प्रिय अनामिक
प्रिय अनामिक, तसं म्हणायला गेलं तर तू अनामिक नक्कीच नाहीस. उलट, नावाजलेला आहेस. पण तुझं नाव लिहिलं आणि हे पत्र योगायोगाने तुझ्यापर्यंत पोहोचलं तर काय घ्या!? म्हणजे, मला तुला भेटायचं नाही अशातला भाग नाही; पण त्या भेटीचे संदर्भ असे उपरे नसावेत असं वाटतं. त्यातून तू म्हणजे लिजेंड व्यक्तिमत्व! त्यामुळे कुठल्याशा सार्वजनिक कार्यक्रमात गर्दीतून वाट काढत तुझ्यापर्यंत यायचं आणि ‘तुमचं लिखाण आवडतं’ असं कसबसं म्हणायचं आणि एखादा सेल्फी काढायचा किंवा तुझा पत्ता मिळवून तुला लांबलचक पत्र लिहायचं हे मला नाही आवडत. अशा भेटींना काही अर्थ नसतो. एखादा कलाकार आवडला की त्याच्या कलाकृतींना खणत जायचं आणि अगदी मुळाशी जाऊन त्या कलाकाराशी संवाद करत बसायचं हा माझा छंद आहे. त्यामुळे आपली भेट घडलीच नाही असं मी म्हणत नाही. अनेकदा घडलीय. आपण बरंच बोललोय. प्रत्यक्षात मात्र अद्याप भेट नाही. मला तुझ्याबद्दल प्रचंड कुतूहल वाटतं. आदरसुद्धा वाटतो. वर्षानुवर्षे इतकं उत्स्फूर्त आणि निळंशार लिहायचं म्हणजे तसं अवघड काम. इतक्या वर्षात तुझ्याकडून एकही बोथट, अकारण ओळ आलेली मी पाहिली नाही. असा उत्स्फूर्त (आणि निळाशार) षड्ज अधूनमधून माझाही लागतो. पण तो टिकवून ठेवणं काही जमत नाही. तुझा षड्ज चिरंतन आहे की काय असं वाटतं. त्याचे पडसाद सतत उमटत राहतात. एखादा माणूस सातत्याने इतका निर्मितीक्षम कसा राहतो? परिस्थितीचे ओरखडे, हालअपेष्टा, सुखद अनुभव साऱ्यात अगदी बुडून जायचं, तळ गाठायचा आणि त्याचवेळी स्वतःमधल्या कलाकाराला किनाऱ्यावर पाठवायचं आणि तटस्थपणे त्या अनुभवांची नोंद त्याला करायला लावायची...हे कसं जमत असेल? तू तुझा षड्ज टिकवून ठेवलायस असं मी म्हणतो ते या संदर्भानेच. मला हे तपश्चर्येपेक्षा कमी वाटत नाही. लोकांना वाटतं, ९ ते ५ च्या रगाड्यातून सुटायला माणसं कलाकार होतात. पण कलाकार होणं हे त्या जॉबइतकंच शिस्तीचं काम आहे. पर्यायाने काहीसं रुक्षदेखील आहे. कलाकाराला वेळेच्या आणि शिस्तीच्या बंधनात राहून मुक्तविहार करावा लागतो. विरोधाभासच म्हणायचा! परवा एक मित्र तुझ्या कवितासंग्रहावर तुझी सही घेऊन आला. ते पुस्तक सोबत घेऊनच तो फिरत होता. आम्ही चारपाच मित्र नेहमीच्या ठिकाणी चहा पीत बसलो होतो तिथे तो आला. आम्हाला कौतुकाने त्याने तुझी सही दाखवली. पण दुरूनच. कुणालाही त्याने पुस्तक हातात घेऊ दिलं नाही. मला म्हणाला, ‘आता मी याला व्यवस्थित कव्हर घालणार आणि कपाटात ठेऊन देणार. सारखं उघडलं तर सही पुसट होईल.’ मी मनात म्हटलं, सारखं नाही उघडलं तर कविता पुसट होतील! तू कवितांमधून अनेक अंगांनी त्याला सापडला असतास. पण तो तुला सहीतच शोधतोय. तुला हे समजलं असतं तर तू हसत सुटला असतास. मी तुझ्या कवितांमधून अनेकदा तुला शोधलं. अगदी डोकं शिणेपर्यंत. आता मला तुझा खांब शोधायचाय. तुला ज्ञानोबा माऊलींचा खांब माहित असेलच. त्या दगडी खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाची मर्यादा पाहिली. अणुरेणूतून वाहणारे अंतःस्थ झरे अनुभवले. असा खांब प्रत्येक कलाकाराचा असतो असं मला वाटतं. ज्ञानोबा माऊलींना सृष्टी निर्माण करणाऱ्या अज्ञात कलाकाराचा खांब सापडला. मला तुझा सापडला तरी पुष्कळ. त्याच्याशी बसून तुझ्या कविता पुन्हा वाचीन म्हणतो. आपल्या भेटीबद्दल मी फार खटपट करत नाही. अल्याड नाहीतर पल्याड आपली भेट होणारच आहे हे मला माहित आहे. तुझाच, कुणीतरी.
- Lalit