारखान्यात शिरला आणि दुसऱ्या दिवशी विक्रीला निघणाऱ्या सगळ्या पेटफूडच्या पॅकेट्समध्ये कुपीतल्या मिश्रणाचा एकेक थेंब सोडून कामगिरी फत्ते करून तिथून बाहेर पडला आणि आल्या पावली परत घरी येऊन निवांत झोपला. या गोष्टीला चार दिवस उलटून गेले. चार दिवसात अनेक पाळीव कुत्र्यांच्या पोटात हे मिश्रणयुक्त पेटफुड गेलेलं होतं. पाचव्या दिवशी भन्नाट गंमत झाली. झालं असं की भल्या पहाटे उजाडायच्या आत नेहमीप्रमाणे नंदू चिंचचूळभर आणि त्याच्यासारखे इतर श्वानमालक उच्चभ्रू कॉलनीच्या स्वच्छ सुबक फुटपाथवरून आपल्या कुत्र्यांना फिरवून, अंधारात शी करवून पुन्हा घरी आले आणि डाराडूर झोपले. मग उजाडल्यावर नेहमीप्रमाणे फुटपाथवरच्या शिया चुकवत जॉगिंग करणारी बॅच तिथे दाखल झाली आणि फुटपाथवरचं दृश्य पाहून जॉगिंग करायचं सोडून तोंडात बोटं घालून तशीच जागच्या जागी खिळून राहिली. फुटपाथवर विविध कुत्र्यांनी रांगेत जे पदार्थ ठेवले होते, ते इंद्रधनुष्यासारख्या श्रीमंत रंगांनी उजळून निघाले होते. त्या पदार्थांचा पोत म्हणजे या पृथ्वीवरचं हे मटेरियल नाहीच जणू, असा भासत होता. शी एका बाजूने पाहिली की हिरवीपिवळीकेशरी आणि दुसरीकडून पाहिली की निळीजांभळीलाल असे निरनिराळे सायकडेलिक रंग फेकत होती. शिवाय प्रत्येक शी स्वयंप्रकाशी होती. त्यांच्यातून मंद प्रकाश संथपणे पाझरत होता. जॉगिंग करणारी माणसं ओळीने त्या अद्भुत पदार्थाकडे भारावल्यासारखी पाहत उभी राहिली. त्याचवेळी 'फुटपाथवर हे दिवाळीपेक्षा भारी लायटिंग कुणी केलंय' असं म्हणत गाड्या घेऊन कुठे कुठे प्रस्थान करणारी मंडळीही तिथे थांबली आणि अवाक होऊन त्या मनावर जादू करणाऱ्या पदार्थाकडे पाहत राहिली. हा हा म्हणता त्या रस्त्यावर गर्दी झाली. माणसं बराचवेळ संमोहित झाल्यासारखी ते रंग आणि तो पोत नजरेने पीत राहिली आणि मग भूक लागली तशी भानावर आली आणि पोटाचा ड्रम भरायला निघून गेली. ती गेली तर त्यांच्या ठिकाणी दुसरी माणसं आली. साधारण आठ वाजायच्या आतच त्या दैवी फुटपाथची कीर्ती आसपासच्या गल्ल्यांमध्ये पसरली आणि तीही माणसं तिथे आली. पण नंदू चिंचचूळभरचा अपमान करणारा गृहस्थ मात्र बाहेर पडला नाही कारण तो अजून झोपलेलाच होता. पहाटेपर्यंत पी पी दारू पिऊन झाल्यावर मघाशीच कुठे त्याला झोप लागली होती. पण तो नसला म्हणून काय झालं, इतर शेकडो माणसं डोळ्यांची तृप्ती करून घ्यायला तिथे आलीच होती की. मग जिथे एका विशिष्ट वेळेपेक्षा जास्तवेळ थांबणारी गर्दी आहे तिथे एका कडेला लिंबूपाण्याची गाडी आलीच. दुसऱ्या कडेला वडापावची गाडी. मग गर्दी मॅनेज करायला त्या उच्चभ्रू कॉलनीच्या बगलेतच घरांची दाटीवाटी करून राहणारे रिकामटेकडे स्थानिक लोक आले. त्या पदार्थांना धक्का लागू नये किंवा सौंदर्याचं संमोहन अनावर होऊन कुणी ते पटकन खायला बघू नये या उद्देशाने त्यांच्याभोवती कुंपण घालण्यात आलं. साधारण सव्वानऊ वाजेपर्यंत त्या कुंपणावर पापड, मसाला, सिमेंट, फेअरनेस क्रीम, हेअर ऑइल, डिझायनर क्लोदिंगसारख्या वेगवेगळ्या देशी-विदेशीब्रँड्सचे बारकेबारके बॅनर्स लागलेदेखील होते. त्या बॅनर्समधून फटी शोधून तो दैवी पदार्थ बघावा लागत होता. साधारण पावणेदहा वाजेपर्यंत रिकामटेकड्या स्थानिक लोकांना वाटलं आपल्या एरियाला तीर्थक्षेत्राचं रूप येणार आणि हा बिझनेस आपल्याला तुफान पैसा मिळवून देणार. पण तसं झालं नाही. साधारण अकरा वाजायच्या सुमारास पंधरावीस काळ्या एसयूव्ही तिथे दाखल झाल्या, त्यातून कुणीतरी पाचपन्नास बिगशॉट माणसं उतरली, त्यांनी सगळी गर्दी, लिंबूपाण्याची आणि वडापावची गाडी, कुंपण-बॅनर्स वगैरे सगळा गोतावळा तिथून हाकलून लावला आणि सगळ्या शियांचे सॅम्पल्स घेऊनन फुटपाथवर जणू काही नव्हतंच असं करून ते निघूनसुद्धा गेले. नंतर समजलं की ते फॅशन जगतावर वर्चस्व ठेऊन असलेले मातब्बर लोक होते. फुटपाथ पूर्ववत झाल्यावर अतिशय सोयीस्करपणे नंदू चिंचचूळभरचा अपमान करणाऱ्या त्या गृहस्थाला जाग आली, आणि काही झालंच नाही अशा अविर्भावात तो आला सेकंद कंठू लागला. म्हणजे त्याला हे प्रकरण काही बघायलाच मिळालं नाही. म्हणजे नंदू चिंचचूळभरचा प्लॅन फिसकटला का? तर नाही. नाही फिसकटला. नाही फिसकटला नंदू चिंचचूळभरचा प्लॅन. उलट नंदू चिंचचूळभरने जो विचार केला होता त्यापेक्षा वेगळं, मोठं, आणि विचित्रच काहीतरी घडलं. झालं असं की घडलेल्या घटनेनंतर एकदोन दिवसातच हे स्वयंप्रकाशी बहुरंगी शी प्रकरण जणू विरुनच गेलं. त्याची ना मीडियाने दखल घेतली, ना कुठे पेपरात बातमी आली. व्हायरल झालेले व्हिडीओजसुद्धा सोशल मीडियावरून हरवून गेले. अर्थातच हे त्या फॅशन जगतावर वर्चस्व ठेवून असणाऱ्या मातब्बर लोकांनी अतिशय प्लॅनिंगने घडवून आणलं होतं हे वेगळं सांगायला नको. मग अचानक एके दिवशी भारतातल्या एका अतिप्रचंड फेमस, टॉपच्या हिरॉईनने एका इंटरव्ह्यूमध्ये असं विधान केलं की “मी माझी यशस्वी कारकीर्द आणि अत्यंत हेल्दी डाएट यामुळे तुम्हा सगळ्या सामान्य होमो सेपियन्सपेक्षा जास्त इव्हॉल्व झालेली आहे आणि हे मी पुढच्या आठवड्यात सिद्ध करून दाखवू शकते.” कसं कुठे वगैरे तिने सांगितलं नाही. मग पुढच्याच आठवड्यात अचानक भर बांद्र्यातल्या एका गजबज चौकात सकाळच्या वेळी डांबरी रस्त्याच्या पोटातून एक पांढराशुभ्र स्वयंभू कमोड उगवला, ज्यातून झिरझिरीत रंगीबेरंगी प्रकाशाची किरणे बाहेर पडत होती. ते पाहून आधीच्या प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाली आणि हा हा म्हणता कमोडभोवती तुफान बंबईया गर्दी जमा झाली. या कमोडमधली ही दैवी शी कोणाची, हे काय घडतंय वगैरे माणसं उत्फुल्ल होऊन चर्चा करू लागली. पृथ्वीवर एलियन आले, इथपासून ते हा आफ्रिकेतून आलेला कसलासा व्हायरस आहे, ज्याच्यामुळे शी रंगीत होते, असे अनेक तर्क लढवले गेले. दरम्यान मीडियासुद्धा तिथे दाखल झालीच होती. सगळ्या प्रकरणाचं लाईव्ह प्रक्षेपण एव्हाना सुरू झालं होतं. माणसांची उत्सुकता शिगेला पोचलेली असतानाच कमोडमधून त्या अतिप्रचंड फेमस हिरॉईनच्या आवाजात एक ऑडिओ फाईल प्ले झाली- “यशस्वी होण्याची अपार जिद्द ठेवणाऱ्या आणि हेल्दी फूड खाणाऱ्या माणसांची शी सामान्य नसते, तर रंगीत असते. तुमच्यात आहे जिद्द यशस्वी होण्याची? माझ्यासारखी? तुम्हाला करायचीय तुमची शी रंगीत? असेल, तर सादर आहे एक ब्रँड न्यू च्यवनप्राश! रोज खा, तीस दिवसात तुमचीही शी रंगीत होईल आणि तुम्ही राहणार नाही सामान्य होमो सेपियन. व्हाल तुम्ही एक इव्हॉल्व्ड होमो सेपियन... ब्रँड न्यू च्यवनप्राश- तुमच्या जवळच्या दुकानात उपलब्ध. मी या देशातली अतिप्रचंड फेमस हिरॉइन, सायनिंग ऑफ." ऑडिओ संपला तसा फ्लशचा आवाज आला आणि मागोमाग कमोडमधून एक च्यवनप्राशचं स्वयंभू डबडं वर आलं आणि त्यावर तिथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींच्या उड्या पडल्या आणि ते डबडं प्राप्त करण्यासाठी सर्वजण झगडू लागले. थोडी बाचाबाची, थोडी मारामारी झाल्यावर लोकांच्या लक्षात आलं की हे डबडं रिकामंच आहे. एक्चुअल च्यवनप्राश उद्यापासून सर्व दुकानांमध्ये मिळेल. किंमत रुपये पाचहजार नऊशे नव्व्याण्णव. ~ काय नाय, संपली इथेच गोष्ट. ~ उपसंहार : नंदू चिंचचूळभरला एस्थेटिकवरून खडे बोल सुनवणाऱ्या त्या गृहस्थाने आजच आपल्या मुलीसाठी (जिला इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मॉडेल, इन्फ्लुएन्सर आणि पब्लिक फिगर व्हायचय) हे ब्रँड न्यू च्यवनप्राश विकत आणलंय. तेवीस रुपये डिस्काउंट मिळाला म्हणून त्याने तीन बरण्या आणल्यात. मुलीला दोन बरण्या द्यायच्या आणि एक बरणी टॉयलेटमधे लपवून चोरूनचोरून आपणच संपवायची असा त्या गृहस्थाचा मनसुबा आहे. तो त्याची बरणी बायकोमुलीच्या अपरोक्ष कमोडच्या मागे लपवत असतानाच मी हॉटेल 'ल प्लझिर'च्या बाहेर उभा आहे, माझ्या डाव्या बाजूला असंबद्ध जिब्रिश उभा आहे आणि हुळहुळणारं नाक चोळत जांभळी पॅन्ट घातलेला मी त्याला म्हणतो आहे, "छ्या! काय त्या एका शिंकेपायी या डिस्टोपियन फ्युचरमध्ये येऊन पडलो राव!" ~ All rights reserved under SWA registration
  1. Jibberish Katha
  2. Absurd
मी डोरेमॉन बघणार आहे
कस्तुरी कन्मणी कमोदिनीच्या गावी पूर आला त्यावेळी मी माझ्या लॅपटॉपवर डोरेमॉन बघत होतो. कस्तुरी कन्मणी कमोदिनीसुद्धा डोरेमॉनच बघत असावी असा मी उगाच आपला लालित्यपूर्ण अंदाज लावतो. पण तिचा तो एपिसोड अर्धाच राहिला असणार कारण नेमका त्याचवेळी लगबगीने पूर आला. कस्तुरी कन्मणी कमोदिनीला नाईलाजाने उठावं लागलं. मीसुद्धा नाईलाजाने त्यावेळी उठलो होतो कारण मला निसर्गाची हाक आली होती. कस्तुरी कन्मणी कमोदिनी आणि मी कधी भेटलो नाही, तरीही आम्ही असं काहीतरी शेअर करतो आकलनापलीकडचं. हेच कारण होतं ज्यामुळे मी मरणाची पायपीट करून कस्तुरी कन्मणी कमोदिनीच्या प्रदेशात आलो होतो. तुम्हाला वाटेल ‘अखिल भारतीय पुराचा आनंद लुटूया’ संघटनेत सामील व्हायला मी गेलो होतो पण तसं नव्हे ते. सर्व प्रदेशांतून पूरग्रस्तांना मदत होत होती, मलाही करायची होती. म्हणून मी कस्तुरी कन्मणी कमोदिनीचं गाव धुंडाळत हिंडत होतो. तिला डोरेमॉनचा उरलेला एपिसोड दाखवायला मी पेन ड्राईव्ह मधून घेऊन आलो होतो. कारण मला माहित होतं, संकटात अडकलेल्यांना कपडे, धान्य, पैसे सगळेच देतील. डोरेमॉनचा एपिसोड कोणी देणार नाही. मनुष्यप्राणी विचित्र आहे तो या बाबतीत. असो. तर झालं असं की कस्तुरी कन्मणी कमोदिनीचं गाव काही सापडलं नाही, पण त्या प्रवासात मला भेटले ‘अखिल भारतीय दिसली वाळू, दिसली रेती की उपसा’ संघटनेचे समस्त मेम्बर. पुराचा फटका त्यांनाही बसला होता. सगळ्यांची कामं ठप्प झाली होती. या मेम्बरांबरोबर मी पुराच्या पाण्यातून खूप भटकलो. त्यांनी त्यांच्या दारुण गोष्टी मला सांगितल्या, मी ऐकल्या. माझ्याकडे दारुण असं काही नव्हतं कारण माझे प्रॉब्लेम्स तसे कृपाळू आहेत. मग त्यांच्या दारुणपणाला प्रतिसाद द्यायचा म्हणून मी त्यांना इस्रायल-पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सांगायला सुरुवात केली. अखिल भारतीय दिसली वाळू, दिसली रेती की उपसा संघटनेचे सगळे मेम्बर खूप कुतूहलाने हे ऐकत होते. पुरात फक्त शेंडा कोरडा राहिलेल्या एका मजबूत झाडावर बसून मी त्यांना रात्रभर विस्तृतपणे ती गोष्ट सांगत राहिलो आणि ते कुठूनतरी वाहत आलेल्या फ्रीजवर बसून तरंगत तरंगत ती गोष्ट ऐकत राहिले... मग मी घरी आलो वगैरे. बरेच दिवस उलटून गेले या गोष्टीला वगैरे. आणि एकदम एके दिवशी टीव्हीवर बातमी झळकली, की भारतातील काही बुद्धिवान वाळू माफियांनी इस्रायल-पॅलेस्टाईन काँफ्लिक्ट सोडवला! मी क्षणाचाही विलंब न लावता ‘अखिल भारतीय चाट पडा’ संघटनेचा अध्यक्ष झालो. तिच्यायला म्हटलं नक्की झालं काय? मी ताबडतोब माहिती काढली आणि मला समजलं की पुरात आता उपसायचं काय या प्रश्नाने त्रस्त झालेले माफिया मी सांगितलेल्या स्टोरीने प्रभावित झाले आणि इस्रायलला गेले. त्यांनी इस्रायली जनतेला कन्व्हिन्स केलं की मित्रांनो भांडू नका. धर्म, धार्मिक जागा यांच्यापायी कत्तली करू नका. आमच्याकडे एक ऑफर आहे, ती तुम्ही रिफ्यूज करू शकत नाही. तिच्यामुळे तुमचा प्रश्न सहजसोप्या पद्धतीने सुटेल. आम्ही बुवा उपसा करतो. तुम्ही बॅकप द्यायला तयार असाल तर आपला पॅसिफिक महासागर एवढा निवांत पडीक आहे, त्याच्यात तुम्ही म्हणाल त्या अक्षांश-रेखांशावर वाळू, रेती, माती, खडक यांचा उपसा करून आम्ही तुम्हाला नवीन देशच उभा करून देतो. तसंही तुम्ही एवढी हजार वर्षे इथं-तिथं हिंडतच जगत होतात. हा आत्ता झालेला इस्रायलसुद्धा तुम्हाला सुखाने आयुष्य कंठू देतो आहे का? सतत असंतोष, युद्ध इत्यादीमुळे तुमची लाइफस्टाइल सुधारणार आहे का? तर यावर ते लोक बोलले पण आमचं श्रद्धास्थान इथं आहे, त्याचं काय? माफिया बोलले तुम्ही लेको आधीच आमच्याकडं यायला पायजे होतात. आम्ही बघा, शिर्डीला जायचा कंटाळा येतो, लांब पडतं म्हणून जिथंतिथं प्रतिशिर्डी उभारून ठेवलंय. डिट्टो शिर्डी, काय फरक सांगाल तुम्ही. धर्माचा धर्मही सांभाळला जातो शिवाय सोयही होते. अडून राहून काय मिळतं हो? तुम्ही म्हणत असाल तर आमच्या ‘अखिल भारतीय मंदिर बांधू’ संघटनेच्या मेम्बरांना बोलावतो, तुम्हाला जे हवं ते बांधून देतो ना भावड्यांनो. भावडे रेडी झाले आणि अशा पद्धतीने इस्रायलच्या अत्याधुनिक आर्मीच्या कडेकोट संरक्षणाखाली पॅसिफिक महासागरात नवा देश बांधायला सुरुवात झाली. अर्थात, ही खूप, म्हणजे भयानक आतली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. न्यूजमध्ये आलेली बातमी एवढीच होती की बाबा प्रश्न सुटला. एवढी आतली बातमी कुठून कशीकाय लीक झाली काय माहीत नाही, पण लातूरच्या एमपीएससी करणाऱ्या विज्या सोमा भुमनळगुळेच्या एलजी फोनमधल्या व्हॉट्सऍपवर ते फॉरवर्डेड मेसेज फिरतात ना, तसा एक मेसेज आला की बुआ आपल्या भागातले सुप्रसिद्ध आमदार श्री आयआयटी रिटण अमित्राजे उर्फ आमचे दादा उर्फ काळीज हाय आमचं- आपल्या प्रभागातील हुशार आणि कष्टाळू पोरांसाठी पॅसिफिक महासागरात अभ्यासिका आणि कॅन्टीन उभारणार आहेत. वाळू उपसायच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि लवकरच प्रभागातील बांधवांना याचा लाभ घेता येणार आहे. तर विज्या सोमा भुमनळगुळेच्या फोनवर ही बातमी आली आणि गर्रकन जी फिरली ती थेट महाराष्ट्रभर झाली. पाचव्या मिंटाला तिची न्यूज झाली आणि जगातल्या तमाम जनतेसमोर हे उघडकीस आलं की पॅसिफिक महासागरात काहीतरी लँड उभी राहतेय. कसली काय ते मात्र अजून समोर आले नव्हते सगळे डिटेल्स. पण सगळीकडे या बातमीने धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या थिअरीज पसरल्या. खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं आणि इस्रायलसुद्धा काही बोललं नाही. त्याचवेळी एक थिअरी अशी पसरली की जगभरातल्या अतिचंगळवादी लोकांनी वाढत्या लोकसंख्येचा तिटकारा येऊन काढलेला हा तोडगा आहे. लँड रेडी झाली की तिथे ते हवी तशी सेटिंग करून घेणार, सगळं अगदी चापूनचोपून सुंदर करणार आणि तेच मोजके लोक तिथे राहायला जाणार. बाकी लोकांना त्या खंडावर यायला देखील मनाई असणार. आणि मग जो काई प्रक्षोभ उसळला की विचारू नका. माफक प्रमाणात दंगली देखील झाल्या. जगभरातल्या कमी चंगळवादी लोकांनी एकत्रितपणे आंदोलन सुरू केलं की आम्हाला त्या भूमीवर जाण्याला मज्जाव झालाच नाही पाहिजे. अतिचंगळवादी बोलले च्यायला आमचा काय संबंध पण नाय फुकटची मगजमारी तिच्यायला. जावा मरेनात का तिकडं. असं झाल्यावर कमी चंगळवाद्यांना काय रान मोकळंच. त्यातून त्या नवीन खंडावर जायला कुठे व्हिसा, पासपोर्ट लागतोय? ही बातमीसुद्धा सन्नकन व्हाट्सएपवर फिरली आणि जगभरातून सगळे कमी चंगळवादी लोक आपापल्या बोटी, तराफे, जहाजं बांधून नव्या खंडावर जायला लागले. बघता बघता अखिल भारतीय- नाय आता अखिल जागतिक म्हणायला पाहिजे-- तर ‘अखिल जागतिक फुकट तिथे प्रकट’ संघटनेचे सगळे मेम्बर पुढच्या आठवड्याभरात नवीन खंडावर हजर झाले. झोपड्या, खोपटी, बिळं, भोकं, ज्याचा पटकन निवारा करता येईल तसा करून राहू लागले. हा हा म्हणता खंडावर जी काय गर्दी वाढली की विचारूच नका. सगळी जमीन फुकट ना. कसली सिस्टीम नाही, काही नाही. या सगळ्याचा परिणाम काय, तर तयार झाल्याच्या बाराव्या दिवशी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी खंड ढासळू लागला आणि जाम झालेलं ढेकूळ पाण्यात टाकल्यावर काही वेळाने विरघळतं तसा खंडच्या खंड कुणालाही न सांगता विरघळून गेला. फुल लोच्या. आता त्या दूरदूरपर्यंत जमीन नसणाऱ्या भयाण रखरखीत महासागरात तग धरणार तरी किती काळ? सगळीच्या सगळी माणसं बुडून मेली. सदर घटनेनंतर मात्र हद्द झाली. जगभरातले उरलेसुरले कमी चंगळवादी लोक बोलायला लागले की ह्या-ह्या- ह्याच अतिचंगळवादी लोकांनी जगाची लोकसंख्या कमी करायला ही चाल खेळली. का, तर म्हणे मग त्या दुर्घटनेत मरणारा एकूण एक माणूस कमी चंगळवादीच कसा होता? ह्यांच्यापैकी कोणीच तिथे का नव्हतं? सब बना बनाया खेल है. मोठा मॅटर. पुढचा असंतोष आणि त्यामुळे झालेला फियास्को खूप घिसापिटा आहे. त्यात पडायला नको. ते बऱ्याच फिलमांमधून तुम्ही बघितलंय. अरे फिल्मवरून आठवलं, जेम्स कॅमेरॉन टायटॅनिक नंतर सदर घटनेवरचा पिक्चर बनवायला घेतोय. पण त्यात काई विशेष नाही, साहजिकच आहे ते. त्यामुळे जाऊदे. आता स्थिती अशी आहे की देश, प्रांत, खंड इत्यादी विभाजन फाट्यावर मारून नवीन विभाजन होऊ घातलंय. चंगळ करण्याची अफाट ऐपत असणाऱ्यांचा प्रांत आणि दुसरा उरलेल्या अतृप्तांचा प्रांत. एवढंच. माझ्यासारखे काही आहेत ज्यांना दोन्ही नकोय, किंवा ज्यांना कशाशीच घेणंदेणं नाहीये, त्यांच्यासाठी आमच्या वाळू माफियांनी एका कडेला छोटासा प्रदेश (मजबूत, पाचसो साल तक नहीं डूबेगा) बांधून- सॉरी उपसून दिलाय. तिथे बसून मी ‘अखिल भारतीय भंजाळलेली पब्लिक’ संघटनेचा मेम्बर झालोय आणि आता मी डोरेमॉन बघणार आहे. ~ All rights reserved under SWA registration
  1. Jibberish Katha
  2. Absurd
Made with Slashpage