Sign In
ललित

तेवीस दगड

माहिती
हा लेख लोकमत मधे प्रकाशित झाला होता.
लेखनप्रकार
  1. Lalit
कालचीच गोष्ट. मी रस्त्याच्या कडेला रँडमली उभा होतो. काहीच करत नव्हतो, नुसता रँडमली उभा होतो. म्हणजे, तुम्हाला असं वाटेल की मी रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसांची लगबग बघून मजा घेत होतो किंवा कान किटवणारा हॉर्न ऐकून, ट्राफिकचा खारट धूर श्वासात भरुन मंत्रमुग्ध होत होतो तर असं अजिबात नाही. मी काहीच नव्हतो करत. काहीवेळाने एक स्वस्तातला युट्यूबर- चंदू एकशेएक- हे त्याचं नाव- तो भटकत भटकत माझ्याकडे आला. ते रस्त्यावर फिरून रँडम लोकांना प्रश्न विचारुन कंटेंट गोळा करतात, त्यांच्यापैकी तो होता.
चंदू 101 : तुम्ही काय करता?
मी : काहीच नाही.
चंदू 101 : काहीतरी करत असाल?
मी : अजिबात नाही. मी काहीच नाही करत. मी फक्त उभा आहे. मी रँडमली कुठेही उभा राहतो.
त्याला कळलं की हे पाणी वेगळं आहे. त्याने प्रश्नाचा रोख बदलला.
चंदू 101- बरं ते जाऊदे. तुम्ही हल्लीच्या पिढीचे आहात. तुमच्यालेखी स्वातंत्र्य म्हणजे काय?
मी : काहीच न करता येणं.
चंदू 101 : म्हणजे?
मी : सोशल मीडियावरचे आणि शेजारपाजारचे चार लोक काय म्हणतील याची गिल्ट न घेता आणि आयुष्यात याचे काय परिणाम भोगावे लागतील याची चिंता न करता शांतपणे काहीच ‘न’ करणं म्हणजे स्वातंत्र्य.
चंदू 101 भंजाळला. मला हेच हवं होतं. मी ठरवलं याला आणखी खोलात घेऊन जायचं.
मी : तुला-मला, आपल्या सगळ्यांना जे personalised content दाखवतं, त्या ‘Algorithm' नावाच्या गोष्टीने हा घोळ घालून ठेवलाय. लोकांना पळवायचं. जे करतायत ते करण्यापासून प्रवृत्त करायचं. 9 to 5 जॉबवाल्याला ते मनाप्रमाणे जगणाऱ्या आर्टिस्टची लाईफस्टाइल दाखवतं. म्हणजे तो आपल्या रुटीनला घेऊन फ्रस्ट्रेट. त्या फ्रिलांसर आर्टिस्टला ते आर्थिक सुबत्ता असणाऱ्या माणसांची लाइफस्टाईल दाखवतं. म्हणजे तो पैशांच्या विवंचनेत व्यग्र. सिंगल माणसाला लग्नाची महती सांगणारा कंटेंट आणि लग्न झालेल्याला Solo Traveling वगैरे! Algorithm सगळ्यांना नुसतं पळवतंय. लोक पळून पळून दमले की रात्री ते सांगतं ‘जे तुमच्याकडे आहे ते accept करणे म्हणजेच हॅपीनेस!’
चंदू 101 जामच भैसटला होता. त्याच्या मेंदूला सटासट शिंका येऊन गेल्या होत्या. मी बोलतच सुटलेलो…
मी : हल्ली जगायचं कसं हे सांगणारी माणसं, पुस्तकं, कोट्स, पोडकास्ट्स यांचा इतका सुळसुळाट झालाय की बासच. प्रत्येकाची वेगळी व्याख्या. आणि तुमच्या-आमच्यासारख्या लोकांची सतत त्या व्याख्येच्या फ्रेममधे बसण्याची धडपड! हे सगळे लोक कायम एक आदर्शवादी चौकट मांडणार, त्यात बसणं आपल्यासारख्यांना शक्य होणार नाही, मग आपण परत वैतागणार. आपण अर्धंमुर्ध जगतोय असंच वाटत राहणार. मग या विवंचनेतून सुटण्यासाठी आपण ओटीटी उघडणार, दहा-बारा तासांची वेबसिरीज एका श्वासात बघणार. सगळा सावळा गोंधळ आहे…
चंदू 101 हेल्पटून गेलेला. दरम्यान माझ्या नॉनस्टॉप बोलण्यामुळे आजूबाजूला आणखी काही लोक जमा झालेले. त्यांना बहुतेक हा स्क्रिप्टेड ऍक्ट वाटत असावा कारण ते हसत होते. चंदू 101ने मात्र मी शिंपडलेले ज्ञानकण जामच गंभीरपणे घेतले.
चंदू 101 : पण मग दादा माणसानं करायचं काय?
मी : अरे लेका तेच सांगतोय, काहीच नाही करायचं. पूर्वी पारतंत्र्यात टाकणारे दुसरे होते, आता आपण ते स्वतःच आहोत. आत्ताचं पारतंत्र्य कोझी आहे, कम्फर्टेबल आहे. चिल आहे. फूड, गॅजेट्स, गाड्या, कपडे, लाइफस्टाईल, या सगळयाचं addiction होत चाललंय. आणि या सगळ्यात स्वतःसोबत वेळ घालवणं जवळजवळ अशक्य झालंय. आपल्यापैकी कुणी तासभर काहीही न करता फक्त बसून राहू शकतो का? आपणच आपल्याकडून हिरावून घेतले गेलोय. त्यामुळे भावा, काहीच न करायला शिक. भूल घालणाऱ्या करोडो गोष्टी आजूबाजूला असल्या, तरी त्यांना अटेंशन न देण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे हे विसरू नको.
एवढं बोलून मी थांबलो. आणि काहीच न करण्याची कृती करत उभा राहिलो. आता माझ्यासोबत स्वस्त यूट्यूबर चंदू 101 आणि इतर एकवीसजणसुद्धा होते. रहदारीच्या रस्त्यावर तेवीस दगड असावेत तसे आम्ही उभे होतो. रॅंडम.
Subscribe to 'Sujay Jibberish'
Subscribe to my site to be the first to receive notifications and emails about the latest updates, including new posts.
Join Slashpage and subscribe to 'Sujay Jibberish'!
Subscribe
👍