जिब्रीश कविता

गेली अनेक वर्षे मी लहर येईल तशा कविता करतो.
Sujay Jibberish
एक साधा फोन उचलणं
तुझ्यासाठी
शिळा उचलण्याइतकं
जड झालंय
हे मला चांगलं समजतंय...
एक वीट दोन वीट करत
तुझ्याभोवती बांधली गेलेली
अस्वस्थतेच्या
अगणित
विटांची
भिंत,
कुणाला नाही पण मला स्पष्ट दिसतेय...
तुझी अवस्था
कितीही ऑथेंटिक असली,
तरी कुठलीही अवस्था
कातडीतून झिरपू लागेल,
इतकं तिला कवटाळून राहायचं नसतं रे...
आता ही भिंत हलवायची असेल,
तर तुलाच तुझा ज्ञानेश्वर व्हावं लागेल जिब्रिश.
👍
Sujay Jibberish
वाडीतून साधासुधा चालत होतो
आणि नारळाच्या टॉपवरून
एक गिधाड माझा लचका तोडायला
खाली आलं. सुसाटमध्ये.
मी त्याला बोल्लो,
I'm just coexisting bro!
गिधाड बोल्लं
Ok bro.
पण जेव्हाकेव्हा मरशील
तेव्हा तुला जेवीनच.
मग मीही बोल्लो,
तू आधी मेलास तर मीच तुला जेवीन. मॅरीनेट करून.
आता गिधाड आणि मी दोघेही
एकमेकांकडे बघत
त्याच मोमेंटमध्ये
स्तब्ध झालो आहोत,
कोण कुणाचा लचका आधी तोडतं
हे जोखत.
👍
Sujay Jibberish
...आणि जेव्हा
शहरातले सगळे रस्ते
एकाएकी
नाहीसे झाले,
तेव्हा माणसांना
लक्षात आलं--
की आपल्याला
कुठेतरी जायचं असतं,
हेच किती अब्सर्ड आहे.
👍
Sujay Jibberish
एकेक इमारत, एकेक रस्ता असं करत
निगुतीने उतरवून ठेवलंय
छातीवरचं धावतं महानगर...
आता ओसाड माळरानावर मी निश्चल बसून आहे.
निर्मनुष्य गावांचा काफ़िला
याच वाटेने जातो,
असं इथल्याच एका पोक्त बाभळीने
मला सांगितलंय.
~
एकेक इमारत, एकेक रस्ता
असं करत
त्याने निगुतीने उतरवून ठेवलं
छातीवरचं
धावतं महानगर
आणि
ओसाड माळरानावरून
मूकपणे जात असलेल्या
निर्मनुष्य गावांच्या काफ़िल्यात
तो सामील झाला
शहरहीन मनाने
👍
Sujay Jibberish
मंत्री काल म्हणाले-
"आज सत्तेत आहोत,
उद्यासुद्धा असू."
आमदार फुटावे
तितक्या सहज
फुटले मला हसू.
👍
Sujay Jibberish
अचानक एक दिवस
सोशल मीडियावर
अस्तित्वात असणाऱ्या
अब्जावधी hate comments
ChatGPT ने जिवंत केल्या
आणि चवताळलेल्या झोंबींचं रूप घेऊन
अक्षरं माणसांच्या अंगावर धावून आली.
कोणाला काही कळायच्या आतच
संपूर्ण मानवजातीचा
संहार घडून गेला होता.
•••
आणि मग
तीन आठवड्यांनी
एलॉन मस्कचं यान
रिकामंच निघालं
मंगळावर जायला.
👍
Sujay Jibberish
समुद्र आहे, समुद्र नाही.
मुळापाशी सत्य इतकंच असतं.
आपणच लढवत राहतो तर्क
काढत राहतो रँडम अर्थ...
शहानिशा करायला जातो,
खर्ची पाडतो आयुष्य...
कुणी घेतं शिडाच्या बोटी, जातं समुद्र मंथनाला
कुणी सीगलसारखं वरून अवलोकन करायला जातं,
कुणी डायरेक बुडायला जातं...
गट पडत जातात, टॅग लागत राहतात
मुळापाशी एवढंच असतं, की
ज्याला समुद्र हवा आहे त्याच्यासाठी तो आहे,
ज्याला नकोय त्याच्यासाठी तो नाही...
...
समुद्र आहे, समुद्र नाही.
असणे वा नसणे दोन्ही समुद्र.
👍
Sujay Jibberish
काँक्रीट फाडून
सहजगत्या
उगवून आलंय रोपटं
शहर फाडून
इतक्या सहज
का येत नाहीत अरण्यं
👍
Sujay Jibberish
आज मला
एक ढग विलग होताना
बघssssत राहायची
स्तब्धता अवगत झालीय.
उद्या मला
एक ढग विरळ होताना
बघsssssत राहायची
स्तब्धता अवगत होईल.
परवा मी
पेरलेलं बी
जमिनीतून डोकं काढून वर येताना
बघsssssत राहीन दिवसेंदिवस.
तेरवा मी
बोटभर उंचीच्या रोपाचा
भलामोठा वृक्ष झालेला
बघssssssत राहीन वर्षानुवर्षे.
नंतर मग मी
कमावलेली सगळी स्तब्धता घेऊन
समुद्रावर जाईन
आणि लाटा बघत राहीन युगानयुगे.
तेव्हा मला लोक
खडक म्हणतील.
आणि जेव्हा ते
या खडकाला कान लावतील,
तेव्हा त्यांना
माझी गाणी ऐकू येतील.
👍
Sujay Jibberish
निगरगट्ट कविता लिहिलेला कागद
फाडायला गेलो
त फाटला नाही.
जाळायला गेलो
त जळाला नाही.
खोडायला गेलो
त खोडलीही गेली नाहीत अक्षरे!
शेवटी वैतागून
ठेवून दिला तसाच
निगरगट्ट कविता लिहिलेला कागद.
आता येता जाता
त्याच्याकडे लक्ष गेलं
की वाटून जातं-
कधी कुठल्या माणसाला
येईल का
या लेव्हलचं आत्मभान...
👍
Sujay Jibberish
काय झालं माहीत नाही,
पण माणसं त्या शहराला
सोडून निघून गेली.
शहर कित्येक वर्षे
ओसाड पडून राहिलं.
असं वाटू लागलं
जीर्ण झालेल्या इमारती
वितळतात की काय
साल्वादोर दालीच्या चित्रासारख्या.
मग
शहराचा जीव
वाचवायचा म्हणून
झाडांनी
सर्व इमारतींना
फोटोसिंथेसिसचं तंत्र शिकवून टाकलं
👍
Sujay Jibberish
मी वेगवेगळ्या
सोशल मीडिया ॲप्सवर
वेगवेगळ्या नावांनी दाखल झालो.
एका नावाने लेख लिहिले,
दुसऱ्या नावाने चित्रं काढली,
तिसऱ्या नावाने राजकीय मतं मांडली,
चौथ्या नावाने गाणी गात सुटलो.
हळूहळू
माझ्या शहरात
भरमसाठ माणसं झाली
जी वास्तविक मीच होतो...
👍
Sujay Jibberish
शंभर कोटी थेंब
खळखळ करत
पायावरून वाहून गेलेत,
इतकावेळ तू नदीपात्रात उभा आहेस,
काठावरचं झाड एकटक जोखत.
तू झाड किंवा पाणी
यापैकी काय होऊ शकलास जिब्रिश?
काहीच नाही?
मग हलू नकोस.
असाच उभा राहा,
जोवर हिरवी झाक
तुझ्या बुबुळात दिसत नाही,
जोवर शेवाळ सहजपणे
तुझ्या पायावर चढत नाही.
उभा राहा.
~
तंद्रीचा षड्ज
हिरव्याशी
जुळवू
न शकलेला
माणूस-
चराचराला प्लास्टिकसारखाच दिसतो,
हे लक्षात असूदे जिब्रिश.
👍
Sujay Jibberish
अज्ञात संस्कृतीचे पडघम
मातीसारखी माती आहे इथे.
मायेसारखी मायासुद्धा आहे तिला.
तरी काही केल्या मला
या मातीत रुजता येत नाहीय.
शरीरासारखं शरीर,
आडनावासारखं आडनाव,
घरासारखं घर,
सगळ्यासारखं सगळं आहे माझ्यापाशी.
तरी काही केल्या मला
या मातीत रुजता येत नाहीय.
अज्ञात संस्कृतीचे पडघम
ज्यांना ऐकू येतात,
त्यांनी
जगल्यासारखं जगायचं असतं,
की प्लास्टिकसारखं निपचित पडून राहायचं असतं?
👍
Share
Sujay Jibberish
निगरगट्ट कविता लिहिलेला कागद
फाडायला गेलो
त फाटला नाही.
जाळायला गेलो
त जळाला नाही.
खोडायला गेलो
त खोडलीही गेली नाहीत अक्षरे!
शेवटी वैतागून
ठेवून दिला तसाच
निगरगट्ट कविता लिहिलेला कागद.
आता येता जाता
त्याच्याकडे लक्ष गेलं
की वाटून जातं-
कधी कुठल्या माणसाला
येईल का
या लेव्हलचं आत्मभान...
👍