Sign In

ललित

वेळोवेळी लिहिलेले ललित लेख. काही वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेत, काहींचं सादरीकरण मी आकाशवाणीवर केलंय.
All
Lalit
प्रिय अनामिक
प्रिय अनामिक, तसं म्हणायला गेलं तर तू अनामिक नक्कीच नाहीस. उलट, नावाजलेला आहेस. पण तुझं नाव लिहिलं आणि हे पत्र योगायोगाने तुझ्यापर्यंत पोहोचलं तर काय घ्या!? म्हणजे, मला तुला भेटायचं नाही अशातला भाग नाही; पण त्या भेटीचे संदर्भ असे उपरे नसावेत असं वाटतं. त्यातून तू म्हणजे लिजेंड व्यक्तिमत्व! त्यामुळे कुठल्याशा सार्वजनिक कार्यक्रमात गर्दीतून वाट काढत तुझ्यापर्यंत यायचं आणि ‘तुमचं लिखाण आवडतं’ असं कसबसं म्हणायचं आणि एखादा सेल्फी काढायचा किंवा तुझा पत्ता मिळवून तुला लांबलचक पत्र लिहायचं हे मला नाही आवडत. अशा भेटींना काही अर्थ नसतो. एखादा कलाकार आवडला की त्याच्या कलाकृतींना खणत जायचं आणि अगदी मुळाशी जाऊन त्या कलाकाराशी संवाद करत बसायचं हा माझा छंद आहे. त्यामुळे आपली भेट घडलीच नाही असं मी म्हणत नाही. अनेकदा घडलीय. आपण बरंच बोललोय. प्रत्यक्षात मात्र अद्याप भेट नाही. मला तुझ्याबद्दल प्रचंड कुतूहल वाटतं. आदरसुद्धा वाटतो. वर्षानुवर्षे इतकं उत्स्फूर्त आणि निळंशार लिहायचं म्हणजे तसं अवघड काम. इतक्या वर्षात तुझ्याकडून एकही बोथट, अकारण ओळ आलेली मी पाहिली नाही. असा उत्स्फूर्त (आणि निळाशार) षड्ज अधूनमधून माझाही लागतो. पण तो टिकवून ठेवणं काही जमत नाही. तुझा षड्ज चिरंतन आहे की काय असं वाटतं. त्याचे पडसाद सतत उमटत राहतात. एखादा माणूस सातत्याने इतका निर्मितीक्षम कसा राहतो? परिस्थितीचे ओरखडे, हालअपेष्टा, सुखद अनुभव साऱ्यात अगदी बुडून जायचं, तळ गाठायचा आणि त्याचवेळी स्वतःमधल्या कलाकाराला किनाऱ्यावर पाठवायचं आणि तटस्थपणे त्या अनुभवांची नोंद त्याला करायला लावायची...हे कसं जमत असेल? तू तुझा षड्ज टिकवून ठेवलायस असं मी म्हणतो ते या संदर्भानेच. मला हे तपश्चर्येपेक्षा कमी वाटत नाही. लोकांना वाटतं, ९ ते ५ च्या रगाड्यातून सुटायला माणसं कलाकार होतात. पण कलाकार होणं हे त्या जॉबइतकंच शिस्तीचं काम आहे. पर्यायाने काहीसं रुक्षदेखील आहे. कलाकाराला वेळेच्या आणि शिस्तीच्या बंधनात राहून मुक्तविहार करावा लागतो. विरोधाभासच म्हणायचा! परवा एक मित्र तुझ्या कवितासंग्रहावर तुझी सही घेऊन आला. ते पुस्तक सोबत घेऊनच तो फिरत होता. आम्ही चारपाच मित्र नेहमीच्या ठिकाणी चहा पीत बसलो होतो तिथे तो आला. आम्हाला कौतुकाने त्याने तुझी सही दाखवली. पण दुरूनच. कुणालाही त्याने पुस्तक हातात घेऊ दिलं नाही. मला म्हणाला, ‘आता मी याला व्यवस्थित कव्हर घालणार आणि कपाटात ठेऊन देणार. सारखं उघडलं तर सही पुसट होईल.’ मी मनात म्हटलं, सारखं नाही उघडलं तर कविता पुसट होतील! तू कवितांमधून अनेक अंगांनी त्याला सापडला असतास. पण तो तुला सहीतच शोधतोय. तुला हे समजलं असतं तर तू हसत सुटला असतास. मी तुझ्या कवितांमधून अनेकदा तुला शोधलं. अगदी डोकं शिणेपर्यंत. आता मला तुझा खांब शोधायचाय. तुला ज्ञानोबा माऊलींचा खांब माहित असेलच. त्या दगडी खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाची मर्यादा पाहिली. अणुरेणूतून वाहणारे अंतःस्थ झरे अनुभवले. असा खांब प्रत्येक कलाकाराचा असतो असं मला वाटतं. ज्ञानोबा माऊलींना सृष्टी निर्माण करणाऱ्या अज्ञात कलाकाराचा खांब सापडला. मला तुझा सापडला तरी पुष्कळ. त्याच्याशी बसून तुझ्या कविता पुन्हा वाचीन म्हणतो. आपल्या भेटीबद्दल मी फार खटपट करत नाही. अल्याड नाहीतर पल्याड आपली भेट होणारच आहे हे मला माहित आहे. तुझाच, कुणीतरी.
  1. Lalit
प्रायोगिक नाटक
डनिंग-क्रुगर इफेक्ट नावाचा एक विषय आहे. त्यात असंय की आपण बेसिक दर्जाचे आहोत हे कळण्यासाठीसुद्धा हुशारीची एक लेव्हल यावी लागते. बेसिकपणाचं आत्मभान ही हुशारीने साध्य होणारी गोष्ट आहे! मोस्टली तरुण मंडळींना हे ज्ञान नसतं. त्यामुळे कुठलाही रँडम तरुण हा थेट जग जिंकायची भाषा करतो किंवा त्याचं ते जिंकून झालेलंही असतं. मी जेव्हा डनिंग-क्रुगर इफेक्टला पात्र उमेदवार होतो तेव्हा मलाही वाटायचं, आपण प्रायोगिक नाट्यचळवळीत अतिशय महत्वाचं काम करतोय म्हणून. मलाच काय, आमच्या सगळ्या ग्रुपला वाटायचं. त्यावेळी मनातलं मांडायला कसली कुंपणं नव्हती, कुणाला बांधील नव्हतो. कलाकृतींचं भांडवल करायचं असतं हा विचारही मनात यायचा नाही. त्यामुळेच कदाचित त्या वयात काहीसं अस्सल, थोडंसं धाडशी लिहिलं गेलं असावं. याच झोनमधून लिहिलं गेलेलं एक नाटक मी बसवत होतो. मित्राच्या बिल्डिंगच्या गच्चीवर तालमी चालू होत्या. काही दिवस जोरदार तालमी केल्या, मग खूप कालवा होतोय म्हणून बिल्डिंगवाल्यांनी आम्हाला हाकलून लावलं. तालमीला हॉल घेण्याइतके पैसे नव्हते. पण हे नाटक नाही केलं तर मराठी प्रायोगिक नाट्यचळवळ कापडगिरण्यांसारखी बंद पडेल याची जाणीव असल्यामुळे आम्ही जुगाड करायचं ठरवलं. कोणत्याही ग्रुपचा असतो तसा आमचा चहा पिण्याचा अड्डा होता. त्या हॉटेलच्या मालकाला पटवलं आणि दुपारी हॉटेल बंद असतं तेव्हा टेबलं सरकवून तालमी करायच्या असं ठरलं. आईवडिलांच्या 'आम्ही अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास करत होतो' या वाक्यात जेवढा हिरॉईझम होता, तेवढाच हिरॉईझम आम्हाला आमच्या कृतीतून मिळत होता. भरीत भर म्हणून आम्ही हॉटेल बंद झाल्यावर रात्रीसुद्धा तालमी करायची परमिशन मिळवली. कडक रुटीन बसलं. तिथे एमपीएस्सी करणारा एक मुलगा सकाळ-संध्याकाळ यायचा. तोही डनिंग-क्रुगर इफेक्टचा मानकरी. बहुधा पहिलाच अटेम्प्ट असावा त्याचा. अद्याप पिचला नव्हता. आमच्या अत्यंत गहन, उत्कट चर्चांमध्ये तोही भाग घ्यायचा. उधारीचा चहा पीत आम्ही समाजाला नवीन दिशा देण्याबद्दल तासन्तास बोलायचो. काही दिवस आमच्या या तालमी चालल्या. एमपीएस्सीवाल्याने सुचवलेले काही दाहक बदलही आम्ही नाटकात केले. आमच्या दृष्टीने नाटक उत्कृष्ट झालं होतं. बराचसा उत्साह, थोडासा माज दाखवत आम्ही माहितीतल्या दिग्गजांना बोलवून पहिला प्रयोग केला आणि तो अकराव्या मजल्यावरून फ्रीज पडावा तितक्या जोरात आपटला. काही दिग्गजांनी आमचं सांत्वन केलं, काहींनी कानशिलं तापतील इतक्या जहाल शब्दात समीक्षा केली. आम्ही सगळं ऐकून घेतलं आणि 'यांना नवीन पिढीची भाषा कळत नाही' असं म्हणून मोकळे झालो. नाटकात नाकारता न येण्यासारख्या चुका होत्या त्या एमपीएस्सीवाल्याच्या खाती टाकून दिल्या. कॉन्फिडन्स हलला नव्हता म्हणून पुढे आणखी नाटकं करत राहिलो! अजूनही ते ड्राफ्ट्स लॅपटॉपमध्ये आहेत. सहज कधी फाईल ओपन केली तर एखादी ओळ वाचून दचकायला होतं. प्रायोगिक नाटकांच्या निमित्ताने धाडसी, वैचित्र्यपूर्ण आणि पठडीबाहेरच्या कलाकृती येत राहतात, बाजारू अप्रोच न ठेवता काहीतरी कळकळीने मांडलं जातं, त्यावर चर्चा होतात, हे महत्वाचं. आणि कलाकार म्हणून आपण कितीही 'कमर्शिअल' झालो तरी प्रायोगिक मॅडनेस पाठ सोडत नाही, हेच त्या फसलेल्या नाटकांचं यश!
  1. Lalit
तेवीस दगड
कालचीच गोष्ट. मी रस्त्याच्या कडेला रँडमली उभा होतो. काहीच करत नव्हतो, नुसता रँडमली उभा होतो. म्हणजे, तुम्हाला असं वाटेल की मी रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसांची लगबग बघून मजा घेत होतो किंवा कान किटवणारा हॉर्न ऐकून, ट्राफिकचा खारट धूर श्वासात भरुन मंत्रमुग्ध होत होतो तर असं अजिबात नाही. मी काहीच नव्हतो करत. काहीवेळाने एक स्वस्तातला युट्यूबर- चंदू एकशेएक- हे त्याचं नाव- तो भटकत भटकत माझ्याकडे आला. ते रस्त्यावर फिरून रँडम लोकांना प्रश्न विचारुन कंटेंट गोळा करतात, त्यांच्यापैकी तो होता. चंदू 101 : तुम्ही काय करता? मी : काहीच नाही. चंदू 101 : काहीतरी करत असाल? मी : अजिबात नाही. मी काहीच नाही करत. मी फक्त उभा आहे. मी रँडमली कुठेही उभा राहतो. त्याला कळलं की हे पाणी वेगळं आहे. त्याने प्रश्नाचा रोख बदलला. चंदू 101- बरं ते जाऊदे. तुम्ही हल्लीच्या पिढीचे आहात. तुमच्यालेखी स्वातंत्र्य म्हणजे काय? मी : काहीच न करता येणं. चंदू 101 : म्हणजे? मी : सोशल मीडियावरचे आणि शेजारपाजारचे चार लोक काय म्हणतील याची गिल्ट न घेता आणि आयुष्यात याचे काय परिणाम भोगावे लागतील याची चिंता न करता शांतपणे काहीच ‘न’ करणं म्हणजे स्वातंत्र्य. चंदू 101 भंजाळला. मला हेच हवं होतं. मी ठरवलं याला आणखी खोलात घेऊन जायचं. मी : तुला-मला, आपल्या सगळ्यांना जे personalised content दाखवतं, त्या ‘Algorithm' नावाच्या गोष्टीने हा घोळ घालून ठेवलाय. लोकांना पळवायचं. जे करतायत ते करण्यापासून प्रवृत्त करायचं. 9 to 5 जॉबवाल्याला ते मनाप्रमाणे जगणाऱ्या आर्टिस्टची लाईफस्टाइल दाखवतं. म्हणजे तो आपल्या रुटीनला घेऊन फ्रस्ट्रेट. त्या फ्रिलांसर आर्टिस्टला ते आर्थिक सुबत्ता असणाऱ्या माणसांची लाइफस्टाईल दाखवतं. म्हणजे तो पैशांच्या विवंचनेत व्यग्र. सिंगल माणसाला लग्नाची महती सांगणारा कंटेंट आणि लग्न झालेल्याला Solo Traveling वगैरे! Algorithm सगळ्यांना नुसतं पळवतंय. लोक पळून पळून दमले की रात्री ते सांगतं ‘जे तुमच्याकडे आहे ते accept करणे म्हणजेच हॅपीनेस!’ चंदू 101 जामच भैसटला होता. त्याच्या मेंदूला सटासट शिंका येऊन गेल्या होत्या. मी बोलतच सुटलेलो… मी : हल्ली जगायचं कसं हे सांगणारी माणसं, पुस्तकं, कोट्स, पोडकास्ट्स यांचा इतका सुळसुळाट झालाय की बासच. प्रत्येकाची वेगळी व्याख्या. आणि तुमच्या-आमच्यासारख्या लोकांची सतत त्या व्याख्येच्या फ्रेममधे बसण्याची धडपड! हे सगळे लोक कायम एक आदर्शवादी चौकट मांडणार, त्यात बसणं आपल्यासारख्यांना शक्य होणार नाही, मग आपण परत वैतागणार. आपण अर्धंमुर्ध जगतोय असंच वाटत राहणार. मग या विवंचनेतून सुटण्यासाठी आपण ओटीटी उघडणार, दहा-बारा तासांची वेबसिरीज एका श्वासात बघणार. सगळा सावळा गोंधळ आहे… चंदू 101 हेल्पटून गेलेला. दरम्यान माझ्या नॉनस्टॉप बोलण्यामुळे आजूबाजूला आणखी काही लोक जमा झालेले. त्यांना बहुतेक हा स्क्रिप्टेड ऍक्ट वाटत असावा कारण ते हसत होते. चंदू 101ने मात्र मी शिंपडलेले ज्ञानकण जामच गंभीरपणे घेतले. चंदू 101 : पण मग दादा माणसानं करायचं काय? मी : अरे लेका तेच सांगतोय, काहीच नाही करायचं. पूर्वी पारतंत्र्यात टाकणारे दुसरे होते, आता आपण ते स्वतःच आहोत. आत्ताचं पारतंत्र्य कोझी आहे, कम्फर्टेबल आहे. चिल आहे. फूड, गॅजेट्स, गाड्या, कपडे, लाइफस्टाईल, या सगळयाचं addiction होत चाललंय. आणि या सगळ्यात स्वतःसोबत वेळ घालवणं जवळजवळ अशक्य झालंय. आपल्यापैकी कुणी तासभर काहीही न करता फक्त बसून राहू शकतो का? आपणच आपल्याकडून हिरावून घेतले गेलोय. त्यामुळे भावा, काहीच न करायला शिक. भूल घालणाऱ्या करोडो गोष्टी आजूबाजूला असल्या, तरी त्यांना अटेंशन न देण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे हे विसरू नको. एवढं बोलून मी थांबलो. आणि काहीच न करण्याची कृती करत उभा राहिलो. आता माझ्यासोबत स्वस्त यूट्यूबर चंदू 101 आणि इतर एकवीसजणसुद्धा होते. रहदारीच्या रस्त्यावर तेवीस दगड असावेत तसे आम्ही उभे होतो. रॅंडम.
  1. Lalit
मराठी सिनेमात नवीन प्रयोग का होत नाहीत?
परवादिवशी सिनेमागृहाच्या बाहेर उभा होतो चहा पीत. एक मराठी सिनेमा बघायला आलो होतो, पण बुकिंगच नसल्यामुळे शो रद्द झालेला. बुकिंग का नव्हतं? तर सिनेमाचा विषय टिपीकल वरणभात पठडीतला किंवा ‘सगळं कसं छान छान’ पठडीतला नव्हता. मोठी स्टारकास्ट नव्हती. पण सिनेमा उत्तम होता. अनेक देश-विदेशातल्या फेस्टिवल्समधे एक वेगळा प्रयोग म्हणून नावाजलेला होता. तरी बघायला प्रेक्षक नाहीत. मी गंभीरपणे चहा पीत उभा असताना चहावाल्याने मला पिन मारली- “काय साहेब, त्या अवघड मराठी पिक्चरला आला होता होय?” मी हो म्हटलं. त्यावर चहावाला म्हणाला- “मी प्रीमियर बघितला कालच. फुकट दाखवत होते, म्हटलं बघूया. अतिशय रद्दड पिक्चर साहेब.” “रद्दड? का बरं?” मी विचारलं. “अहो काय कळालंच नाय. डोक्यावरनं गेलं सगळं. हिरॉइनचं पात्र इतकं विचित्र वागतं ना…आणि शेवट तर लैच वाईट! बाहेर आलो तर सगळ्यांचा मूड ऑफ!” यावरून मी अर्थ लावला की सिनेमात सिम्बॉलिझम भरपूर आहे, हिरॉइन सोज्वळ नसून बंडखोर आहे आणि शेवट ‘सुखान्त’ नसून गंभीर आहे. मी त्याला प्रतिप्रश्न केला- “तुला कोणता मराठी सिनेमा आवडतो?” त्याने एका बंडल सिनेमाचं नाव सांगितलं. हा सिनेमा म्हणजे ‘पावणेदोन तासांची सिरियल’ होता. मग मला त्याची चव कळली. मी परत विचारलं- “इंग्रजी कुठला आवडतो?” त्याने टेचात क्रिस्टोफर नोलनच्या सिनेमाचं नाव घेतलं. “नोलनच्या सिनेमात सिम्बॉलिझम तर भरभरून असतो. शेवटही गंभीर असतो. तरी तुला आवडतो?” मी म्हटलं. “अहो सर तो नोलन आहे! केवढा अर्थ असतो त्याच्या पिक्चरमधे. याला ते जमणारे का?” चहावाला. “हे तू का ठरवतोस? हाच प्रॉब्लम आहे आपला. आपण इंग्रजी सिनेमाला ‘सरेंडर’ होतो आणि मराठी सिनेमाची अति-चिकित्सा करतो. हॉलिवूडमधली हिरॉईन अंगप्रदर्शन करते तर ती ‘मॉडर्न’ वाटते. तिची ब्युटी अप्रिशिएट करावी वाटते. मराठी नटीने कमी कपडे घातले की लगेच संस्कार आठवतात! लगेच त्या सिनेमाला ‘दर्जाहीन' म्हणून आपण मोकळे!” चहावाला निरुत्तर झाला. एव्हाना तिथे दोन पोरं चहा प्यायला आलेली. त्यांनी आमच्या चर्चेत रस घेतला. एक पोरगा म्हणाला, “पण भाई बरोबरे ना! हॉलिवूडमधे अंगप्रदर्शन अस्तं त्याला कायतरी स्टोरी असते, लॉजिक अस्तं. आपल्याकडे फक्त पब्लिसिटी व्हावी आणि ऑडियन्स यावा म्हणून हिरोईनला अंगप्रदर्शन करायला लावतात!” “हो, असं होतं काहीवेळा. ते चुकीचंच म्हणायला लागेल. मराठी सिनेमाला प्रेक्षक कमी असतात हे तर सत्यच आहे. मग पब्लिसिटीसाठी करतात काही प्रोड्यूसर असे स्टंट्स!” “पण काय उपयोग भाई? स्टोरी चांगली नसेल तर कोण बघेल फिल्म?” तो पोरगा म्हणाला. “इथेच एक गडबड आहे! ‘चांगली स्टोरी’ याबाबत मराठी प्रेक्षकांचे मराठी सिनेमाला घेऊन काही वेगळे निकष आहेत. ट्रेलर युट्युबवर पडला रे पडला की लगेच प्रेक्षक ते निकष लावयला लागतात. आणि एखादी बारीकशी गोष्ट जरी खटकली तरी सिनेमाला जात नाहीत! तुम्हाला बारीकसं काहीतरी खटकलं म्हणून संपूर्ण चित्रपटच कसा वाईट ठरवता? तेही न बघता! याचा परिणाम फिल्ममेकर्सवर होतो. ते बंधनं घालून घेतात स्वतःला. एखादा चित्रपट तुफान चालला की लगेच त्या फॉर्मुल्याचे दहा सिनेमे तयार होतात. कारण काय? तर म्हणे ‘सध्या हेच चालतंय!’ त्यामुळे मराठी सिनेमात नवीन प्रयोगच होत नाहीत. नवीन प्रयोग केला तर प्रेक्षक येणार नाहीत याची खात्रीच आहे मराठी फिल्ममेकर्सना.” “असं कसं म्हणतो भाई? होतात आपल्याकडे प्रयोग.” दोन पोरांपैकी एक पोरगा. “होतात ना! पण मराठी प्रेक्षकांना आवडेल का, याचा अवाजवी विचार करून होतात. नवीन प्रयोगात प्रेक्षकांना खटकेल असं काही आहे असं दिसलं, की लगेच घासून गुळगुळीत करतात. म्हणून धाडसी, बंडखोर प्रयोगच होत नाहीत आपल्याकडे!” दोन पोरं आणि चहावाला- तिघांनाही ते पटलं. “बरोबर बोललात दादा. आपण धाडसी प्रयोग सपोर्ट केले पाहिजेत. तरच मराठी सिनेमा पुढे जाईल…आम्हाला असा धाडसी काँटेंट मराठीत असेल तर सांग ना. म्हणजे, हा थिएटरला लागलेला सिनेमा आम्ही बघूच, पण त्याव्यतिरिक्त काही?” एका पोराने विचारलं. मी क्षणभर विचार केला आणि मला आठवलं की गेल्याच महिन्यात युट्युबवर एक मराठी शॉर्टफिल्म रिलीज झालीय. तिचा विषय धाडसी आहे, विषयाला भिडण्याची पद्धत अतिशय निराळी, मराठी सिनेमात पूर्वी क्वचितच पाहिलेली अशी आहे. तांत्रिक बाबतीतही दिग्दर्शकाने वेगळे प्रयोग करून बघितलेत. न घाबरता. मी लगेच त्या शॉर्टफिल्मची लिंक त्या पोरांशी शेअर केली. चहावाल्यानेही मागून घेतली. शॉर्टफिल्मचं नाव आहे ‘Woong Woong’. तुमच्याशीही लिंक शेअर करतो. कुतूहल म्हणून पहा. प्रयोग आवडेलच अशी कोणीतही तरतूद फिल्ममेकर्सनी केलेली नाही!
  1. Lalit
Made with Slashpage